Tuesday, January 10, 2017

५. किल्ला - दिवाळी अंक २०१६

२०१५ च्या दिवाळीतला 'किल्ला'चा अंक इतका माहितीपूर्ण आणि देखणा होता की तो रद्दीत द्यायला माझा जीव होईना. आणि खरं सांगायचं तर तो वाचून निदान जमतील तेव्हढे आणि जमतील तसे किल्ले पाहायचे अशीही एक इच्छा झाली होती. त्यामुळे माहिती हाताशी असावी म्हणून अंक जपून ठेवला आणि २०१६ मध्येही दिवाळीत हा अंक घ्यायचं ठरवलं होतं. मागच्या वर्षी एकाही किल्ला पाहून झाला नाही ते सोडून दया. उम्मीदपे दुनिया कायम है.

तर आता २०१६ च्या अंकाविषयी. मुखपृष्ठ मागच्या वर्षीच्या अंकासारखंच देखणं. 'गडपुरुष' हा पहिलाच लेख वाचून आपण गोनीदा वाचले नाहीयेत ह्याची भयानक लाज वाटली. लायब्ररी पुन्हा जॉईन केल्यावर त्यांची किल्ले, दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन, शिवतीर्थ रायगड ही पुस्तकं आणि पवनाकाठचा धोंडी, जैत रे जैत, माचीवरला बुधा, वाघरू, गडदेचा बहिरी ह्या कादंबर्या ह्यातलं जे जे मिळेल ते ते सारं वाचून काढायचं असं ठरवलंय. पाठोपाठचा 'दुर्गांचे GPS' हा लेखही माहितीपूर्ण पण थोडा क्लिष्ट वाटला.

२०१५ पासून ह्या अंकात महाराष्ट्रातला एक किल्ला, महाराष्ट्राबाहेरचा पण भारतातला एक किल्ला आणि विदेशातला एक किल्ला ह्यावर एकेक लेख असतात. त्यावरून किल्ले जतन करण्यात आपण कुठे आहोत आणि काय काय करायला हवंय ते वाचकांना लक्षात यावं म्हणून हा उपक्रम. २०१६ च्या दिवाळी अंकात हरिश्र्चंद्रगड, चितोडगड आणि इंग्लंडमधला वॉरविक अश्या तीन किल्ल्यांबद्दल लेख आहेत. समुद्रात स्मारकं बांधायला निघालेल्या नेत्यांनी एकदा हे लेख वाचावेत म्हणजे शिवाजीमहाराजांचं खरं स्मारक काय ठरेल ह्याबद्दल त्यांचं जरा ज्ञानप्रबोधन होईल.

'वाव संस्कृती' हा लेख खूप आवडला. दोनेक वर्षांपूर्वी अहमदाबादच्या ट्रीपमध्ये 'अदलज वाव' पाहिली होती त्याची आठवण झाली. अर्थात सुलतान महमूद बेगडाच्या हाती लागू नये म्हणून राणी रुदाबाईने ह्यात उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आणि दरबारातल्या पुरोहित आणि संतांनी त्यात नंतर आंघोळ करून वावेला पुन्हा पवित्र करावं असं तिने आधीच सांगून ठेवलं होतं वगैरे इतिहास मला ठाऊक नव्हता. लोकांनी, मग ते साधू वगैरे का असेनात, आंघोळ केल्यावर ते पाणी इतरांनी प्यायला वापरणं मला तरी काहीतरीच वाटलं. पण असतात एकेकाच्या श्रद्धा. तो काळ वेगळा होता. असो. जमलं तर पाटणमधली 'राणी की वाव' आणि मोढेरा एकदा बघायचं आहे. देवा रे! हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिशपे दम निकले हे शब्दश: खरं आहे. एव्हढंसं आयुष्य आणि करायचंय किती.

'दुर्गप्रतिमा' आणि 'तिकोना' वाचून सुधागड आणि तिकोना 'एकदा बघून यायचे किल्ले' ह्या यादीत समाविष्ट झाले. 'शिवराई आणि मराठेकालीन चलन' हा शिवकाळातील नाण्यांविषयीचा लेख माहितीपूर्ण. 'गगनचुंबी साल्हेर' वाचून 'शोध' कादंबरीची आठवण झाली.

'वारूळ: एक अभेद्य किल्ला' हा लेख माहितीपूर्ण असूनही थोडा विस्कळीत वाटला.'गिरीदुर्ग जैसे चालते' थोडा आध्यात्मिक लेख असल्याने वरवर चाळला. हे असे लेख वाचण्याइतकी आध्यात्मिक प्रगती अजून झालेली नाही आणि होईल की नाही तेही ठाऊक नाही. खोटं कशाला बोला? 'दुर्गरंग' वाचून (आणि पाहून!) देव एकेकाच्या बोटात कशी कला ठेवतो ह्याचं आश्चर्य वाटलं.

'किल्ला' चा हाही अंक रद्दीत न जाता पुस्तकांच्या कपाटात जाऊन बसलाय हे वेगळं सांगायला नको. :-)

No comments: