Monday, May 26, 2014

जय मल्हार

ह्या सिरीयलचा पहिला एक तासाचा एपिसोड मोठ्या उत्सुकतेने पाहिला. पण पदरी निराशाच आली. :-( काळेकुट्ट, ढेरपोटे, खदखदा हसणारे stereotyped राक्षस, पांढर्याधोप लांब दाढ्या वाढवून फिरणारे stereotyped ऋषी आणि अतिशय ठोकळेबाज संवाद. कुठल्याही सिरीयलच्या नायिकेचे केस तिच्या पहिल्यावहिल्या शॉटमध्ये वाऱ्याने उडालेच पाहिजेत असं कुठे लिहिलंय का? बिचारया महालसेची सुध्दा त्यातून सुटका झालेली नाही. गोल्डन एरातल्या कुठल्याही चित्रपटांत आढळायची तशी मुलीच्या लग्नाची काळजी करणारी आई आणि 'अजून ती अल्लड आहे' असं म्हणणारा बाप हेही ह्या पौराणिक मालिकेत आढळतात. महालसा सायकलवरून गाणी गात फिरायच्या ऐवजी शंकराच्या पूजेसाठी फुलं गोळा करत फिरते एव्हढाच काय तो फरक. खंडोबा देवाचा अवतार असल्याने त्यालां आईवडील नसणार म्हणून बरंय. नाहीतर ह्या मालिकेत पण सासू-सून संघर्ष दाखवायला झी वाल्यांनी कमी केलं नसतं. आणि हो, खंडोबा सिंहासनावर नीट टेकून बसायच्या ऐवजी 'रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग' असल्यासारखा तलवार जमिनीवर टेकवून पुढे झुकून का बसतो? ते बघून माझ्याच पाठीत उसण भरल्यासारखी झाली त्या दिवशी.

एक तासाचा हा अत्याचार पाहिल्यावर माझी हौस पुरी फिटली. पुढचा एकही एपिसोड पाहण्याचं धाडस पुन्हा काही मला झालं नाही. :-( ह्या मालिकेचा कोणी डायरेक्टर आहे त्याने स्टार प्लसचं 'महाभारत' पाहावं अशी माझी त्याला/तिला कळकळीची विनंती आहे.

No comments: