Friday, August 10, 2012

हाथी घोडा पालखी जय कन्हैयालालकी


अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अश्या अवेळी पैलतीरावर
आज घुमे कां पावा मंजुळ

मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुनी अपुले तनमन

विश्वची अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव


डॉक्टर राजेंद्र बर्वे ह्यांच्या 'मनमोराचा पिसारा' ह्या लोकसत्तातल्या सदरात इंदिरा संतांच्या कवितेवरच्या गाण्याच्या ह्या ओळी काल वाचल्या आणि त्यांनी सदरात म्हटलंय तसंच वाटून गेलं. कृष्णाची सावळी पावलं तिथे फिरली तेव्हा मीही तिथे असेन का? गोपकुलातली कोणी म्हणून, गोकुळाच्या गोधनातली एखादी गाय म्हणून? निदान ज्याच्याखाली रास रंगला त्या कदंब वृक्षाची एखादी फांदी म्हणून तरी?  तसंच असावं नाहीतर वाहनाचे हॉर्न्स, लोकांचा कोलाहल, माझ्याच मनातले अव्याहत चाललेले विचार सगळ्या सगळ्याना पार करून एखाद्या बासरी विकणार्याच्या बासरीचे सूर मला सरत्या संध्याकाळी स्पष्ट कसे ऐकू येतात? का हुरहूर लावतात? एका हातात बासरी घेतलेलं, दुसरा हात मडक्यातल्या लोण्यात घातलेलं, डोक्यावर मोरपिसाचा मुकुट घातलेलं कृष्णाचं हसरं बाळरूप का मोह पाडतं?

माझ्याकडे उत्तर नाहीये आणि आहे पण. जगण्याच्या धबडग्यात त्याची गीता वाचायचा केलेला निश्चय हरवून गेला होता. आता पुन्हा सुरुवात करायला हवी. आजच्यापेक्षा अधिक चांगला मुहूर्त कुठे मिळणार? गीतेच्या पानापानांतून जसा तो मला कळेल तशीच मीही त्याला कळेनच की.

तू जिसे चाहे वैसी नही मै
हा तेरी राधा जैसी नही मै
फिरभी हू कैसी, कैसी नही मै
कृष्णा, मोहे देख तो ले एक बार
कान्हा कान्हा आण पडी मै तेरे द्वार

No comments: