Wednesday, April 14, 2010

विकेन्डला अष्टविनायकाच्या ट्रीपला जाऊन आले. जायचं जायचं असं डिसेंबरपासून घाटत होतं पण योग येत नव्हता. म्हणतात ना देवाचं बोलावणं यायला लागतं.:-)

तसे एकदा मी पूर्वीही अष्टविनायक केलेत पण ते एका टूरिस्ट कंपनीबरोबर. ह्या वेळी गाडी घेऊन गेलो होतो त्यामुळे प्रवास मजेत झाला. पाली, महड आणि थेऊर हे पहिल्या दिवशी. मोरगाव, सिध्दटेक आणि रांजणगाव दुसर्‍या तर ओझर आणि लेण्याद्री शेवटल्या दिवशी केले. बाप्पांना भेटून छान वाटलं. :-)

महडच्या मंदिराबाहेरच्या दुकानांत कसल्या सुरेख रंगांच्या बांगड्या होत्या पण सगळ्या काचेच्या. शहरातल्या धकाधकीत किती वेळ टिकाव धरतील काय माहित म्हणून घेतल्या नाहित. आता पश्चात्ताप होतोय :-( थेऊरच्या मंदिरात पोचेतो अंधार पडला होता. त्यातून ज्याला पत्ता विचारावा तो इथेच आहे, एक २५ किलोमीटरवर म्हणून सांगायचा. त्यातून आपण पोचेतो मंदिर उघडं असेल की नाही ही शंका पोटात घेऊन प्रवास केला पण पोचलो तेव्हा छान दर्शन झालं.

सिध्दटेकला मागल्या वेळी नावेतून प्रवास करून गेल्याचं आठवत होतं. आता मंदिरापर्यंत गाडी गेली. रांजणगावच्या मंदिरात खूप गर्दी होती. खरं तर पैसे देऊन रांगेत उभं न राहता दर्शन घेणं पटत नाही. पण आमचा नाईलाज होता कारण आम्ही मुक्कामाला पुण्याला परत जाणार होतो. त्यामुळे बाप्पाकडे माफी मागून दर्शन घेतलं.

लेण्याद्रीच्या पायर्‍या चढताना दमछाक झाली थोडी पण वर पोचल्यावर सार्थक झाल्यासारखं वाटलं. गुहेत कुलूप घालून ठेवलेली दारं कसली आहेत कळायला मार्ग नव्हता पण तिथे सफाई करणं आवश्यक आहे. कोळीष्टकं जमलेली पाहून वाईट वाटलं. :-( मूर्तीचे फोटो काढू नका असं लिहिलं असतानाही मूर्तीसोबत पोझ देऊन फोटो काढणारे लोक पाहून तिळपापड झाला :-(

No comments: