Wednesday, September 28, 2016

नापास मुलांची गोष्ट - अरुण शेवते

हे पुस्तक खरं तर लेखांचं एक संकलन आहे. ह्यातले बरेचसे लेख म्हणजे मान्यवरांनी लिहिलेल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी किंवा त्यांच्या आत्मचरित्रातले उतारे आहेत. ह्यातल्या आठवणीचे लेख वाचताना मजा येते कारण जुन्या काळातल्या अनेक गोष्टी आपल्याला समजतात. पण उतारे वाचताना बऱ्याचदा काही गोष्टींचा संदर्भ लागत नाही किंवा ते संपतात तेव्हा अस्थानी तोडल्यासारखे वाटतात.

बहुतेक लेखांचा सूर हा रूढार्थाने शिकवल्या जाणाऱ्या विषयांत गोडी नसल्याने शालेय जीवनात प्रगती करता आली नाही किंवा नापास व्हावं लागलं हा आहे. तो बऱ्याच अंशी बरोबर आहे. आपल्या इथे मुलांना आवडतील ते विषय शिकण्याची मुभा नाही. कधीकधी आवडता विषय नावडता करतील की काय असं वाटायला लावणारे शिक्षक असतात. नुसता पाठांतरावर भर असतो. पुस्तकं सोडून त्याच विषयांवरचं अवांतर ज्ञान मिळवायला प्रोत्साहन नाही. आणि शिकू त्याचा वापर कसा करायचा त्याचं प्रात्यक्षिक नाही. सगळा पुस्तकी घोकंपट्टीचा मामला. माझं शालेय जीवन म्हणजे भरपूर अभ्यास करायचा आणि शक्यतो पहिला, नाहीतर दुसरा तरी नक्कीच नंबर मिळवायचा. अर्थात त्याबद्दल अजिबात तक्रार नाही. मान मोडून अभ्यास करायची ही सवय अजूनही कामी येतेय. भाषा, इतिहास, जीवशास्त्र, बीजगणित आणि भूगोल हे आवडीचे विषय होते. पण नागरिकशास्त्र, भूमिती, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र सोडून दुसरं शिकायची परवानगी असती तर मी ते विषय नक्की सोडले असते. त्याऐवजी बंगाली, एखादी विदेशी भाषा, पुरातत्त्वशास्त्र किंवा प्राचीन भारतीय संस्कृती/वेद असं काहीतरी मन लावून शिकले असते. चित्रकला, कार्यानुभव, शिवण हे विषय आम्हाला का होते हे कोडं आज अनेक वर्षं कायम आहे. असो. सांगायचा मुद्दा हा की ह्या पुस्तकातल्या अनेक लेखांत हाच राग आळवलाय. पण नापास झालो म्हणून उमेद गमवायची नाही हा संदेश खूप मोलाचा आहे. नापास होऊनही ह्या लोकांनी पुढे खूप प्रगती केली. शाळेत चमकलेली मुलं पुढे फारशी चमकतातच असं नाही हे जयंत साळगावकरांचं म्हणणं पटलं. गुलजार आठवीला उर्दूची परीक्षा नापास झाले होते ह्यावर माझा अजून विश्वास बसत नाहीये. शांता शेळकेंना गणितात पन्नासपैकी शून्य मार्क मिळाले होते त्यावर पान-दोन पानांचा लेख असेल पण वाचण्याजोगा आहे.

पण जन्मभर लक्षात राहतील असे काही लेख - एक लोकमान्य टिळकांवरचा. टिळकांनी लहान वयातच संस्कृतचा किती अभ्यास केला होता ते वाचून छाती दडपून जाते. दुसरा लेख ओग्युस्त रॉन्दे ह्या फ्रेंच शिल्पकारावरचा. त्याच्या आवडीच्या कामाचं शिक्षण देणाऱ्या 'पतित एकोल' ह्या संस्थेची प्रवेश परीक्षा त्याये तब्बल तीन वेळा दिली. तिन्ही वेळा नापास झाल्याने तिथे प्रवेश मिळण्याचा मार्ग बंद झाला पण म्हणून त्याने जिद्द सोडली नाही. आपल्या प्रतिभेच्या जोरावर तो त्याच क्षेत्रात नावारूपाला आला. Hats Off! सुशीलकुमार शिंदे ह्यांची जीवनकथाही अशीच विलक्षण आहे. बाकी दोन लेख नरेंद्र जाधव आणि लक्ष्मण माने ह्यांचे. ह्या तिघांनी प्रतिकूल परिस्थितीत काय सायासाने शिक्षण घेतलं ते वाचून थक्क व्हायला होतं. आणि हीच वेळ आपल्यावर आली असती तर आपण शिकण्यासाठी एव्हढी धडपड केली असती का हा प्रश्न स्वत:ला विचारल्याशिवाय राहवत नाही.

No comments: