Wednesday, April 14, 2010

मागल्या आठवड्यात पु.लं.चं "वंगचित्रे" परत वाचलं. वाचून एकाच वेळी आनंद झाला आणि दु:खही. शांतिनिकेतनमध्ये रहाण्याचा आनंद ह्या पुस्तकाने दिला. पण दु:ख ह्याचं की इतक्या वर्षांपूर्वीच गुरुदेवांच्या स्वप्नातून साकार झालेल्या ह्या वास्तूचे चिरे निखळायला सुरुवात झाली होती तर आता काय झालं असेल? आपण भारतीय दुर्दैवीच. अशी अनेक शिल्पं आपल्या देशात निर्माण झाली पण आपण सगळ्यांचं उध्वस्त होणं उघड्या डोळ्यांनी पहात आलो :-(

२-३ वर्षांपूर्वी एका मैत्रिणीच्या कोलकात्याच्या घरी नवरात्रीच्या दिवसात जायचा योग आला होता. शांतिनिकेतन सोडाच पण हावरा ब्रिज पहायचं पण स्वप्न पुरं होऊ शकलं नाही. पु.लं.च्याच शब्दात ह्याचं कारण सांगायचं तर "भीषोण लोकारण्य". दोर मो़कळा केल्यावर सैरावैरा धावणारे लोक पाहून मुंबईच्या गणपतीउत्सवातली गर्दी पाहिलेल्या माझीही छाती दडपली. बरं ह्या गर्दीत हरवले तर "आमार नाम स्वप्ना" ह्यापुढे माझी गाडी जाणार नाही ह्याची खात्री. त्यामुळे निमूटपणे मैत्रिण आणि तिचे कुटुंबिय जिथे नेतील तिथे जायचं असं शेवटी ठरवून टाकलं.

पुन्हा जायचा योग आलाच तर तिथली खादाडीची ठिकाणं, शांतिनिकेतन, हावरा ब्रिज आणि ट्राम हे कार्यक्रम पार पाडल्याशिवाय तिथून निघणार नाही अशी प्रतिज्ञा तूर्तास केली आहे :-)

No comments: