Saturday, January 11, 2014

ज्वारीच्या हुरड्याचं थालीपीठ

शहरात गव्हाचा किंवा ज्वारीचा हुरडा मिळणं ही जवळपास दुरापास्त गोष्ट आहे. पण साधारण डिसेंबर-जानेवारी मध्ये रानडे रोडवरच्या टायटनच्या शोरूम समोर एक माणूस दोन्ही प्रकारचा हुरडा विकायला बसतो. हा हुरडा तव्यावर थोडासा गरम करून त्यात हुरड्यासोबत मिळणारा मसाला घातला आणि वर लिंबू पिळला की खायला मस्त लागतो. हवं तर थोडं मीठ घालायचं (मसाल्यात असतं).

ज्वारीचा हुरडा
पण ह्यावेळी मात्र मी ज्वारीच्या हुरड्याचं थालीपीठ करून पहायचं ठरवलं. मागच्या वर्षी बांद्रा रेक्लेमेशन वर 'महालक्ष्मी सरस' चं प्रदर्शन लागलं होतं तेव्हा एके ठिकाणी मिरचीचा ठेचा आणि दह्याबरोबर खाल्लं होतं.

अर्थात हा प्रयोग असल्याने (आणि पुढच्या विकेंडला हुरडा मिळेल ह्याची खात्री नसल्याने!) सगळा ज्वारीचा हुरडा वापरला नाही. वाटीभर हुरडा थोडंसं पाणी आणि मीठ घालून मिक्सरमधून जाडसर वाटून घेतला. त्यात बारीक चिरून कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरेपूड, धणेपूड, तिखट आणि कोथिंबीर घातली. मग पाणी आणि मावेल इतकं तांदळाचं पीठ घालून मळून घेतलं. मध्ये भोकं पाडून तव्यावर पसरून बाजूने तेल घालून दोन्ही बाजूने खरपूस शिजवून घेतलं.

थालीपीठ
घाबरत घाबरत तुकडा मोडला आणि मग इतके दिवस आपण हे का करून पाहिलं नाही असं वाटायला लागलं. :-)

No comments: