Sunday, November 17, 2019

३. लोकसत्ता (दिवाळी अंक २०१९) (रुपये १४०)

लोकसत्ताच्या दिवाळी अंकात नेहमीच वैचारिक खाद्य मिळतं हा आजवरचा अनुभव असल्याने अंक मोठ्या उत्सुकतेने उघडला.

पहिला लेख विश्वनाथन आनंदवरचा. बुद्धिबळ खेळणाऱ्या लोकांबद्दल मला नेहमीच प्रचंड आदर. आनंदबद्दल आजवर पेपरमधून वाचलं असलं तरी त्याच्या कारकिर्दीबद्दल अथ पासून इति पर्यंत माहिती नव्हती. तशी ती करून घेण्याचंही काही कारण नव्हतं. सिध्दार्थ खांडेकर ह्यांच्या लेखाने ती झाली. आणि ती वाचून ह्या आयुष्यात बुद्धिबळाची निदान एखादा सामना समजण्यापुरती तरी ओळख करून घ्यावी अशी एक नोंद आधीच मोठ्ठी असलेल्या माझ्या लिस्टमध्ये झाली  हजारो ख्वाहिशे ऐसी.....

पुढला ‘स्थलांतर’ ह्या विषयावरचा लेखविभाग थोडा निराशाजनक वाटला. कारण ह्या विषयावर आधीच पेपरातून रकानेच्या रकाने भरून लिहून आलंय, येतंय. त्यामुळे हा विषय लोकसत्ताने दिवाळी अंकासाठी निवडावा ह्याचं थोडं आश्चर्य वाटलं. ‘भारत कधी कधी (च) माझा देश आहे’ हा गिरीश कुबेर ह्यांचा लेख सोडला तर बाकीच्यात तोच तोच मजकूर आहे असं वाटलं. ह्या विभागातले शेवटले ४ लेख त्यात का घातलेत असाही प्रश्न पडला. उदा. सत्यजित रेंच्या लग्नावरचा विजय पाडळकर ह्यांचा लेख छान आहे पण ‘स्थलांतर’ ह्या विषयाशी त्याचा काय संबंध ते कळलं नाही. मनोहर चंपानेरकर ह्यांनी हेडन, मोझार्ट, बेथोवन आणि शुबर्त ह्या चार पाश्चात्त्य संगीतरचनाकारांबद्दल चांगली माहिती दिली आहे. पैकी मोझार्ट आणि बेथोवन ऐकून माहित होते. बाकी दोघांविषयी आता कळलं. इतिहास सत्यघटना म्हणून कधीच नोंदवला जात नाही तर एखाद्या विचारप्रणालीला सोयीस्कर म्हणून लिहिला जातो हे श्रद्धा कुंभोजकर ह्यांनी त्यांच्या लेखात मांडलेलं मत एकदम पटलं. अतुल देऊळगावकर ह्यांचा एमेझोनच्या विध्वंसावरचा लेख अस्वस्थ करून गेला. एमेझोनच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी जी-७ च्या देशांनी दिलेली मदत नाकारण्याचा करंटेपणा करणाऱ्या ब्राझीलच्या अध्यक्षाना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहोळ्याचं निमंत्रण आहे हे वाचून ‘हरे रामा!’ अशी प्रतिक्रिया झाली होती. उभ्या जगात हे एकच राहिले होते का आमंत्रण द्यायला? असो.

दुसरा विभाग ‘नाटक’ ह्या माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावरचा. एकूण एक लेख अप्रतिम. मग तो शांता गोखलेंचा मुंबई-पुणेच्या पलीकडे मराठी नाटकं आजकाल का जात नाहीत ह्याची कारणं शोधणारा लेख असो वा लहान मुलांसाठीची नाटकं बसवताना आलेल्या अनुभवावर आधारलेला माधव वझेंचा लेख असो. नाटकाचे दौरे का कमी झालेत ह्यावर अभिराम भडकमकर ह्यांचा लेख प्रकाश टाकतो. नाटक म्हटलं की व्यावसायिक रंगभूमीच आठवते. पण संगीत, बालरंगभूमी, हौशी, प्रायोगिक, महाविद्यालयीन अश्या अनेक प्रकारच्या रंगभूमीबद्दल जयंत पवार ह्यांच्या लेखात वाचायला मिळतं. ’गांधीजी आणि व्यवहारी राजकारण’ आणि ‘आकाश धरतीको खटखटाता है’ हे दोन्ही लेख नाटकविभागात का घातलेत ते कळलं नाही. पैकी पहिला लेख गांधीजीच्या विचारप्रक्रीयेबद्दल चिंतन करणारा आणि वाचकांकडून करवून घेणारा असा आहे. दुसरा लेख ‘विनोदकुमार शुक्ल’ ह्या हिंदी लेखकाची ओळख करून देतो. हिंदी लेखकांचं साहित्य वाचायला हवंय ह्याची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली.

तिसरा विभाग ‘वेब विश्व’. सध्या क्रेझ असलेल्या वेब सिरीज ह्या विषयावरचा. विभावरी देशपांडे, हृषीकेश जोशी आणि गिरीश कुलकर्णी तिघांचे लेख उत्तम. पैकी हृषीकेश जोशींचा लेख वेब सिरीज हे प्रकरण मुळात काय आहे इथपासून सुरुवात करून त्याचं अर्थकारण, ह्या इकोसिस्टीम मधले विविध घटक, त्यातल्या बऱ्यावाईट गोष्टी सगळ्याची यथास्थित छाननी करतो. मला हा लेख फार आवडला. तूर्तास तरी podcasts मध्ये रमले असल्याने वेब सिरीज हे प्रकरण मी समजूनउमजून दूर ठेवलंय. सध्या तरी त्यात पडण्याचा विचार नाही. पण पुढेमागे एखाददुसरी सिरीज पाहण्याचा विचार करायला मला ह्या लेखांनी भाग पाडलं हे नक्की. ‘इव्हिनिंग इन पेरीस’ ही डॉक्टर शरद वर्दे ह्यांची गोष्ट खास वाटली नाही. शेवटी काहीतरी ट्वीस्ट असेल असं वाटलं होतं. पण पदरी निराशाच आली.

शेवटच्या विभागात चित्रपटांच्या दुनियेत सध्या चलनी ठरलेल्या बायोपिक्सचा लेखाजोखा रेखा देशपांडे आणि अमोल उदगीरकर दोघांनी सुरेख मांडला आहे.

अंकाच्या सुरुवातीला थोडी निराशा झाली असली तरी पुढल्या लेखांनी ती उणीव नक्कीच भरून काढली. विचारांना चालना देणारं बरंच काही वाचल्याचं समाधान अंकाने पुरेपूर पदरात टाकलं.

No comments: