Wednesday, February 17, 2016

7. उत्तम अनुवाद (दिवाळी अंक २०१५)

खरं तर हा दिवाळी अंक विकत घेताना मी थोडी साशंक होते कारण अनुवादित कथा वाचायला मला फारसं आवडत नाही. मागे म्हटल्याप्रमाणे मूळ कथा आवडते की नाही हे बऱ्याचदा अनुवाद कसा केलेला आहे ह्यावर अवलंबून असतं. आणि हा तर मूळ लेखकावर अन्याय झाला ना? परत ह्या कथांत काही गूढ अर्थ वगैरे भरलेला असला की मामला खल्लास. असो. पण मागच्या दिवाळीत थोडे नवे दिवाळी अंक ट्राय करायचं ठरवलं होतं म्हणून अंक घेतलाच.

पहिली कथा मोहन राकेश ह्यांची 'अपरिचित' - थोडीशी मिस्टर एन्ड मिसेस अय्यर सिनेमाची आठवण करून देणारी. म्हणूनच कदाचित आवडली असेल. 'शिकारी ग्राक्कूस' ही फ्रेन्झ काफ्का ची गोष्ट आणि 'मृतात्म्याचा मार्ग' ही चीन्वा अचेबे ह्यांची कथा दोन्ही डोक्यावरून गेल्या. एकदम बाऊन्सर! रविंद्रनाथ टागोर ह्यांची 'जिवंत की मृत' फार आवडली. पुढेमागे बंगाली शिकता आलं तर मुळातून वाचायला आवडेल. पण इथेही अनुवादात मधूनमधून कृत्रिमता आढळलीच. :-( त्यामानाने रवींद्रनाथांच्या 'जापान यात्री' तला भाग फारसा आवडला नाही. खोटं का बोलू? लेखाच्या शेवटी 'आमच्या देशातल्या, विशेषत: आम्हा बंगाल्याशी कुठंतरी समान धागा आहे. जे जे नवीन ते अंगिकारायचं' हे वाक्य वाचून जरा नाराजच झाले. खोरं स्वत:पुढेच माती ओढतं ह्या आजीच्या म्हणीची आठवण झाली. :-(

'विस्मरणात गेलेली एक गोष्ट' ह्या कमलेश्वर ह्यांच्या कथेने चुटपुट लावली. तीच गोष्ट इंदिरा गोस्वामी ह्यांच्या 'एक प्रवास असाही' ची. 'अमृतसर आलं आहे' ही भीष्म साहनी ह्यांची कथा शेवटच्या टप्प्यात असं काही वळण घेते की चालता चालता एकदम ठेच लागावी तसं होतं. मानवी मन आणि त्यातली अनाकलनीय भावनिक गुंतागुंत किती सहजपणे सांगून जातात. त्यांची 'तमस' आठवली. 'एक मळलेली पायवाट', 'ब्लेस यू योको ओनो एन्ड बाय बाय बाबू', 'लिदित्से एक आठवण', चारही हृदयस्पर्शी प्रवास गोष्टी आवडल्या. मला वाटतं नेन्सी मिटफोर्ड ह्यांचं मूळ लिखाण मी वाचलं पाहिजे. 'तारकासमूहाचं रहस्य' ही शिनईची होशी ह्यांची कथा खूप आवडली - ती लहान मुलांसाठी लिहिलेली असूनही. अगदी शाळेत असताना वाचलेल्या किशोर मासिकातल्या कथा किंवा 'नंदूचा यांत्रिक माणूस' अश्या पुस्तकांची आठवण झाली. हो गोष्ट मला खूप खूप मागे माझ्या लहानपणात घेऊन गेली, एप्रिल-मे च्या वार्षिक परीक्षेनंतरच्या निवांत उन्हाळी दुपारीत. धन्यवाद शिनईची होशी! :-)

'भटकंती' हा हेरमान हेस ह्यांच्या पुस्तकातला भाग, 'द लगून' ही जोजिफ कॉन्रेड ह्यांची कथा, 'ए वीक ऑन द कंकार्ड एन्ड मेरिमेक रिव्हर्स' हा हेन्री थोरो ह्यांच्या पुस्तकातला भाग, नेपोलियनची इजिप्त मोहीम आदि आवडतील असं वाटलं होतं पण नाही आवडले. कविता (त्यातून अनुवादित!) हा माझा प्रांत नसल्याने 'सागरात भिरकावलेली बाटली' ही आल्फ्रेड द विनी ह्यांची कविता वाचायच्या भानगडीत पडले नाही. 'आमार शोनार बांगला' आणि 'द हनिमून' आवडल्या. आर. डी. गांधी ह्यांचा अफगाणीस्तानमधल्या सायकल यात्रेविषयीचा लेख पण छान वाटला. पण त्यात बामियानच्या मूर्तींचा उल्लेख वाचून वाईट वाटलंच. मूर्ख तालिबानी लोकांनी ह्यांचा विध्वंस करून टाकला. 'बुझकाशी' खेळाचं वर्णन वाचून 'खुदा गवाह' चित्रपट आठवला आणि 'कयानी' ही झोराष्ट्रीयन नावं वापरणारी जमात कारुख नावाच्या ठिकाणी रहात होती हे वाचून फोर्टच्या कयानीचं मूळ सापडल्याचा आनंद झाला. 'तरंग बासुरीचे' ह्या कथेत लेखक सुरज प्रकाश ह्यांना आणि 'हार्ट ब्रेकर' मध्ये परितोष ह्यांना नेमकं काय सांगायचं होतं ते काही मला कळलं नाही.

ह्या वर्षीच्या दिवाळीत मी हा अंक घेईन असं वाटत नाहीये सध्यातरी.

No comments: