काही म्हणा पण प्रवास करताना खाण्याचे जरा हालच होतात. त्यातून देवाच्या दर्शनाला जात असल्याने फक्त शाकाहाराचाच पर्याय होता. मला तर ह्या हॉटेलातून मेन्यूकार्ड का ठेवलेलं असतं तेच कळत नाही. साऊथ इंडियन पदार्थ म्हटले तर डोसा (सादा, मसाला, मैसोर सादा, मैसोर मसाला, रवा सादा इत्यादि), इडली, मेदू (किंवा मेंदू!) वडा, उत्ताप्पा (बटर, सादा, टोमॅटो, कांदा इत्यादि) ह्यात कारभार आटोपतो. पंजाबी जेवणाचं म्हणाल तर नवरतन कोर्मा, छोले, पालक पनीर, आलू मटर, मटर पनीर, मेथी मटर मलाई, राजमा, पनीर टिक्का मसाला, कढई पनीर, व्हेज कढई, व्हेज जालफ्रेजी ह्या डिशेस मेनू न बघताही सगळीकडे मिळतील. चायनीज (किंवा चायनिस!) जेवणात च्याऊ मेन, शेझवान, मांचुरियन ह्यांना मरण नाही.
नाही म्हणायला रांजणगावला जायच्या आधी एका फाट्यावर वळताना "हॉटेल राजधानी" अशी पाटी दिसली म्हणून गाडी वळवली. ड्रायव्हरचं काय बिनसलं होतं देवाला ठाऊक. "बाहेरच्या बाईक्स कामगारांच्या दिसताहेत" वगैरे सांगायला लागला. पण आम्ही नेट धरला. आत तोच मेन्यू. पण त्या गर्दीत मला "कढी खिचडी" दिसलं. वेटर बहुतेक नाहिये असं सांगणार अशी मनाची तयारी करून ऑर्डर केली. अहो आश्चर्यम! गरमागरम आणि चविष्ट अशी खिचडी कढी मिळाली. देवाजी कधीकधी अशी क्रृपा करतो! :-) तसाच एक लक्षात राहिलेला पदार्थ म्हणजे शेवटल्या दिवशी पुण्यात "सवेरा" नामक हॉटेलमध्ये खाल्लेला उपमा.. अप्रतिम!
खरं तर घरी परतायच्या प्रवासात लंचला नॉनव्हेज खायचं नाही अशीच इच्छा होती. पण बाकीची जनता व्हेज खाऊन कंटाळली होती. एकटीपुरतं व्हेज मागवून अन्न वाया घालवण्यापेक्षा नॉनव्हेजच मागवलं. ते हॉटेल नक्की कुठे होतं सांगता येणार नाही. पण सितेवाडी असं पुढे लागलेल्या गावाचं नाव होतं आणि माळशेज घाटाच्या आधी लागलं होतं. हॉटेल देवेन्द्र असं त्याचं नाव. तिथे मिळालेलं बटर चिकन इतरत्र मिळणार्या बटर चिकनपेक्षा वेगळं होतं पण मस्त होतं. आणि चिकन मसाला सुध्दा छान झणझणीत होता :-)
आणि हो, हॉटेल लहान असो वा मोठं - चहा मात्र ३ दिवस सगळीकडे झकास मिळाला. कदाचित दुधाचा परिणाम असावा. :-)
Wednesday, April 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment