Friday, December 2, 2011

टेक २५ - भावना सोमेय्या

खरं तर मी मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद कधीच वाचत नाही. जी भाषा आपल्याला समजते त्यातून मूळ कलाकृतीच वाचायला हवी, अनुवादाच्या कुबड्या कश्याला हव्यात? पण ह्यावेळी माझा नाईलाज झाला कारण भावना सोमेय्यांच्या ’टेक २५’ ची मूळ इंग्रजी आवृत्ती लायब्ररीत नाहिये. सहज म्हणून अनुक्रमणिका चाळली तेव्हा बासु भट्टाचार्य, अपर्णा सेन, राजेश खन्ना, रेखा, जया बच्चन अश्या अनेक जणांच्या मुलाखती आहेत असं दिसलं त्यामुळे अगदीच रहावलं नाही आणि मी पुस्तक घेऊन आले.

हिंदी पिक्चर थिएटरमधे जाऊन पाहिल्याला अनेक वर्ष लोटली पण जुने हिंदी चित्रपट, त्यातले कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार ह्याबद्दल जबरदस्त कुतूहल आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे. कसे बनतात चित्रपट, कलाकार आपल्या भूमिकांबाबत कसा विचार करतात, त्याबाबत ते समाधानी असतात का - एक ना दोन अनेक प्रश्न. कबूल आहे की एक पुस्तक वाचून सगळ्यांची उत्तरं मिळणं अशक्य आहे. तरी पुस्तकाने माझी निराशा केली नाही हे नक्की. आपण प्रेक्षक थिएटरात जातो, पिक्चर आवडला तर ठीक नाहीतर पैसे पाण्यात गेले म्हणून दिग्दर्शकाच्या नावाने, कलाकारांच्या नावाने शंख करतो पण ह्यामागे किती लोकांची किती मेहनत आहे हे लक्षात घेत नाही. हां, एक मात्र आहे, काही काही चित्रपट एव्हढे वाईट असतात की आपल्याला वाटतंच ’अरे, हा पिक्चर वाईट आहे हे आपल्याला दिसतं तर दिग्दर्शक, कलाकार ह्यांना कळलं नसेल का?’

असो. तर पुस्तकाविषयी. रेखाची एक अत्यंत खाजगी प्रश्न विचारलेली मुलाखत सोडली तर बाकीच्या मुलाखतीत लेखिकेने बरेच संयत आणि माहितीपूर्ण प्रश्न विचारल्याचं जाणवतं. मला स्वत:ला तर नीतू सिंगची मुलाखत अतिशय आवडली. एक नायिका म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून ती इतकी छान वाटते ना की मी तर तिची फ़ॆनच झालेय :-)

अंजनी नरवणे ह्यांनी अनुवादाचं काम चांगलं केलंय तरी काही ठिकाणी Third Person मधले उल्लेख मराठीत आणतान कृत्रिमपणा जाणवतो. तसंच अनेक ठिकाणी ’रसप्रद’ ह्या शब्दाचा त्यांनी केलेला उल्लेख फ़ार खटकतो. बहुतेक interesting ह्या मूळ शब्दाचं ते मराठी रुपडं असावं असं बाकीच्या संदर्भावरून वाटतं. ’रंजक’ हा शब्द अधिक योग्य वाटला असता का?

हे पुस्तक जवळजवळ वाचून संपलंय. A Princess Remembers हे पुस्तक आणायचा बेत आहे. ह्याचीही अनुवादित आवृत्तीच बहुधा लायब्ररीत उपलब्ध असणार पण मूळ पुस्तक कधी वाचायला मिळेल ह्याची खात्री नसल्याने सध्या तरी अनुवादच वाचायचा ठरवतेय. भारताच्या स्वातंत्र्यासोबत खालसा झालेल्या ह्या राजे-रजवाड्यांचे राजवाडे चित्रात किंवा प्रत्यक्षात पाहून कधीकधी हे सगळं खालसा झाल्याचं वाईट वाटतं खरं, नाही असं नाही. पाहू या तरी ह्या राणीचं जीवन कसं होतं ते :-)

No comments: