Monday, October 10, 2011

चिठ्ठी ना कोई संदेस......

माझी गझलची पहिली ओळख झाली ती घरी असलेल्या स्टिरिओ सिस्टीमसाठी असलेल्या मोठाल्या तबकडीतल्या जगजीत-चित्राच्या गाण्यांनी. रात्रीची जेवणं झाली की ह्या तबकडीवर शोलेचे सगळे संवाद ऐकणं हा एक कार्यक्रम असायचा तसाच जगजीत-चित्राच्या गझला ऐकायचाही. खरं तर मला स्वत:ला चित्रा सिंगचा आवाज कधीच आवडला नाही. पण केवळ जगजीतला (का कोणास ठाऊक पण त्याचा एकेरीतच उल्लेख करावासा वाटतोय. त्याचा आवाज खूप जवळचा वाटतो म्हणून असेल कदाचित) ऐकायला मिळावं म्हणून मी तिचा आवाज सहन करायची, आजही करतेय. त्या लहान वयात गझलांचे अर्थ कळणं अशक्यच होतं. तरी त्या आवडायच्या. मोठी झाले आणि त्यातला अर्थ उमगायला लागला - शब्दांतून आणि जगजीतच्या आवाजातून. मग तर ह्या गझला जीव की प्राण झाल्या. २-३ महिन्यांपूर्वी वॊकमनवर ठेवण्यासाठी गाणी डाऊनलोड केली तेव्हासुध्दा paapuyaar वर गझल्सचा फ़ोल्डर बघून जगजीतच्या गझल्स हावरटासारख्या डाऊनलोड करून घेतल्या होत्या - ये दौलत भी ले लो, पहले तो अपने दिलकी रझा जान जाईये, पत्थरके खुदा, मुझको यकी है सच कहती थी, कैसे कैसे हादसे सहते रहे, अगर हम कहे और वो मुस्कुरा दे, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, होठोंसे छू लो तुम.........

काही दिवसांपूर्वी षण्मुखानंदमध्ये जगजित आणि गुलाम अलींच्या एकत्र कार्यक्रमाची जाहिरात पाहिली तेव्हा जायचा विचार केला होता पण म्हटलं पुढे जाऊ कधीतरी. तेव्हा थोडंच माहित होतं की आता संधी मिळणारच नाहिये. :-(

जगजीत, तू आता सगळ्याच्या पलिकडे गेला आहेस. कदाचित मी लिहिलेलं तुझ्यापर्यंत पोचणारही नाही. पण तरी मी लिहितेय. तुझ्या आवाजाने मला खूप काही दिलंय - सुखाच्या प्रसंगात आणि दु:खाच्या प्रसंगात सुध्दा. गझल कितीही दर्दभरी असली तरी तुझा आवाज ऐकला की मनाला शांतच वाटलंय आणि ह्यापुढेही वाटत राहील. आज संध्याकाळी तुझाच आवाज ऐकणार आहे. आजकी शाम तेरे नाम. तुझे आभार मला फ़क्त असेच मानता येतील.

तरी पण तुझं जाणं अवेळीच होतं. एव्हढी घाई करायला नको होतीस.

चिठ्ठी ना कोई संदेस, जाने वो कौनसा देस
जहा तुम चले गये
इस दिलपे लगाकर ठेस, जाने वो कौनसा देस
जहा तुम चले गये

No comments: