Tuesday, March 27, 2012

देऊळ

'देऊळ' बद्दल बरंच वाचलं-ऐकलं होतं. खरं तर चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पहायची इच्छा होती. पण वेळा अडनिड्या त्यामुळे नाहीच जमलं. स्टार प्रवाह वर ह्या रविवारी दाखवणार म्हणून आधीपासूनच मोबाईलमध्ये रिमायन्डर लावून ठेवलं होतं. काल दुपारी आणि संध्याकाळी असं दोन वेळा प्रक्षेपण असलं तरी दुपारीच बघायचं ठरवलं.

तशी कथा काय आहे ह्याबाबत थोडीफार कल्पना होती. पण चित्रपट सुरु झाला आणि काही सीन्स (उदा नाना आणि सोनाली कुलकर्णी ह्यांच्यातला सागरगोटे खेळण्याचा तसंच गावचा शिक्षक् आणि त्याची बायको ह्यांच्यातला) पाहून चित्रपटाच्या नावाचा संदर्भ लागेना झाला. हे सीन्स टाकण्याचं प्रयोजन अजिबात कळलं नाही.

असो. तर खरं तर ही गोष्ट केशाची. गावातलं मोठं प्रस्थ भाऊ (नाना पाटेकर) (हे पाटील असतात का?) ह्यांची करडी गाय राखायचं, तिला चरायला न्यायचं काम करणारा भोळाभाबडा तरुण. चित्रपट सुरु होतो तेव्हा करडी काही दिवसांपासुन गायब असते आणि केशा तिला शोधत फिरत असतो. शोधता शोधता तो गावाच्या माळावर जातो तेव्हा अचानक त्याला तिथे ती दिसते. बरं वाटेनासं होतं म्हणून भाकरी खाऊन जवळच असलेल्या उंबराच्या सावलीत केशा दुपारी आडवा होतो. आणि स्वप्नात त्याला दत्तदिगंबर दिसतात. झालं! केशा बोंब मारत गावाकडे धावत सुटतो. वाटेत येणार्या गावकऱ्यांना 'कोण दत्त? कुठे दिसला?' काही अर्थबोध होत नाही. केशाचा ज्यांच्यावर जीव आहे असे अण्णा नेमके गावात नसतात. पण जेव्हा ते येतात तेव्हा ते केशाला असे अनुभव स्वत:जवळच ठेवायचा सल्ला देता. पण तोवर खूप उशीर झालेला असतो. गावात हॉस्पिटल व्हावं अशी अण्णांची खूप इच्छा असते आणि त्यासंबंधीचा आराखडाही ते बनवत असतात. पण धर्म आणि राजकारण ह्याची आपल्या देशात जी गल्लत झालेली आहे तीच ह्या गावातही होते. आपले राजकीय हितसंबंध जपण्याच्या नादात हॉस्पिटल बनवण्यासाठी आग्रही असलेले भाऊ देऊळ बांधायला तयार होतात. देऊळ बांधून होतं आणि मग सुरु होतो भक्तीचा बाजार जो ह्या साध्यासुध्या गावाला आणि गावकऱ्यांना आमुलाग्र बदलतो.

आपल्या देशात 'धर्म' ह्या विषयावर कुठेही काहीही बोलायची सोय राहिलेली नाहीये. असं असताना हा विषय परखडपणे मांडल्याबद्दल ह्या चित्रपटाशी निगडीत सर्वांचे जेव्हढे आभार मानावेत तेव्हढे थोडेच आहेत. देऊळ उभंही राहिलेलं नसताना बाहेरच्या जागांची दुकानांसाठी लिलावाने विक्री, पैसे जमवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेठीला धरणं, फुलं, फोटो, ताईत असल्या धार्मिक वस्तुंसोबत हिंदी सिनेमाच्या केसेटस वगैरे गोष्टीची सर्रास विक्री, चालू हिंदी गाण्यांच्या चालीवर रचलेल्या वेड्यावाकड्या आरत्या आणि भजनं, देव आणि देऊळ ह्यांच्या जीवावर गब्बर झालेले लोक ......सगळं सगळं स्वच्छ दाखवलंय. 'हे असं नाहीये' असं कोणी म्हटलंच तर त्यांना प्रभादेवीचं सिध्दीविनायक, महालक्ष्मी वगैरे देवळं बघून या म्हणावं.

अभिनयाबद्दल बोलायचं तर नाना पाटेकर भाऊ म्हटल्यावर मी कपाळाला हात लावला होता. पण नानाने ही व्यक्तिरेखा त्यातल्या विनोदी जागांसह मस्त उभी केली आहे. अण्णांनी बंगलोरला जाऊ नये म्हणून सांगायला भाऊ येतो तेव्हाचा त्याचा अभिनय सुरेखच. सोनाली कुलकर्णीने भाऊच्या बायकोचा ठसका छान दाखवलाय. आतिशा नाईकने सासूच्या टाचेखाली असलेली सरपंच चांगली साकारली आहे. केवळ कोटा आहे म्हणून निवडून आलेल्या पण नुसत्या बोलवित्या धनी असणाऱ्या अश्या बायका सरपंच गावागावात असणार. वा रे लोकशाही! 'हरिश्चंद्राची फेक्टरी' मधली विभावरी देशपांडे अगदीच छोट्या भूमिकेत होती. उषा नाडकर्णी मात्र 'पवित्र रिश्ता' तल्या सविताताई देशमुखच्या पंढरपुराच्या जत्रेत हरवलेल्या जुळ्या बहिणीसारख्या वाटत होत्या. संवाद फेकायची ढब, तेच आक्रस्ताळी बोलण. दिलीप प्रभावळकरांसारखा गुणी अभिनेताही समजूतदार माणसाच्या भूमिकेत "स्लॉट" झाल्यासारखा वाटतोय. प्रभावळकर 'भाऊ' म्हणून आणि नाना 'अण्णा' म्हणून कास्ट केले गेले असते तर? केशाचं काम करणारया अभिनेत्यानेही देव दिसला म्हणून हरखून गेलेल्या आणि नंतर 'ह्या सगळयाला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत' म्हणून व्यथित झालेल्या केशाची भूमिका छान वठवली आहे.

चित्रपटाचा शेवट 'शेवट गोड ते सगळं गोड' असं मानणार्या प्रेक्षकांना रुचणार नाही कदाचित पण तो वास्तवाला धरून दाखवला हेही स्तुत्यच. एकुणात काय तर हा भक्तीचा, देवाचा बाजार थांबवणं माणसाच्याच काय तर देवाच्याही हातात उरलेलं नसावं. हा बाजार कुठल्या थराला गेलाय ह्याचं वास्तव चित्रण पहायचं असेल तर 'देऊळ' नक्की बघा.

No comments: