Tuesday, December 20, 2016

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता गेल्यावर व्हॉटसएपवर आलेले काही मेसेजेस चांगलेच खटकले. जयललिता ह्या अविवाहित होत्या. त्यामुळे त्यांचा 'एकाकी राजकन्या' असा उल्लेख करून त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या जवळचं असं कोणीही नव्हतं ह्यावर एक मेसेज होता. मला एक सांगा - जेव्हा पंतप्रधान मोदी किंवा अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्यासारखे नेते जातील तेव्हा त्यांचाही ते एकाकी होते म्हणून उल्लेख होईल का? उत्तर दुर्देवाने नाही असंच आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दलच लिहिलं जाईल. पण बाई अविवाहीत असणं म्हणजे मोठा सामाजिक गुन्हा असल्यासारखं लोक वागतात. तिने लग्न केलं नाही म्हणजे ती एकाकीच असणार हे धरून चालतात. तरी बरंय जयललिता म्हणाल्या होत्या की स्त्रीने मुलंबाळं हवी असतील तर लग्न करावं, आपल्याला सांभाळायला पुरुष पाहिजे म्हणून नाही. पण हे कोणी लक्षात घेईल तर ना.

असेच काही मेसेजेस त्यांनी एमजीआर ह्यांचा उपयोग करून राजकारणात केलेल्या प्रवेशावर होते. खरं तर जयललिता ह्या अत्यंत हुशार होत्या. हिंदी आणि इंगजी ह्या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्त्व होतं. त्यांचं भाषण ऐकून इंदिरा गांधी सुध्दा प्रभावित झाल्या होत्या असं पेपरात आलं होतं. पण आपल्या पुरुषप्रधान देशात लोकांना हे दिसत नाहीच. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे माझ्या एका सरांनी ज्ञानेश्वरांच्या कुठल्याश्या ओवीचा संदर्भ देऊन स्त्रीला रूप आणि बुद्धी दोन्ही असले म्हणजे ती त्याचा पुरेपूर उपयोग करून घेते असला काहीतरी मेसेज फोरवर्ड केला होता. ज्ञानेश्वरांच्या ओवीचा असला काही अर्थ असेल असं मला वाटत नाही आणि असलाच तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असंच मी म्हणेन. तसं मी सरांना कळवलंसुध्दा.

'देवलोक' च्या दुसर्या सिझनचे एपिसोड्स पहाताना देवदत्त पटनाईक जेव्हा देवीच्या शक्तीचा पुन्हापुन्हा उल्लेख करतात तेव्हा राहूनराहून वाटतं की देवीच्या शक्तीरुपाची पूजा करणारा आपला भारतीय समाज असा कसा बदलला? का हा दांभिकपणा युगानुयुगं चालू आहे? :-(

No comments: