Friday, June 10, 2016

दरवर्षीप्रमाणे जून महिना लागला आणि सगळ्यांना पावसाचे वेध लागलेत. पण तरी सालाबादप्रमाणे माझी माथेरान फेरी मात्र झाली नव्हती. येत्या रविवारी कान्हेरी लेण्यांचा बेत असल्याने मागला रविवार म्हणजे पाउस सुरु व्हायच्या आधीची माथेरानला जायची शेवटची संधी. त्यामुळे चिक्कार गर्दी असेल ही धाकधूक मनात घेऊनच तिथे गेलो. नेहमीप्रमाणे 'लकीज रेस्टोरंट' मध्ये जेवणाचा बेत पार पडला. तसं बघायला गेलं तर हे हॉटेल जुनाटच. त्यातून सोफा आणि टेबल ह्यात बरंच अंतर असल्याने थोडं पुढे झुकून जेवावं लागतं. पण मला त्यांच्या हॉटेलचा डेकोर फार आवडतो. चित्रातला थोडा 'चिडका बिब्बा' वाटेल असा हत्ती, एका कोपर्यात ठेवलेले दोन पुतळे, त्यापलीकडे माश्यांचा tank, एका सोफ्याखाली मुटकुळं करून पडलेला कुत्रा, बाहेरच्या बागेत फिरणारे टर्कीज आणि कोंबडे, कौलारू छप्पर - सगळं सगळं इतकी वर्षं जाऊन इतकं ओळखीचं झालंय की त्यांनी ह्यात बदल केला तर मी तिथे जायचं सोडेन. :-) आजकाल जेवणाचे अनेक पर्याय तिथे उपलब्ध झालेत पण आम्ही लकीज मध्येच जातो. ह्या वेळी त्यांना जेवण आणायला थोडा उशीर झाला. त्यामुळे जेवून निघेतो जवळपास दुपारचा १ वाजला होता.



गर्दी असणार हा होरा दुर्देवाने खरा ठरला. त्यातून काही खरेदी करायची असल्याने बाजारपेठेपर्यंत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मिनी ट्रेन आजकाल बंद असल्याने रुळावरून बिनधास्त चालता येत होतं. पण तरी एकदा ह्या बाजूने, एकदा त्या बाजूने, उलट्या बाजूने येणाऱ्या लोकांना चुकवत असं करता करता दमछाक झालीच. त्यातून हवा म्हणावी तितकी थंड नव्हती. बाजूच्या रस्त्यावरून जावं तर घोडे धूळ उडवत होते. तरी पण चालत राहिलो. मध्येच एका झुडूपाजवळ गर्दी दिसली म्हणून जाऊन पाहिलं तर एक गर्द हिरवा साप वेटोळे बसला होता. आणि जनता त्याचे फोटो काढण्यात मग्न होती. तरी नशिब कोणी सेल्फी काढताना दिसत नव्हतं. :-) हरणटोळ म्हणतात तो हाच काय? तो उडी मारतो ना अंगावर? उगाच विषाची परीक्षा का घ्या म्हणून एक फोटो काढला आणि तिथून सटकले.


रुळावरून चालायला फारच अवघड होऊ लागलं तशी उडणारया लाल मातीची पर्वा न करता रस्त्यावरून चालायला सुरुवात केली. लागली थोडी मायभूमीची माती कपाळाला आणि डोक्याला म्हणून काय होतंय असा सुज्ञ (!) विचार केला. :-) शेवटी एकदाची बाजारपेठ आली. इथे सुध्दा खूप गर्दी होती. काय खरेदी करायची होती ती पटकन आटपली. तरी बरंय दुपारी दुकानं बंद असतील का काय (पुण्याला चितळेंचं असतं ना तशी!) ही भीती खोटी ठरली. तिथेच एका दुकानात बसून अमुलची mango candy खाल्ली. गारेगार वाटलं. आता पुढे जायला तय्यार.



रूळावरून परत कसरत करत मागे आलो. आणि आम्ही जिथे नेहमी जातो त्या ठिकाणी पोचलो. आता एखाद-दुसरा मुसाफिर आणि काही गावकरी सोडले तर आसपास 'मै और मेरी तनहाई'. असा मामला. जीवात जीव आला. त्यातून सूर्यनारायण ढगाआड लपलेले. त्यामुळे उन्ह नाही. हवेत थोडा गारवासुध्दा होता. एका कड्याजवळ बसकण मारली. आणि पुढचा दीड तास तिथून हललो नाही. मधूनमधून ऐकू येणारी एखादया पक्ष्याची शीळ आणि डोक्यावरून जाणाऱ्या विमानांचा हलका आवाज सोडला तर सामसूम. ह्या डोंगरांकडे पाहिलं की मला खूप कौतुक वाटतं. आपली पावलं आता इथे वळताहेत पण हे कित्येक वर्षापासून इथे उभे असतील, कसे बनले असतील. आता सगळीकडे हिरवं नव्हतं म्हणून करड्या रंगाच्या अनेक छटा दिसत होत्या. पावसाळ्यानंतर आलात तर हिरव्या रंगाचेसुध्दा अनेक प्रकार असतात हे इथं आल्यावर कळतं. मध्येच कोणी माणसाने शीळ घातल्यासारखी वाटली म्हणून मागे वळून पाहिलं तर कोणी नाही. शीळ परत एकदा घुमली आणि डोक्यात प्रकाश पडला - अरे हा तर व्हिसलिंग थ्रश. हा इथे कसा आला? इतक्या वर्षात कधीच ह्याचा आवाज ऐकला नव्हता इथे. कुठे बसला आहे हे शोधण्यात अर्थ नव्हता. कदाचित आमची चाहूल लागून उडाला असता. त्याची शीळ ऐकण्यात एव्हढी गुंग झाले की आवाज रेकॉर्ड करायचं सुचलंच नाही. गेल्या वर्षी मुन्नारनंतर हा आता भेटला. मुन्नारची सहल सुध्दा आठवून गेली. काय मजा असते आठवणींची. लक्षात आलं ही ट्रीप सुध्दा आठवणींच्या खजिन्याचा भाग होईल आता.




आता दिवस मोठे असतात म्हणून साडेपाचपर्यंत थांबता आलं. खरं तर इतकं छान वाटत होतं की तिथून निघायला जीव होईना. पण निघणं भाग होतं. माथेरानला आलं की माझं नेहमी असंच होतं. यायचं ठरलं की २-३ दिवस आधीच वेध लागतात आणि इथून निघताना पाय निघत नाही. :-(

पण तरी पाउस गेला की पुन्हा यायचंच आहे - तीन महिने तर राहिलेत. :-)

No comments: