Saturday, March 23, 2019

महालक्ष्मी सरस २०१९


ह्या प्रदर्शनाला जवळपास २ महिने लोटले. लिहेन लिहेन म्हणत लिहायचं राहून गेलं होतं. तेव्हा म्हटलं आता लिहावं. 

मी गेली ३-४ वर्षं ह्या प्रदर्शनाला जातेय. आधी ते रेक्लेमेशनला भरायचं. आता मला वाटतं गेल्या वर्षीपासून बीकेसीला असतं. पहिली १-२ वर्षं मी तिथे जेवणसुध्दा घेतलं आहे. पण तेव्हा तिथे राजस्थान, दिल्ली अश्या राज्यांचेही स्टोल्स असायचे. गेली काही वर्षं नुसते महाराष्ट्रातले स्टोल्स असल्याने सगळीकडे तोच तोच तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, गावरान चिकन, भाकरी, सोलकढी, तळलेले मासे असं दिसायला लागलंय. जेवणातलं नाविन्य संपून गेलं. तरी एकदा एक थाळी मागवली होती. नुसता भाताचा डोंगर, त्याला पुरेल एव्हढा रस्साच नाही. स्टोलवर गेस दिसत होता पण जेवण मात्र गारढोण. तेव्हापासून कानाला खडा लावला. अजिबात जेवायचं नाही. नुसती खरेदी करायची. ह्यावेळी बाजारात कुठेच ज्वारीचाच काय पण गव्हाचासुध्दा हुरडा मिळाला नव्हता. पावसाने ओढ दिल्याने हुरडयाची खास ज्वारी असते तिचं पीक आलंच नाही असं काहीतरी पेपरात आलं होतं. इथे हुरडा नाहीतर किमानपक्षी हुरडयाचं थालीपीठ मिळेल असं वाटलं होतं. पण हुरडा तर नव्हताच आणि थालीपीठसुध्दा हुरडयाच्या पीठाचं होतं. फार हिरमोड झाला. :-(

खरेदीच्या स्टोल्समध्येसुध्दा पूर्वी बरंच नाविन्य असायचं. गेल्या काही वर्षांपासून तेही गेलंय बरंचसं. त्यामुळे मी आता काही ठराविक गोष्टीच घेते – बेळगावचा (पुरोहितचा) कुंदा, फणसाच्या चिप्स, केरळचा हलवा. ह्यावेळी सांगलीच्या भडंगसोबत जयसिंगपूरचीसुध्दा भडंग मिळाली. गुळाची मुलायम पट्टी घेतली. एका दुकानात गव्हाचा अप्रतिम चिवडा मिळाला. तो पुढल्या वर्षीही नक्की घेणार. एकीकडे नाचणीची बिस्कीटस घेतली. आंब्याच्या शेवयासुध्दा होत्या पण घ्यायचा धीर नाही झाला. शेवाळापासून बनवलेली चॉकलेटस विक्रीला असणार असं पेपरमध्ये वाचलं होतं पण ती काय कुठे दिसली नाहीत. चुल आणि जाती पण होती विकायला. दोन्ही इतकी क्युट होती की अगदी घ्यायचा मोह झाला होता :-) डाळी मात्र एकाच दुकानात होत्या. खरं तर डाळी आणि बाकी धान्यं विकणाऱ्या दुकानांची संख्या जास्त असायला हवी.

असो. आणलेले सगळे पदार्थ झक्कास होते. फेरी सार्थकी लागली.

No comments: