Tuesday, December 20, 2016

३. लोकसत्ता - दिवाळी अंक २०१६

'शितावरून भाताची परिक्षा' करावी असं म्हणतात. अंकाचं 'संपादकीय' वाचून हा अंक आवडेल अशी आशा वाटायला लागली. 'अंतरंग' ही अनुक्रमणिका बघून लेखांचे विषयसुध्दा मस्त वाटले.

आंतरराष्ट्रीय राजकारण हा माझा नेहमीच आवडीचा विषय राहिला आहे. त्या दृष्टीने 'पंतप्रधान ते अध्यक्ष व्हाया' हा पुतीन ह्यांच्यावरचा लेख खूप आवडलाच पण 'देशोदेशीचे ट्रम्प' ह्या सदरातले सगळे लेखसुध्दा अतिशय माहितीपूर्ण होते. अर्थात हे लेख मी २ महिने उशिरा वाचत असल्याने संदर्भ बरेच बदलले आहेत. पण ह्या लेखांत वर्तवलेल्या शक्यता आणि प्रत्यक्षातली परिस्थिती ह्यात किती साम्य आणि किती फरक आहे हेही त्यामुळे पाहता आलं.

'सजनवा बैरी हो गये हमार' हा गीतकार शैलेन्द्र ह्यांना 'तिसरी कसम' हा चित्रपट बनवताना आलेल्या अनुभवांवरचा, 'नेताजी फाईल्स' हा सुभाषचंद्र बोस ह्यांच्या गुढ मृत्यूवरचा आणि 'पेंक्रीची कमाल' हा स्वादुपिंडावरचा हे सर्व लेख सुध्दा सुरेख. 'पेंक्रीची कमाल' वाचून तर असं वाटलं की एव्हढ्या सोप्या भाषेत अधिक मेडिकल माहिती मिळाली तर मजा येईल. लोकसत्ताने ह्या विषयावरचं अनिल अवचट ह्यांचं सदर नव्या वर्षात सुरु करायला हवं. 'कार्यसंस्कृती: वर्ल्ड कॉर्पोरेट कंपन्यांची' ह्या सदरातले ३ लेख आणि 'शंभरीचा रणगाडा' वाचनीय. 'संस्कार महत्त्वाचे' मधली व्यंगचित्रं आवडली.

'अनवट भटकंती' मधले पोम्पे, काबुल, रोद्रीग्ज द्वीपसमूह, सुदान, उझबेकिस्तान, कंबोडीया हे सगळेच लेख वाचनीय. एव्हढंच आहे की ह्या जगात किती किती आणि काय काय बघायचं राहिलंय हे लक्षात येऊन थोडी खिन्नता आली :-) काबुल बघायला मिळायची शक्यता धुसर दिसते पण पोम्पे, उझबेकिस्तान आणि कंबोडीया माझ्या यादीत जाऊन बसलेत.

'शोध शेक्सपियरचा' हा लेख शेक्सपियर वाचला नसल्याने फारसा भावला नाही ह्यात चूक सर्वस्वी माझी. 'सर्जनचिंतन: आत आणि बाहेर' आणि 'एक सदारंग खयाल' हे दोन्ही लेख मात्र पूर्ण बाउंसर गेले.

थोडक्यात काय तर दिवाळी अंकांकडून मनोरंजन आणि ज्ञानवृद्धी ह्या ज्या दोन अपेक्षा असतात त्या ह्या अंकाने पुरेपूर पूर्ण केल्या त्याबद्दल माझ्याकडून १०० पैकी १०० मार्क्स :-)

No comments: