Tuesday, May 27, 2014

वेध महामानवाचा - डॉक्टर श्रीनिवास सामंत

खरं सांगायचं तर शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकांनंतर शिवाजी महाराज आणि मराठी राज्य हे आयुष्यात फार कमी वेळा आले. शिवजयंतीच्या दिवशी, प्रतापगड, सिंहगड, रायगडला गेले तेव्हा आणि राजांबद्दल राजकीय पक्षांनी वाद उकरून काढले त्याबद्दल वर्तमानपत्रात वाचलं तेव्हा. पण मोडीच्या क्लासमध्ये सरांनी आवर्जून ह्या पुस्तकाबद्दल सांगितलं. सहज म्हणून लायब्ररीत चौकशी केली आणि पुस्तक घेऊनच घरी आले.

कुठलंही पुस्तक मी प्रस्तावनेपासून वाचते. :-) पण ह्या पुस्तकाची प्रस्तावनाच एव्हढी मोठी की 'नमनाला घडाभर तेल' असला प्रकार झाला. शेवटी प्रस्तावनेचा नाद सोडून दिला आणि थेट पुस्तक वाचायला सुरुवात केली. अहो आश्चर्यम! शाळेत इतिहासाच्या पुस्तकांनी कंटाळवाणे करून टाकलेला हिंदवी स्वराज्याचा इतिहास अक्षरश: जिवंत झाला. शिवाजी महाराज नव्याने मला भेटले. अफझलखानाचा वध, पावनखिंड, शाहिस्तेखानाची बोटं छाटण्याचा प्रसंग, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका ह्या घटना जवळपास सर्वानाच ठाऊक आहेत. पण ह्यातली प्रत्येक घटना घडण्याआधीची राजकीय, सामाजिक परिस्थिती, राजांकडे असलेले पर्याय, परिस्थितीनुरूप असलेल्या मर्यादा, त्यातून त्यांनी निवडलेल्या मार्गाची कारणमिमांसा, केलेली तयारी, प्रत्येक मोहिमेत सामील झालेल्या सहकाऱ्यांपैकी प्रमुख लोकांविषयी माहिती, मोहिमेच्या यशापयशाची चर्चा, आदिलशाही, निजामशाही, मोघल आणि सिद्दी ह्या शत्रूबद्दल विवेचन ह्या व अश्या अनेक प्रकारच्या माहितीने हे पुस्तक समृध्द झालेलं आहे. शाळेत असताना इतिहास अश्या पद्धतीने शिकवला गेला असता तर तो अधिक उपयोगी ठरला असता असंही वाटून गेलं. पण विद्यार्थ्याना शिकवायचं ते त्यांना परीक्षेत पास होता यावं इतपतच ह्या विचारसरणीच्या शिक्षणपध्दतीत हे कधीकाळी होईल असं वाटत नाही. :-( तसंच तोरण्यावर मिळालेलं गुप्त धन आणि भवानी मातेने दिलेली तलवार ह्याबद्दल जी थिअरी मांडली आहे ती एकदम practical वाटते.

असो. आता मला खटकलेल्या काही गोष्टीं. रोहिडेश्वराची शपथ ही स्वराज्याच्या प्रवासाची सुरुवात. ह्या घटनेबद्दल पुस्तकात कमी माहिती आहे. पावनखिंड व पुरंदर प्रकरणात अनुक्रमे बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी ह्यांच्या शौर्याचा जसा विस्ताराने उल्लेख आहे तसा उल्लेख सिंहगड घेण्याच्या प्रसंगात तानाजीबाबत केलेला नाही. महाराजांनी अनेक गोष्टी योग्य केल्या पण काही बाबतीत चुकाही झाल्या. ह्या चुकांचा उल्लेख निसटता केला गेलाय. ह्याचंही विस्ताराने विवेचन होणं पुस्तक परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक होतं. पण एकदा एखाद्याला 'देव' किंवा 'महामानव' म्हटलं की त्या व्यक्तीत दोष काढणं मुश्कील होऊन बसतं. कदाचित ते controversial होईल म्हणूनही टाळलं गेलं असावं. त्यामुळे वाचकाचं नुकसान झालंय ह्यात वादाचा मुद्दाच नाही. स्वराज्यातल्या सर्वसामान्य लोकांचं आयुष्य कसं होतं तसंच महाराजांचा दरबार कसा चाले ह्याबद्दल काही माहिती उपलब्ध असल्यास ती समाविष्ट केली गेली असती तर बरं झालं असतं.

ह्या त्रुटी जमेस धरूनही मी असंच म्हणेन की शिवाजी महाराज कसे होते हे ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.

No comments: