Wednesday, November 23, 2011

नुकतेच मीना प्रभू ह्यांचं 'इजिप्तायन' हे पुस्तक वाचून संपवलं. नाव जरी 'इजिप्तायन' असलं तरी इजिप्तसोबत जॉर्डन आणि इस्त्रायल ह्या देशांच्या सफरीची माहिती ह्यात आहे. वाचून खरोखर थक्क झाले. एकटीने आणि तेही आधी फारशी तजवीज न करता ह्या तिन्ही देशांत फिरून येणार्या लेखिकेचं कौतुक वाटलं. नाहीतर आम्ही कुठे जायचं म्हटलं की विमान वेळेवर सुटेल ना, ट्रेनमध्ये खिडकीकडची जागा मिळेल ना, होटेल कसं असेल ह्या विवंचनेत सहलीचा आनंद घ्यायचं पण विसरतो. रहाण्याची सोय, प्रवासाचं गणित आणि साईटसिइंग ह्या त्रिकोनाच्या तिन्ही बाजू जुळवता जुळवता नाकी नऊ येतात. खांद्यावर पडशी टाकून मुसाफिरी करण्याचं स्वप्न ह्या जन्मी तरी स्वप्नच रहाणार. असो.

तरीही लेखिकेने केल्या त्या दोन गोष्टी मी कधीच करू शकणार नाही. एक म्हणजे एखाद्या पर्यटन स्थळात गाईड किंवा तिथे काम करणारे रखवालदार ह्याच्यासोबत आजूबाजूला कोणी नसताना एकटीने तिथे फिरणे. ह्यात धोका आहे ही बाब नजरेआड करता येण्यासारखी नाही. कबुल आहे की ह्या बंधनामुळे केवळ पर्यटकांची गर्दी असलेल्या जागाच पहाता येतील पण 'सर सलामत तो पगडी पचास' हेही तितकच खरं नाही का? दुसरं म्हणजे मुस्लीम धर्माचा पगडा असलेल्या देशात त्यातल्या बाकी धर्मियांना अनिष्ट वाटणार्या प्रथांबद्दल बोलणे उदा. हिजाब, जिलबाब. त्या लोकांना बाकीच्या धर्माबद्दल कितीही कुतूहल असलं तरी त्यांच्यातले बरेचसे लोक दुसऱ्या धर्मांबद्दल फारसे सहिष्णू नसतात आणि स्वत:च्या धर्माबद्दल काही शंका असल्याच तरी त्याबद्दल दुसर्या धर्माच्या व्यक्तीने मत व्यक्त केलेलं ते खपवून घेतीलच असंही नाही. मग कशाला विषाची परीक्षा घ्या?

एकदा विचार आला होता की तिन्ही देशातल्या लेखिकेने पाहिलेल्या स्थळाबद्दलची माहिती टिपून ठेवावी. मग लक्षात आलं की अस २-३ महिने सलग फिरणं आपल्याला सध्या तरी शक्य होणार नाही. :-( तरी ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ह्या तिन्ही देशांना जायचंय ह्या बेताची पुन्हा एकदा आठवण झाली हेही नसे थोडके.

अजून ह्याच लेखिकेचं 'चीनी माती' वाचायचं आहे. पण आता ते बहुतेक पुढल्या वर्षीच वाचेन. सध्या रॉबिन शर्मांच Discover Your Destiny घेऊन आलेय.

No comments: