Sunday, October 29, 2017

गेल्या काही दिवसातली अशीच एक लढाई. ह्याच ग्रूपवर कोणीतरी 'माझ्या मते हिटलर देशभक्त होता. त्याला वाईट ठरवलं गेलं' असं विधान केलं. मी आता ह्यावर काही बोलावं का मौन धरावं ह्या दुग्ध्यात असताना दुसर्या एकाने तलवार उपसली. निरपराध लोकांना मारणारा हिटलर वाईट 'ठरवला गेला' असं तुम्ही कसं म्हणू शकता असा त्याच्या पोस्टचा सूर होता. त्यावर आणखी एका बाईनी 'हिटलरच्या अनुयायांनी ते सगळं केलं. त्याला ह्याबद्दल कळलं तेव्हा फार उशीर झाला होता' असं पिल्लू सोडलं. मग मात्र माझ्याच्याने रहावेना.

मी म्हटलं एव्हढे ज्यू मारले गेले तरी ह्याला गंधवार्ता नव्हती म्हणजे महामूर्खच म्हणायचा की तो.  ह्यावर त्या बाईनी 'आपले अधिकारी भ्रष्टाचार करतात हे कळून इंदिरा गांधी काय करु शकत होत्या? हिंदुत्त्वाबद्दल बेजबाबदार व्यक्तव्य करणार्या लोकांचं मोदी काय करणार?' असा सवाल टाकला. म्हणजे त्यांचं म्हणणं हे की काही काही वेळा अनुयायांचं वागणं चुकीचं आहे हे कळूनही नेत्यांना काही करता येत नाही. तरी बरं त्यांनी काँग्रेसबरोबर बीजेपीलाही त्यात समाविष्ट केलं. नाहीतर मोदीभक्तांचा त्या ग्रुपमध्ये असलेला भरणा पाहता बीजेपी सोडून बाकी सर्व पक्षांबद्दल लिहिलं असतं तर मला आश्चर्य वाटलं नसतं. मग मी म्हटलं की अनुयायी एव्हढे भक्त असतील तर नेत्याने नुसती समज दिली तरी त्यांनी आपल्या कारवाया थांबवायला हव्या. नेते गप्प बसले तरअनुयायी त्यांचा पाठींबाच आहे म्हणून आपल्या कारवाया चालूच ठेवणार. एकदा नेता झालं की मग तुमचे अनुयायी जे काही बरं-वाईट करतात त्याची जबाबदारी नेत्याची - मग त्या कृत्यांबद्दल त्याला/तिला माहिती असो वा नसो. आणि दुसरं असं की भ्रष्टाचार करणे,  बेजबाबदार व्यक्तव्य करणे आणि नरसंहार करणे ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

ह्यावर तर बाईनी पवित्रच बदलला. म्हणे 'हिटलरच्या कुटुंबाला ज्यू लोकांमुळे फार सोसावं लागलं म्हणून तो तसा झाला असेल. माझ्या ओळखीत एक बाई आहे. बाबरी मशीद पाडल्यावर जो हिंसाचार झालां त्यात तिचे जवळचे लोक मारले गेले म्हणून ती दुष्ट झाली'. आता ह्या पोस्टवर हसावं का रडावं ते मला कळेना. एक तर हिटलरच्या कुटुंबाला असं काही सोसावं लागलं असेल  तरी त्यामुळे त्याला ज्यू लोकांचं शिरकाण करायचा परवाना मिळाला असं होत नाही. दुसरं हे की बाई हिटलर चांगला होता हे गृहीत धरून त्याला सूट होतील अश्या थिअरिज मांडायचा प्रयत्न करत होत्या मग त्या थिअरिजमध्ये काही ताळमेळ असो वा नसो. आणि त्या थिअरिजमध्ये लॉजिक नावाच्या गोष्टीचा पूर्ण अभाव. शेवटी मी एव्हढच लिहिलं की तुमची ती बाई आपल्या दु:खाला ज्यांना जबाबदार धरत होती त्यांना मारत सुटली नाही त्यावरून सिद्ध होतं की असं करणारा हिटलर माथेफिरू होता. आणि त्याने केलेल्या कृत्याचं काहीही केलं तरी समर्थन होऊ शकत नाही.

ह्यावर बाई गप्प बसल्या. पण दुसर्या एका महाभागाने पोस्ट केली की गेल्या १०० वर्षातल्या ज्यू लोकांच्या लोकसंखेचा अभ्यास केला तर दिसून येतं की त्यात अजिबात घट झालेली नाही. म्हटलं जाऊ देत. मौनं सर्वार्थसाधनम्|

No comments: