Friday, March 22, 2019

५. लोकमत (दिवाळी अंक 2018)


गेली काही वर्षं मी लोकमतचा दिवाळी अंक घेतेय. अंकाने एकदाही निराश केलेलं नाहीये. इतकंच काय तर लोकमतचं वर्तमानपत्र घेऊन पहावं काय असाही विचार कट्टर ‘लोकसत्ता’ fan असलेल्या माझ्या डोक्यात येऊन गेलाय इतकं सरस लेखन ह्या अंकात दरवर्षी असतं. मला जर फक्त २-३ अंकच घ्यायचे असतील तर मी लोकमत, किल्ला आणि भवताल ह्या ३ अंकांची डोळे झाकून निवड करेन.

ह्या वर्षीचा अंकसुध्दा पुरेपूर वैचारिक खाद्य देणारा होता ह्यात शंकाच नाही. मग तो अफगाणिस्तानमध्ये डॉक्टर अहमद सर्मस्त ह्यांनी काढलेल्या ‘जोहरा’ नावाच्या वाद्यवृंदावरचा लेख असो की सोनम वांगचुक ह्यांच्या लडाखी शाळेवरचा लेख असो. आसाममध्ये एनआरसी वरून चाललेल्या गोंधळावरचा लेख असो नाहीतर गडचिरोली, भामरागड, दांतेवाडा आणि सुकमा हा नक्षलवादी भाग कशी कात टाकतोय त्यावरचा लेख असो. मध्येच एका लेखात आपल्याला ‘कयामतसे कयामत’ वाल्या मन्सूर खानने कुन्नूरमध्ये सुरु केलेल्या फार्मस्टेची माहिती मिळते. आंध्र प्रदेशात टेक्नोलॉजीचा वापर करून रोजगार हमी योजना अधिक लोकाभिमुख कशी करण्यात आलेय त्याबद्दल वाचायला मिळतं (महाराष्ट्राच्या प्रगतीचा डंका (उगाचच!) पिटणाऱ्या फडणवीस सरकारने हा लेख वाचायला हवा एकदा). उत्तर कोरियाच्या मानाने पुढारलेला समजल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियातल्या जगण्यातले काही पैलू एखाद्या लेखातून उलगडतात.

एकीकडे स्त्रियांच्या घसरत्या जन्मदराबद्दल कुप्रसिध्द असलेल्या हरयाणातले नवे बदल मनाला सुखावून जातात तर दुसरीकडे युपीएससीच्या बाजाराबद्दल वाचून मन खंतावतं. काही लेख राहुल गांधी, दीपिका पादुकोण ह्यासारख्या well-known  व्यक्तींबद्दल काही वेगळी माहिती देतात तर एखादा लेख बेगम फरीदा खानम ह्यांच्यासारख्या (निदान माझ्यासाठी तरी!) अनोळखी व्यक्तीची ओळख करून देतात. अंकाचा समारोप गावाकडच्या गोष्टी घेऊन वेबसिरीज बनवणार्या तरुण मंडळीवरच्या लेखाने होतो.

थोडक्यात काय तर लोकमतचा दिवाळी अंक वाचायला मिळावा म्हणून तरी ह्या वर्षी दिवाळी लवकर यावी असं पुन्हा एकदा वाटून गेलं J

No comments: