Sunday, December 4, 2016

२. लोकप्रभा, दिवाळी अंक २०१६

इंग्लिशमध्ये ज्याला 'without mincing words' असं म्हणतात तसं सांगायचं तर लोकप्रभाच्या दिवाळी अंकाने घोर निराशा केली. इतका फिक्का दिवाळी अंक मी आजवर पाहिला नव्हता. लोकप्रभाचे एरव्ही दर आठवड्याला जे अंक निघतात ते जास्त माहितीपूर्ण आणि रंजक असतात.

अख्ख्या अंकातले मला फक्त मोजून ५ लेख आवडले - पैकी आनंद कानिटकर ह्यांचा 'माझे काबुलमधले दिवस', आशुतोष बापट ह्यांचा 'पर्यटकस्नेही कंबोडिया' आणि डॉ. चारुता कुळकर्णी ह्यांचा 'दोब्रोदोश्ली सर्बियू' हे सर्व पर्यटनाबद्दलचे. चौथा 'एक सुंदर फसवणूक' हा चैताली जोशी ह्यांचा मालिकांच्या सेटबद्दलचा लेख मस्त माहितीपूर्ण वाटला.

आणि पाचवा लेख 'कुठे आहे मराठी सुपरस्टार'. ह्या लेखांत बरीच कारणं बरोबर मांडली आहेत. पण मला असा सुपरस्टार नसण्याचं मुख्य कारण हेच वाटतंय की आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो. हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून जास्त प्रेक्षकवर्ग आहे. तसा कुठल्याही राज्यभाषेतल्या चित्रपटाला मिळू शकेल, निदान नेहमी, असं मला वाटत नाही. मराठी लोक एखादा साउथ इंडियन पिक्चर बघायला जातील का? तसंच आहे हे. म्हणून आपल्याला जास्त मार्केटिंग करायला हवं पण आधीच तोळामासा असलेल्या बजेटमध्ये हे जमत नाही. हिंदीतल्या कलाकारांबद्दल त्यांचे पिक्चर्स रिलीज होणार नसले तरी काही ना काही कुठेतरी छापून येत असतं. आपल्या लोकांबद्दल एकतर काही येत नाही किंवा आलं तरी जे फक्त मराठी लोकच वाचतील अश्या ठिकाणी येतं. पुन्हा त्यातही लेखात म्हटलं तसं ग्रामीण आणि शहरी ही दरी. उदाहरणच द्यायचं झालं तर लेखांत मिलिंद गवळी हा उल्लेख वाचल्यावर हा कोण बुवा असं मला वाटलं. मग फोटो पाहिल्यावर 'हा हिरो दिसतो कसा आननी' चा साक्षात्कार झाला. स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, अंकुश चौधरी ही नावं जुनी म्हणून माहितीची. सिरियल्समुळे संतोष जुवेकर, सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्त्ववादी, अनिकेत विश्वासराव हे माहीत आहेत तरी भूषण प्रधान कोण हे कळायला गुगल करावं लागलं. तरी काहीही झालं तरी मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ किंवा भरत जाधव ह्यांना 'सुपरस्टार' म्हणणं मला तरी नाही जमणार. कारण 'सुपरस्टार' हा dashing, handsome, larger-than-life असायला हवा अशी धारणा, चुकीचीही असेल कदाचित. पण त्यात ते बसत नाहीत. माझी handsome मराठी dude ची व्याख्या मिलिंद सोमण आणि समीर धर्माधिकारी ह्या दोन नावांत संपते. फार झालं तर गेला बाजार लोकेश गुप्ते. बस! मामला खतम!

बिग डेटा वरचा 'बिग डेटा बिग डेडी' ह्या लेखांत इंटरनेटवर सहज उपलब्ध होईल अशी माहिती ठासून भरायचं प्रयोजन मला अजिबात कळलं नाही. त्यामुळे ज्याला तंत्रज्ञानातलं काही माहीत नाही अश्यांसाठी लेख क्लिष्ट झालाय आणि ज्यांना त्यातली माहिती आहे त्यांच्यासाठी कंटाळवाणा. हे असे लेख मांडण्यात थोडक्यात गोडी ठेवली तर बरं असतं. त्यामानाने 'महागुरू......जन्मापासून मृत्यूपर्यंतचा' हा सुहास जोशी ह्यांचा युट्युबवरचा लेख बरा वाटला. तरी त्यात काही प्रमुख category मधल्या चेनेल्सची माहिती असायला हवी होती असं वाटून गेलं. 'रेशनकार्ड ते पासपोर्ट. बदलत्या कुटुंबाची बदलती गोष्ट' ह्या अगडबंब नावाचा लेख माहितीपूर्ण असेल कदाचित पण सुरुवातीचे काही परिच्छेद वाचल्यावर सोडून दिला. खूप यांत्रिक पद्धतीने लिहिल्यासारखा वाटला. तीच गोष्ट 'पर्यायी वृद्ध संगोपन व्यवस्था' ह्या लेखाची.दोन्ही लेख ऑप्शनल म्हणून सोडून दिले.

कथा स्पर्धेतल्या पहिल्या ३ क्रमांकाच्या आणि विशेष पुरस्कार वाली अश्या चारही कथा मला अजिबात आवडल्या नाहीत. त्यांचं बेतलंपण सहज जाणवत होतं. ह्या कथा अश्या तर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेल्या कश्या असतील कोण जाणे. :-(

ह्या महिन्यात लायब्ररीतून पुस्तकं आणणार नसल्यामुळे विकत आणून ठेवलेले सगळे अंक वाचणार आहे. लोकसत्ताचा अंक काढून ठेवलाय. पाहू या काय वाढून ठेवलंय ते.

No comments: