Thursday, April 12, 2012

सुवासिनी - सीमा देव ह्यांची आत्मकथा

खरं सांगायचं तर मी हे पुस्तक स्वत:हून लायब्ररीत शोधून वाचलं नसतं. पण आईने कुठल्याश्या कार्यक्रमात कोणा आरजेने सांगितलेली सीमा देवची एक आठवण ऐकली - एका सीनमध्ये त्यांनी नेसलेल्या कानन कौशलच्या continuity च्या साडीवर रमेश देवचा पाय पडून ती साडी फाटली आणि त्याची किंमत एकट्या सीमा देवच्या पगारातून कापून घेतली गेली. ही आठवण सीमा देवच्या पुस्तकात आहे का बघ म्हणून आई म्हणाली म्हणून मी ते पुस्तक आणलं.

खरं तर पुस्तकाचा आकार पाहून हे कोणा नटीचं आत्मचरित्र असेल असं वाटतच नव्हतं एव्हढं ते चिमुकलं. मी ह्यापूर्वी जयश्री गडकरांचं आत्मचरित्र वाचलं होतं ते बर्यापैकी मोठं होतं. बरं, ह्या पुस्तकात नेहमी असतात तसे भाग नाहीत. सगळं सलग एकच पुस्तक. हे काहीतरी नवीन होतं. प्रस्तावनेत सीमा ह्यांनी म्हटलं होतं की हे पुस्तक त्यांच्या स्वत:च्या शब्दात आहे. कोणीही शब्दांकन केलेलं नाहीये. अरे बाप रे!

पण पुस्तक् वाचायला घेतलं आणि आवडायला लागलं. लेखिकेने आपलं जीवन स्वत:च उलगडून सांगितलं आहे त्यामुळे त्या लेखनाला एक प्रकारचा गोडवा आहे, साधेपणा आहे, प्रामाणीकपणा आहे. हेच बघा ना. एके ठिकाणी त्या म्हणतात की त्या इतक्या शांत स्वभावाच्या होत्या की भालजी पेंढारकरांनी त्यांना 'थोडी आग पी' असा सल्ला दिला तर पुढल्या एका पानावर स्वत:च स्वत:ला 'मी तशी थोडी तापटच' असंही म्हणतात. आपल्या सगळ्यांच्याच स्वभावात असा विरोधाभास थोड्याफार फरकाने असतो तो त्यांनी हे पुस्तक स्वत:च लिहिल्यामुळे अचूक पकडला गेलाय. नाहीतर शब्दांकन झालं असतं तर हे विरोधाभासी उल्लेख गाळले गेले असते.

तरीही बऱ्याच ठिकाणी हातचं राखून लिहिलं असल्याचं जाणवतं उदा. त्यांच्या वडिलांचा आधार नव्हता असं त्या म्हणतात पण पुढे एके ठिकाणी आईसाठी मंगळसूत्र आणल्याचा उल्लेख आहे. तसंच रमेश देवना Heart Attack आला तेव्हा 'किती जणींच्या तावडीतून त्यांना कसंकसं सोडवलं' असं त्या लिहून जातात पण त्यासंबधीचा मजकूर आधी पुस्तकात फारसा येत नाही. अर्थात ह्या गोष्टी नसल्यामुळे तसा फारसा फरक पडत नाही. आणि पुस्तकात ते न लिहिण्याचा अधिकार त्यांना निश्चित आहे.

पण एका बाबतीत त्यांनी माझ्यासारख्या वाचकांची थोडी निराशा केली आहे - त्यांनी आपल्या चित्रपटांबाबत लिहिलं आहे पण त्यांच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल, त्या काळच्या अभिनेते, संगीतकार, दिग्दर्शक ह्यांच्याबद्दल, तसंच एकंदरीत तेव्हाच्या मराठी चित्रपटसृष्टीबद्दल अधिक विस्ताराने लिहायला हवं होतं. ह्यावर कदाचित आणखी पुस्तकं असतीलही पण त्यांचे अनुभव वाचायला निश्चित आवडलं असतं हे मात्र नक्की.

No comments: