Thursday, June 2, 2016

हा शेखर खोसला कोण आहे?

तरी बरंय मी लोकसत्तामधला रिव्ह्यू वाचून नाटकाला गेले होते. माझ्या मैत्रिणींनी रिव्ह्यू वाचला होता की नाही माहित नाही पण हे नाटक रहस्यमय आहे हे त्यांना नक्कीच माहीत होतं. त्यामुळे नाटक सुरु झालं आणि पहिल्या दहा मिनिटांत आम्ही सगळ्या एकमेकांकडे बघत राहिलो. हे कुठलं नाटक? हे तर चक्क विनोदी दिसतंय आणि तो विनोद पण काही खास नाहीये. आता पहिला अंक संपेपर्यंत हे सहन करावं लागणार. मी तर जाम वैतागले. आणि मग एकदम नाटकातल्या मधुराने पहिल्या रांगेत प्रेक्षकांत बसलेल्या एकाला गोळी घातली. दोन लोक त्याला उचलून घेऊन गेले. ओहो, हा शेखर खोसला तर. पण हा शेखर खोसला नक्की होता तरी कोण?

शेखर खोसला नाटकातल्या नाटकाच्या लेखकाचा मित्र. आफ्रिकेहून आलेला. पण मग ह्या मधुराची आणि त्याची काय ओळख? ते कोणालाच माहीत नाही. ना तिच्या भावाला - तुषारला, ना तिच्या होणार्या नवऱ्याला - लोकेशला, ना तिच्या मैत्रिणीला - शर्वरीला आणि ना शर्वरीच्या नवऱ्याला - विवेकला. निदान ते तसं पोलिसांना सांगतात. मग मधुराचं काय? तिच्या मते शेखर खोसला तिला blackmail करत होता. पण हे झालं तिच्या अनेक गोष्टींपैकी एक व्हर्जन. खरं नक्की काय? तो तिला भेटलेला कोणी गरजू तरुण होता का तिचा कोणी चाहता? का दुसराच कोणी? का तिच्या मनाचा खेळ? हा शेखर खोसला कोण होता? आणि मधुराचं काय झालं? ह्या सगळ्यात त्या लेखकाचा काय संबंध? अजून डोकं गरगरायला लागलं नसेल तर नाटक नक्की पहा :-)

खरं तर नाटकातल्या सगळ्याच कलाकारांनी मस्त अभिनय केलाय. पण मला खास आवडला तो मधुरा वेलणकर आणि तुषार दळवीचा अभिनय. तुषार दळवीला निगेटीव्ह रोलमध्ये निदान मी तरी कधी पाहिलेलं नाही. पण त्याने खूप छान काम केलंय. ह्यापुढे त्याला साध्यासरळ रोलमध्ये पाहणं कठिण आहे आता. मधुरा वेलणकरच्या अभिनयाबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं कारण मी तिचा कुठलाच चित्रपट किंवा मालिका पाहिलेली नाही. पण मधुराच्या निरनिराळ्या भावावस्था तिने अचूक दाखवल्या आहेत. फक्त एकच कमी वाटत राहिली ती म्हणजे मधुरा एक सुंदर, तरुण आणि यशस्वी अभिनेत्री आहे हे तिच्या सुरुवातीच्या देहबोलीवरून जाणवत नाही. तिची वेशभूषासुध्दा त्या मानाने थोडी अजागळ वाटली.

असो. रविवार दुपारच्या झोपेवर पाणी सोडून भर दुपारच्या उन्हात बाहेर पडल्याचं सार्थक झाल्याचं समाधान मात्र भरभरून नाटकाने दिलं.

No comments: