Wednesday, December 28, 2016

पांगिरा, पानिपत, शोध, तडा...............

'डोक्याला भुंगा लावणारं आपण वाचू शकतो' ही १-२ पुस्तकं वाचून झालेली गैरसमजूत पुढल्या १-२ पुस्तकांनी पार धुळीस मिळवली. त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे विश्वास पाटील ह्यांचं 'पांगिरा'. एका छोट्या गावाची ही कहाणी. बदलत्या युगाचं वारं गावात शिरलं की काय होतं ह्याचं उत्तम चित्रण ह्यात पहायला मिळतं. ज्या सुधारणा होताहेत किंवा लोकांच्या कल्याणासाठी कायदे केले जात आहेत त्याची माहिती मोजक्या लोकांना असली की त्याचा ते कसा पुरेपूर फायदा करून घेतात आणि गरीब जनतेला नाडतात ते वाचून नुसता तिळपापड होतो. आपल्याला रोज दोन घास खायला मिळतात त्यामागे ज्याची ढोरमेहनत आहे त्या शेतकऱ्यांची ससेहोलपट 'सिस्टीम' कशी करते ते वाचायचं असेल तर 'पांगिरा' वाचावं. अर्थात अजूनही परिस्थिती फारशी बदललेली नाहीये म्हणा. निश्चलनीकरणाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय. पण इमोशनल डायलॉग मारून वेळ मारून नेणारे नेते आणि हतबल झालेले विरोधी पक्ष असल्यावर आणखी काय होणार. हे पुस्तक वाचून मी आजकाल जेवायच्या आधी 'वदनी कवळ घेता' म्हणून न दिसणाऱ्या देवाला धन्यवाद देण्याऐवजी शेतकऱ्यांना दुवा देते.

'पांगिरा' वाचलं आणि 'पानिपत' वाचायची इच्छा झाली. म्हणून लायब्ररीतून घेऊन आले खरी. पण कसलं काय. जेमतेम अर्ध वाचून झालं आणि लढाईला तोंड फुटायच्या आधीच उत्तरेला मराठी सैन्याचे झालेले हाल वाचवेनात. भाऊबंदकी, हेवेदावे, एकमेकांचे पाय मागे खेचण्याची वृत्त्ती, आत्यंतिक धर्मभोळेपणा असल्या सगळ्या सगळ्या सवयी मराठी सत्तेला पुरेपूर भोवल्या. उत्तरेत हाल होत असलेल्या सैन्याला रसद पुरवण्याऐवजी स्वत:साठी नवरी शोधण्यात वेळ घालवणारे नानासाहेब लवकर गेले तेच बरं झालं. असली माणसं असून काही उपयोग नसतो. नसली तर नुकसान कमीच होतं म्हणायचं. अर्ध पुस्तक वाचून बाजूला ठेवलं. आज वाचायला सुरुवात करू, उद्या करू असं म्हणेतो दोन आठवडे गेले आणि आता आपल्याच्याने काही हे वाचलं जाणार नाही हे ध्यानात आलं. तेव्हा मुकाट्याने पुस्तक परत करून आले. :-(

मग कोणीतरी 'शोध' सुचवलं. शिवाजीमहाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली तेव्हा जो खजिना मिळाला त्याचा काही भाग कधीच स्वराज्यापर्यंत पोचला नाही. तो खजिना मध्येच गायब झाला हे ऐतिहासिक सत्य. तेव्हाच्या आणि नंतरच्या काळातसुध्दा अनेकांनी त्याचा शोध घ्यायचा यत्न केला पण कोणाला यश आल्याचं ऐकिवात नाही. ह्यावर आधारलेली ही काल्पनिक कथा. अर्थात काही धागेदोरे सत्य असतील. पण सत्य आणि कल्पना ह्यांची एव्हढी बेमालूम सरमिसळ लेखकाने ह्यात केली आहे की त्यात फरक करता येत नाही. ऐतिहासिक मिस्टरी वाचायची हौस असेल तर ही कादंबरी नक्की वाचा.

खरं तर 'भैरप्पा' ह्यांचं 'आवरण' हे पुस्तक आहे का असं मी लायब्ररीत विचारलं होतं. ते काही मिळालं नाही पण बाकी पुस्तकांची चवड त्यांनी माझ्यासमोर ठेवली. त्यातून मी 'तडा' उचललं. आणि वाचायला सुरुवात केल्यापासून संपवेपर्यंत मेंदूला नुसत्या झिणझिण्या आणल्या. आत्यंतिक टोकाचा स्त्रीमुक्तीवाद काय विनाश करवून आणू शकतो हे त्यात प्रभावीपणे मांडलंय. अर्थात ह्यात पुरुषांची बाजूसुध्दा कधी कधी न्याय्य असू शकते हे दाखवायचा यत्न केला आहे तरी समाजात आजकाल जे घडतंय ते पाहाता शेकड्यात असे चूक नसलेले किती पुरुष असतील हा प्रश्न उरतोच. त्यामानाने इलासारखं वागणाऱ्या बायका जास्त असाव्यात हे कटू असलं तरी सत्य असावं. खरं-खोटं राम जाणे.

डिसेंबर-जानेवारी मध्ये लायब्ररीत गेले नाही. फेब्रुवारीमध्ये पुन्हा जाईन तेव्हा भैरप्पांची आणखी पुस्तकं वाचायचा बेत केलाय. पाहू किती तडीस जातो ते.

No comments: