Wednesday, November 1, 2017

१. लोकसत्ता (दिवाळी अंक २०१७)

ह्या वर्षीचा पहिला दिवाळी अंक. अमिताभ आणि इंदिरा गांधी ह्या दोघांवरचे लेख आहेत म्हणून खरं तर घेतलेला. पण अंकाने बरीच निराशा केली.

प्रथम  इंदिरा गांधी ह्यांच्यावरच्या लेखांबद्दल. तसं मला कुठल्याच राजकीय पक्षाबद्दल फारसं ममत्त्व नाही. पण तरी भारताची महिला पंतप्रधान म्हणून थोडासा सोफ्ट कॉर्नर होता. ‘होता' असंच म्हणावं लागेल कारण त्या पंतप्रधान होत्या त्या काळात 'राजकारण' हा विषय खिजगणतीतही नसण्याचं माझं वय होतं. आणीबाणी वगैरे गोष्टींचा गंध नव्हता. पण पुढे ह्यावर बरंच काही वाचलं. विचार केला. त्यांचेच काय पण कुठल्याच राजकारणी व्यक्तीचे पाय मातीचेच असतात हे पक्कं लक्षात आलं. सर्वसाधारण भारतीय माणसात आढळणारी व्यक्तीपूजेची भावना माझ्यात आधीही फारशी नव्हती आणि नंतर कधीच निर्माण झाली नाही.  पण तरी आधी कधी न वाचलेल्या काही गोष्टी कदाचित समजतील म्हणून मोठ्या अपेक्षेने लेख वाचले. त्यातल्या त्यात माधव गोडबोलेंचा लेख आवडला. मिसेस गांधींच्या कारकिर्दीतल्या अनेक घटनांचं चांगलं विवेचन त्यांनी केलंय. सुजाता गोडबोलेंचा लेख इंदिराजी आणि डोरोथी नॉर्मन ह्यांच्या मैत्रीवर छान प्रकाश टाकतो. संजीव केळकर आणि शशिकांत सावंत ह्यांच्या लेखांतूनही बरीच चांगली माहिती मिळाली. विनय हर्डीकर ह्यांनी मात्र मिसेस गांधींवरचा खुन्नस काढायला लेख लिहिलंय का काय असं वाटावं एव्हढा विखार त्यात आहे. लेख थोडा निष्पक्षपातीपणाने लिहिला असता तर बरं झालं असतं.

‘बिनीचे पर्यावरणवाडी' हा माधव गाडगीळ ह्यांचा लेख थोडा विस्कळीत वाटला पण आवडला. वा. द. वर्तक ह्यांचा 'हिर्डोशीचा हिरडा की कोळसा' हा १९६७ सालचा लेख वाचून आजही परिस्थितीत  फारसा फरक पडलेला नाही, उलट ती अधिक भीषण झालेली आहे हे जाणवलं. ह्या विषयावरची आणखी पुस्तकं मिळवून वाचली पाहिजेत असं प्रकर्षाने वाटलं. ‘परतून घराकडे' ह्या लेखाच्या नावावरून परदेशातून भारतात परतणार्या लोकांवर असावा असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात त्यात 'The Wizard Of Oz’ ह्या चित्रपटाची मस्त माहिती मिळाली आणि आपण अजून तो पाहिलेला नाही ह्याची खंत वाटली. ‘Over The Rainbow’ हे गाणं डाऊनलोड करून ऐकणार आहे. :-) गुलझार हा माझा खूप आवडता गीतकार. पण त्याच्या कित्येक गाण्यांची नव्याने ओळख मृदुला बेळे ह्यांच्या 'मुझको भी तरकीब सिखा दे' ने करून दिली. खरंच मला गुलझार किती वरवर कळला होता. आता त्याची गाणी नव्याने ऐकायला खूप मजा येईल. त्यांची 'यार जुलाहे' हि कविता दिल्याबद्दल तर लेखिकेचे शतश: आभार. आता त्याच्या कविता कुठूनतरी मिळवून वाचल्या पाहिजेत. नाहीतर 'बेवजह जिंदगी जा रही ही' असंच म्हणावं लागेल :-)

अमिताभ बच्चन हाही माझा आवडता हिरो वगैरे नव्हे. खरं तर कुठल्याही चेनेलवर तो कधीही दिसतो त्यामुळे आजकाल त्याचं अजीर्णच झालंय. तरी हिंदी चित्रपटसृष्टी हा नेहमीच माझ्या कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. अमोल पालेकर ह्यांचा अमिताभवरचा लेख आवडला. केवळ एक नट म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही त्यांनी अमिताभचं चांगलं निरीक्षण केलं आहे. राज ठाकरेंचा  लेखसुध्दा आवडला. आधी 'राज ठाकरे' हे नाव वाचून हे मनसेचेच राज ठाकरे का हा प्रश्न पडला होता पण लेखातली खुसखुशीत भाषा वाचून खात्री झाली. त्यामानाने 'यार अमिताभ' हा सतीश जकातदार ह्यांचा लेख फारसा आवडला नाही.

श्याम मनोहर ह्यांना 'परिवर्तन' ह्या कथेतून काय सांगायचं होतं ते कळलं नाही. कॉ. सीताराम येचुरी ह्यांचा लेख वाचायची इच्छा होती. (साम्यवाद, समाजवाद वगैरे भानगड आहे तरी काय हे एकदा जाणून घ्यायचं आहे!) पण सुरुवातीचे काही परिच्छेद वाचून पुढे वाचावंसं वाटेना तेव्हा सोडून दिला. मुकुंद तळवलकर ह्यांच्या लेखातून  भूतकाळातल्या काही व्यक्तींची माहिती झाली तरी हाही लेख बराच विस्कळीत वाटला. अर्थात लेखाचं शीर्षकच 'आठवणी दाटतात' असल्याने थोडा विस्कळीतपणा क्षम्य आहे :-) प्रणव सखदेव ह्यांची 'गर्भगळीत' सुरुवात छान केली असून शेवटाला ढेपाळल्यासारखी वाटली. 

कविता मला फारश्या कळत नसल्याने त्या विभागाबद्दल काही लिहित नाही.  चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी मराठी नाटकातल्या बदलाचा चांगला आढावा आपल्या लेखात घेतलाय. मला स्वत:ला नाटक पहायला खूप आवडतं म्हणून हा लेख विशेष आवडला. ‘मंजिले और भी है' हा हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बदलांवरचा अमोल उदगिरकर ह्यांचा लेख, ‘बदलणारं चित्र' हा चित्रकलेच्या क्षेत्रातली स्थित्यंतरं दर्शवणारा लेख वाचनीय. विजय केंकरेनी दत्ता भट, डॉ. श्रीराम लागू, मधुकर तोरडमल ह्यांच्यासारख्या नटाबद्दल लिहिलेलं वाचून आपण काय काय मिस केलंय हे जाणवलं. ‘हर्बेरियम' तर्फे आलेलं 'पती गेले ग काठेवाडी' बघणार होतेच. आता कसंही करून जमवायचं असं  ठरवलंय. 

जागतिक राजकारण हाही आवडीचा विषय असल्याने 'अनिश्चीततेची सावली' हा सचिन दिवाण ह्यांचा लेख खूप इंटरेस्टिंग वाटला. प्रशांत कुलकर्णी ह्यांची व्यंगचित्रे मस्त. वार्षिक राशीभाविष्य कापून ठेवून त्याची सत्यासत्यता पडताळून पहायची दरवर्षीची उर्मी ह्याही वर्षी दडपली :-)

अरे हो, अंकाचा सुरुवातीला सुधीर पटवर्धन ह्यांनी 'एनिग्मा' ह्या चित्राचं जे विवेचन केलंय ते मात्र साफ बम्पर गेलं. :-)

No comments: