Sunday, February 12, 2012

मी रेवती देशपांडे

कुठल्याही नाटकाचा रिव्ह्यू वाचल्याशिवाय मी नाटक पहायला जातच नाही. ह्याबद्दल माझा एका नाटकवेड्या मैत्रिणीशी नेहमी वाद होतो. 'रिव्ह्यू वाचून गेलं तर नाटकाच्या गोष्टीबद्दलं काय उत्सुकता राहणार' हा तिचा सवाल तर 'रिव्ह्यू न बघता गेलं आणि नाटक आवडलं नाही तर पैसे फुकट नाही का जाणार' हा माझा युक्तिवाद. शेवटी दोघी आपापल्या मतांवर ठाम राहतो.

तर 'मी रेवती देशपांडे' चा रिव्ह्यू वाचला तेव्हा नाटकात काय ट्विस्ट असणार ह्याची साधारण कल्पना आली होती. पण तरीही ते पहावंसं वाटलं कारण असा विषय रंगभूमीवर हाताळला जातोय ह्याचं कौतुक् आणि तो कसा हाताळला गेला असेल ह्याबद्दलचं कुतूहल.

प्राध्यापक रविशंकर साने आणि त्यांच्या कुटुंबाची ही गोष्ट. साने पुरुषांपेक्षा बायकांच्या घोळक्यात जास्त रमतात आणि टिपिकल 'बायकी' समजल्या जाणार्या विषयांत जास्त रस घेतात असं त्यांच्या बायकोचं आणि मुलाचं मत. तर सुनेला - जी त्यांची माजी विद्यार्थिनीही आहे - सासऱ्यांच्या रसिकतेचं कौतुक. लग्न होऊन एक वर्ष होत नाही तोच सुनेला मातृत्त्वाची चाहूल लागते. सगळ्या घराला आनंदाने न्हाऊ घालणारी ही बातमी असते खरी पण तेव्हाच घरात एक पत्र येतं - प्राध्यापक सान्यांच्या जुन्या सखीचं, रेवती देशपांडेचं. बंगल्याच्या आऊटहाउसमध्ये तिचं पैजण, तिची लिपस्टिक, मोगर्याचा गजरा वगैरे गोष्टी मिळतात आणि सानेची बायको आणि मुलगा बिथरतात. वारंवार विचारूनही त्यांच्याकडून, प्राध्यापकांकडून किंवा घरी येणार्या डॉक्टर जयंताकडून काही खुलासा मिळत नाही म्हणून सून गोंधळते. घरात एक वादळ उठतं आणि एकामागोमाग येणार्या रेवतीच्या पत्रांनी परिस्थिती चिघळत जाते. कोण असते ही रेवती देशपांडे? सान्यांच्या कुटुंबासमोर ती का येत नाही? तिचं आणि सान्यांचं नेमकं काय नातं असतं?

रेवती देशपांडे नक्की कोण आहे ह्याची प्रेक्षकांना अंधुकशी कल्पना आलेली असली तरी २ अंकाच्या ह्या नाटकात त्याबद्दलची उत्सुकता जवळजवळ शेवटापर्यंत कायम ठेवण्यात लेखक-दिग्दर्शक बर्यापैकी यशस्वी झालेत. प्राध्यापक रविशंकर साने ह्या भूमिकेत मोहन जोशी चपखल बसतात. त्यांच्या बायकोची आणि मुलाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या कलाकारांनीही छान अभिनय केला. फक्त सुनेची व्यक्तीरेखा थोडी माठ वाटली. आणि डॉक्टर जयंत म्हणून रमेश भाटकरांची निवड निदान मला तरी पटली नाही.

एका गोष्टीचं फार वाईट वाटलं - प्राध्यापक सानेच्या काही संवादांवर आणि लकबीवर काही प्रेक्षक् हसत होते. ह्यात चूक व्यक्तीरेखेचीही नाही आणि जोशींच्या अभिनयाचीही नाही. अश्या व्यक्तींकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोणच ह्या वागण्यातून अधोरेखीत झाला आणि त्यामुळे अश्या विषयांवरची नाटकं - मग ती पचायला, पटवून घ्यायला कितीही अवघड असली तरी - रंगभूमीवर येणं किती गरजेचं आहे हेही जाणवलं.

एरव्ही जो विषय टाळण्यातच मी शहाणपण मानलं असतं त्यावर १-२ तास का होईना पण विचार करायला लावल्याबद्दल रेवती तुझे आभार मानावेत तेव्हढे थोडेच आहेत.

No comments: