Thursday, May 24, 2018

नाटक नाटक

नाटक बघण्याची आवड मला कशी, का आणि कधीपासून लागली हे आता मलाच आठवत नाही. पण लागली एव्हढं मात्र नक्की. वर्षातून किमान - तरी नाटकं बघितल्याशिवाय राहवत नाही. अर्थात आधी परीक्षण वाचल्याशिवाय कुठलंही नाटक बघायला धजावत नाही. अपवाद नुकतं पाहिलेलं हेम्लेट. अर्थात त्याचं कथानक माहित होतं आणि कलाकार चांगले आहेत म्हणून हे धाडस केलं म्हणा.

ह्या वर्षीचं पाहिलेलं पाहिलं नाटक म्हणजे 'संगीत सौभद्र'. काही वर्षांपूर्वी कोणी मला तू 'संगीत' नाटक पाहणार असं सांगितलं असतं तर मी त्याला किंवा तिला वेड्यात काढलं असतं. पण ह्या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या अनेक निश्चयांपैकी एक म्हणजे निदान एक तरी संगीत नाटक पाहायचंच. सौभद्र म्हणजे महाभारतातल्या अर्जुन-सुभद्रा प्रेमविवाहावरआधारित. म्हणजे कथानक तसं परिचयाचं. शास्त्रीय संगीतातलं मला फारसं काही कळत नसल्याने आनंद भाटे आणि राहुल देशपांडे ही नावं फक्त ऐकून माहित. तरी धीर करून तिकीट बुक केलं. सोबत आलेल्या मैत्रिणीला 'माझा डोळा लागला तर उठव' हेही बजावून झालं. पण मजा अशी की नाटक पाहताना डोळा अजिबात लागला नाही. हे खरं की शास्त्रीय संगीतातलं कळतं अश्या एखाद्या व्यक्तीइतकं मी नाटक नसेल एन्जोय केलं. पण तरी माझ्या परीने मी नाटकात गुंतले. आश्चर्य म्हणजे त्यातली - अपवाद वगळता बहुतेक सगळी पदं - राधाधर मधुमिलिंद, प्रिये पहा, नभ मेघांनी आक्रमिले, नच सुन्दरी करू कोप, वद जाऊ कुणाला शरण - मी लहानपणी ऐकलेली होती. रेडिओवर ऐकली असणार हे नक्की कारण घरात कोणाला शास्त्रीय संगीताची आवड वा जाण नव्हती. मला सगळ्यात काम आवडलं ते कृष्ण झालेल्या आनंद भाटे ह्यांचं. अभिनय पेशा असलेल्या नटासारखा सराईत अभिनय नसला तरी कृष्णाचा खटयाळपण, कावेबाजपण आणि धूर्तता त्यांनी व्यवस्थित साकार केली. त्यामानाने अर्जुन झालेल्या अंगद म्हसकरला वाव थोडा कमीच मिळाला. सुभद्रा आणि रुक्मिणी बनलेल्या अभिनेत्री भूमिकेच्या वयाचा विचार करता बर्याच थोराड वाटत होत्या. बलराम झालेल्या अभिनेत्याचं काम मात्र मला खूप आवडलं. कदाचित तो एकही पद गायला नाही म्हणून असेल :-) एकुणात आयुष्यातलं पहिलंवहिलं संगीत नाटक मी पचवलं.

आणि मग दुसरं संगीत नाटक बघायचं ठरवलं. टेक्निकली 'देवबाभळी' हे संगीत नाटक नव्हे. त्यात संत तुकारामांचे अभंग संगीतबध्द करून वापरले आहेत. तुकारामांची बायको आवडी/आवली आणि विठ्ठलाची बायको रखुमाई ह्या दोन स्त्रियांनी पेलून धरलेलं हे नाटक. आवली तुकारामांच्या विठ्ठलभक्तीमुळे आणि त्यांच्या संसारात होणार्या दुर्लक्षामुळे त्रासलेली, आयुष्यातल्या अडचणी एकटीने सोडवताना गान्जलेली तर रुक्मिणी सदोदित भक्तांचा विचार करणाऱ्या नवर्यावर चिडून दिंडीरवनात निघून गेलेली. नवर्याला दुपारी जेवण द्यायला निघालेल्या गर्भार आवलीच्या पायात बाभळीचा काटा मोडतो आणि तो काढण्याच्या यत्नात ती ठेचकाळून पडून बेशुध्द होते. तिला सावरायला ती ज्याची 'काळतोंड्या' म्हणून निर्भत्सना करत असते तो विठ्ठलच धावून येतो. आणि मग तिची काळजी घ्यायला तो रखुमाईला सांगतो. आवलीच्या घरी येऊन तिच्या घरातलं स्वयंपाकपाणी, झाडलोट करत तिची शुश्रुषाही करणाऱ्या रखुमाईचं आणि तिचं एक वेगळं नातं जुळतं. दोन बायका एकत्र आल्या की त्यांच्यात खटके उडणारच. तसे ते उडतात पण तरी एका परीने त्यांच्या दु:खाची जात एकच असते. तो धागा कुठेतरी जुळतो. कधी शब्दांनी संवाद होतो तर कधी शब्दांशिवाय. दोघींना आपल्या वागण्यातल्या चुका कळतात, कसं जगावं ते कळतं, गैरसमजुतींचं मळभ विरतं. आवलीचा पाय बरा होतो आणि रखुमाईच्या मनातली जखमसुध्दा.

मला हे नाटक 'संगीत सौभद्र' पेक्षाही जास्त आवडलं. एकतर दोन बायकांनी सगळं नाटक पेलून धरलं त्याचं मला खूप कौतुक वाटलं. दोघींचा अभिनय सुरेख आणि गळाही. नाटकाचं नेपथ्य हा माझ्या दृष्टीने फार नवलाईचा भाग राहिलंय. ह्या नाटकाचं नेपथ्य खूपच सुरेख होतं. प्रकाशाच्या माध्यमातून इंद्रायणीच्या पात्राचा जो देखावा उभा केलाय त्याला तोड नाही. आवलीच्या घरातलं छोटं स्वयंपाकघर, दोघी नदीकाठी असताना पाउस येणं, रखुमाईनं इंद्रायणीच्या पात्रात लुगडी धुणं, स्वयंपाकघरात भाकर्या भाजणं हे सगळे प्रसंग जिवंत करण्यात नेपथ्य, प्रकाशयोजना आणि अभिनय तिन्हीचा सुरेख संगम झालाय. एक वेगळ्या धर्तीचं नाटक पाहिल्याचं समाधान पुरेपूर मिळालं.

आता हेम्लेटबद्दल. “टू बी ऑर नॉट टू बी' ह्या वाक्याने अजरामर झालेला हा डेन्मार्कचा राजपुत्र. कथा तशी ढोबळमानाने माहित असली तरी हेम्लेट, त्याचा बाप, आई आणि काका ह्या पात्रांखेरीज अन्य पात्रं मला माहित नव्हती. ह्या नाटकाशी झी मराठीचा काहीतरी संबंध आहे एव्हढं वाचलं होतं. त्यामुळे "टू परचेस ऑर नॉट टू परचेस' असा प्रश्न तिकीटाबद्दल पडणं साहजिक होतं. कारण टुकार सिरियल्स काढणे आणि चांगल्या सिरियल्सचीसुध्दा वाट लावणे ह्या उद्योगात झी मराठीवाल्यांचा हात कोणी धरू शकत नाही. बरं, कथानक विदेशी, त्यातली पात्रं, संस्कृती, संवाद, पोशाख सगळं विदेशी. हे सगळं ह्यांना कितपत झेपेल अशी शंका होतीच. पण धीर करून तिकीट काढलंच.

नाटक सुरु होतं तेच मुळी हेम्लेटच्या मित्राला, होरेशिओला, रात्रीचे गस्त घालणारे पहारेकरी राजाच्या वेषातली एक विचित्र आकृती आपल्याला दिसली असं सांगतात त्या प्रवेशाने. रात्रीची गूढता, महालाच्या प्रवेशद्वाराजवळची सुरक्षा आणि अचानक प्रकट होणारी पांढर्या वेषातली ती आकृती सगळं इतकं सुरेख जमलं होतं की आपण तिकीट काढून योग्य तेच केलं ह्याची मला खात्री पटली :-) नाटक उत्तरोत्तर रंगत गेलं. काही अपवादात्मक शब्दबंबाळ संवाद वगळता नाटकाचं विदेशीपण फारसं जाणवलं नाही हे नाटकाच्या टीमचं यशच म्हणावं लागेल. हेम्लेटच्या कामासाठी सुमित राघवनला खूप टाळ्या पडल्या पण मला खरं सांगायचं तर त्याच्यापेक्षा क्लॉडीयस झालेल्या तुषार दळवीचा अभिनय जास्त आवडला. क्लॉडीयसचा धूर्तपणा, कावेबाजपणा, त्याला वाटणारी हेम्लेटची भीती सगळं सगळं त्याने डोळे, आवाज आणि अंगबोलीतून सही वठवलंय. आता हा आणखी काय कारस्थानं करणार आहे अशी रास्त भीती आपल्याला नाटकभर वाटत राहते. त्याखालोखाल मला होरेशिओ झालेल्या आशिष कुलकर्णीचं काम आवडलं. हेम्लेटविषयीची काळजी, त्याला मदत करायची इच्छा, त्यातून आलेलं हताशपण त्याने सुरेख दाखवलाय. भूषण प्रधानचा लेआर्टिस रुबाबदार वाटला. त्याची आणि हेम्लेट शेवटची लढाई लुटुपुटूची वाटली नाही हे विशेष. पोलोनियस मात्र थोडा विनोदी वाटला. मुग्धा गोडबोलेची पतीशी प्रतारणा करणारी, मुलाच्या वेड्या आचरणाने भांबावलेली, त्याला सत्य कळल्यावर त्याला घाबरणारी आणि शेवटी पश्चात्तापदग्ध होणारी राणी गरत्रुड (काय पण विचित्र नाव!) भावली. पण मनवा नाईकची ओफेलीया काही मला कळली नाही. कदाचित कधीकाळी मूळ नाटक वाचलंच तर समजेल अशी आशा आहे.

सुरुवात तर चांगली झालेय. बघू या ह्या वर्षी अजून कुठली नाटकं पाहायला मिळतात ते. :-)

No comments: