Thursday, December 25, 2014

5. दीपोत्सव, दिवाळी अंक २०१४

अंकातला पहिला लेख वाचला की सर्वसाधारणपणे अंकाच्या एकंदर बांधणीची कल्पना येते. आणि हा अंदाज सहसा चुकत नाही. ह्या अंकाबद्दल वाचलं होतं तेव्हा 'रस्त्याआधी एखाद्या गावात मोबाईलचं नेटवर्क पोचतं तेव्हा काय होतं?' ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा ह्यात प्रयत्न केला गेला आहे अशी माहिती होती. ही माहिती मिळण्याकरता अंकाचा उत्तरार्ध यायची वाट पहावी लागली हे खरं असलं तरी त्याआधीचे सगळे लेख वेळेचं सार्थक करणारे होते हे मान्य करायलाच हवं.

पहिली मुलाखत 'डिजीटल इंडिया' बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची. फारसं काही गंभीर वाचायची सवय नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला हा लेख बोअरिंग वाटायची शक्यता जास्त. पण तरी नेट लावून वाचला आणि एका वाक्यावर अक्षरश: थबकले. 'आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात  करण्याचे मार्ग आणि पद्धती वेगळ्या असतील, पण ग्रामीण भागातील माणसं अत्यंत चिवटपणे प्रयत्न करून नवे तंत्रज्ञान वापरणं शिकतात. कारण तो त्यांच्यासाठी केवळ हौशीचा मामला नव्हे तर जगणं बदलण्याचा एकमात्र पर्याय असतो.' रोजच्या जगण्यातला एक कन्व्हीनियंस ह्यापलीकडे माझ्या लेखी फारसं महत्त्व नसलेला मोबाईल हा दुसर्या कोणासाठी तरी 'जगणं बदलण्याचा एकमात्र पर्याय' असू शकतो? कधी हा विचार केलाच नव्हता मी. फक्त 'आजकाल भाजीवाल्यांकडे सुध्दा मोबाईल आलेत' म्हणून आश्चर्य व्यक्त केलं होतं. ह्या लेखाने डोळे उघडले.

शाहरुख खान मला अजिबात आवडत नाही - नट म्हणून नाही आणि माणूस म्हणूनही नाही. त्यामुळे त्याची मुलाखत वाचावी की नाही हा प्रश्न होता. पण 'आता अंक विकत घेतलाच आहे तर वाचून तरी बघू काय म्हणतोय ते' असा विचार करून वाचायला घेतली आणि एक वेगळाच शाहरुख समोर आला. 'माणूस' म्हणून समोर आला. 'बेटर....बेस्ट करण्याचं भूत असतं आपल्या टाळक्यात त्यामुळे आपल्याला साध्या गुडची किंमत उरत नाही हा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे' हे सांगणारा, टेक्नोलॉजीच्या काळात इमेजीनेशन हरवू देता कामा नये असं वाटणारा आणि 'आपण आपलं टायमिंग सुधारण्यासाठी झगडावं' हा मंत्र देणारा. 'आफ्टरऑल आय एम एन इंटरटेनर' असं म्हणतो तो त्याच्या मुलाखतीच्या शेवटी पण मी म्हणेन 'आफ्टरऑल, यू आर ए ह्युमन बिईंग शाहरुख'.

तिसरी मुलाखत बिल गेटस्‌च्या बायकोची, मेलिंडा गेटस्‌ची. मुलाखतीच्या सुरुवातीलाच बिलच्या आईने तिला लिहिलेल्या पत्रातलं एक वाक्य 'फ्रॉम दोज टू हुम मच इज गिव्हन, मच इज एक्सपेक्टेड' मला आवडून गेलं. बिलला भेटण्याआधीचं तिचं आयुष्य, मग त्याच्याशी लग्न करावं का नाही ही घालमेल, आफ्रिका, भारत तसंच इतर देशात समाजकार्यासाठी केलेली भ्रमंती आणि आलेले अनेक अनुभव सगळं सगळं सांगितलं आहे तिनं. ह्यातले अनेक अनुभव माझ्याही कल्पनेपलिकडचे. मग पूर्णपणे भिन्न संस्कृतीत वाढलेल्या ह्या बाईवर तिचा किती खोल परिणाम झाला असेल ह्याची फक्त कल्पनाच करता येऊ शकते.

सगळ्यात धक्का दिला तो आलिया भट्टच्या मुलाखतीने. 'महेश भट्ट आणि सोनी राजदानची मुलगी' ह्यापलीकडे तिची दुसरी ओळख मला नाही कारण मी हिंदी चित्रपट पाहत नाही. त्यामुळे ह्या मुलाखतीबाबत नाही म्हटलं तरी थोडी उत्सुकता होती. आलिया भट्टने सुखद धक्काच दिला. मुलाखतीतली दोन वाक्य वानगीदाखल दिली तर मी काय म्हणतेय ते लक्षात येईल. 'अपयशाशी डील करणं कठिण असतं. यशाशी डील करणं त्याहून कठिण असतं असं माझा अनुभव सांगतो'. 'I would rather be stupid than pretend to be intelligent'. १००% पटलं.

आनंद महिंद्र, अरुंधती भट्टाचार्य, पंडित शिवकुमार शर्मा, मार्क टुली, फ्लिपकार्टवाले बंसलद्वयी, कपिल शर्मा ह्यांच्या मुलाखती आवडल्या. सचिन तेंडूलकरच्या मुलाखतीत मात्र 'फक्त क्रिकेटच नव्हे तर सर्व खेळांना प्रोत्साहन मिळावं, शाळाशाळातल्या, गावाखेड्यातल्या, वस्तीपाड्यांवरच्या मुलांना खेळता यावं हे माझं स्वप्न आहे. मला भारताला एक क्रीडा महासत्ता झालेलं पहायचं आहे' असं म्हणणारा सचिन ह्या बाबतीत स्वत: काय करतोय हे स्पष्ट झालं नाही. खरं तर हे व्हावं ह्यासाठी प्रयत्न करायला आणि ते घडवून आणायला तो एक योग्य व्यक्ती आहे. पण 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' असा प्रकार दिसतो.

अंकाचा शेवटचा भाग म्हणजे देशाच्या पूर्व=पश्चिम, उत्तर-दक्षिण भागातल्या लोकांच्या कहाण्या - 'सात बहिणींचा प्रदेश' म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तरपूर्व राज्यातल्या लोकांची उर्वरित भारताशी जोडलं जाण्याची धडपड, महाराष्ट्रातल्या नंदुरबार मधल्या लोकांचं मोबाईल वापरून आयुष्य बदलण्याचा प्रयत्न, उत्तर प्रदेशातल्या बायकांनी हिम्मत करून केलेली प्रगती आणि दक्षिणेकडच्या नल्लमल्लाच्या जंगलातलं आदिवासींचं सूर्याबरोबर सुरु होणारं आणि त्याच्यासोबत मिटणारं रोजचं जीवन. एकाच भारतात किती छोटे छोटे अनेक भारत आहेत ह्याची जाणीव करून देणार्या कहाण्या.

अंक संपला असं वाटत असतानाच दोन लेखांनी खास लक्ष वेधून घेतलं - एक नाशिकच्या कुंभमेळ्यावरचा आणि दुसरा 'इंडिअन ट्रक आर्ट' वरचा.

दिवाळी अंकात नेहमी असणाऱ्या कथा, कादंबऱ्या, कविता ह्यापेक्षा काही वेगळं वाचायचं असेल तर ह्या वर्षीचा दीपोत्सव वाचायलाच हवा. पुढल्या वर्षीही हा अंक घेणार हे नक्की.

No comments: