Thursday, October 13, 2011

फ़िरसे आईयो बदरा बिदेसी

काल संध्याकाळी ऒफ़िसच्या बाहेर पडले आणि दचकलेच. केबिनमधून बाहेर पडताना मोबाईलच्या घडयाळात ६:१५ झाले होते आणि बाहेर ७ नंतर होतो तसा मिट्ट काळोख. अरेच्चा! कॆबिन ते मुख्य दरवाजा एव्हढं अंतर पार करायला एव्हढा वेळ लागला आपल्याला? तेव्हढ्यात गडगडाट ऐकायला आला आणि चमकून आकाशाकडे पाहिलं. आभाळ चक्क भरून आलं होतं. आज? मला तर वाटलं होतं की मॊन्सून गेला टाटाबायबाय करून. पण एखाद्या चिमुकल्या गोड पोराने लपाछपीच्या खेळात गायब व्हावं आणि आपण ’कुठे गेला, कुठे गेला’ म्हणेतो टाळ्या पिटत हसत समोर यावं तस्साच आला होता. आनंदाला पारावार नसणे म्हणजे काय त्याचा अनुभव घेतला मी काल.

घरी पोचेतो मस्त पाऊस सुरु झाला होता. सगळ्या एफ़एम चॆनेल्सवर आरजेंना नुस्ता कंठ फ़ुटला होता. जिकडेतिकडे ’क्या मौसम है यार’ अश्या सुरुवातीने एकसे एक बढके गाणी वाजत होती. मी आपली संगीताच्या तालावर नेहमीचा व्यायाम करू का चकाकणाया विजांच्या पार्श्वभूमीवर डोलणार्य़ा झाडांकडे पाहू ह्या द्विधा मन:स्थितीत. शेवटी अगदी न रहावून चांगला मिनिटभराचा व्हिडिओ रेकॊर्ड करून घेतला. मोबाईलची व्हिडिओ फ़ॆसिलिटी यथातथाच आहे. त्यामुळे आधी नुस्ताच काळोख दिसतोय पण मधेच वीज चमकली की टॊर्च मारल्यासारख्या लख्ख प्रकाशात डोलणारी झाडं दिसताहेत आणि विजेचा, पावसाचा मस्त आवाज येतोय त्यात. एका ठिकाणी तर लकाकणारी वीज पण मस्त कॆप्चर झाली आहे. वा! आता पुढल्या वर्षी पाऊस येईतो ही क्लिप पुन्हा पुन्हा पहाणार.

एव्हढं लिहितेय तोवर पुन्हा आत्ता पावसाचा ताशा वाजतोय. जाणारा पाऊस म्हणून त्याचं जास्तच कौतुक करावंसं वाटतंय. शक्य झालं असतं तर त्याचा गालगुच्चा घेऊन कानावर बोटं मोडून त्याची अलाबला सुध्दा घेतली असती मी. कसं रे रहायचं तुझ्याशिवाय पुढच्या जूनपर्यंत?

आज एक व्हिडियो पुन्हा रेकॊर्ड करून घेतेच. ’तुम्हारे वापस आने तक मेरे जीनेका सहारा तो होगा’ :-)

No comments: