Wednesday, August 16, 2017

दक्षिणरंग - मीना प्रभू

मला वाटतं मीना प्रभू ह्यांचं लायब्ररीत असलेलं हे शेवटचं पुस्तक. १९९६ सालच्या आसपास लेखिकेने केलेल्या दक्षिण अमेरिकेच्या सफारीचा वृतांत ह्यात आहे. तसं बघायला गेलं तर ह्याला वीस वर्ष लोटून गेली असल्याने ऐतिहासिक सोडले तर बाकी संदर्भ आता बरेच जुने झालेले आहेत. पण तरी २० वर्षांपूर्वी ह्या असल्या सफारी काढणं किती जिकिरीचं असेल त्याची त्यावरून पुरेपूर कल्पना येते.

पेरू, चिले, आर्जेन्टिना, ब्रझील, बोलिव्हिया, एक्वादोर आणि कोलंबिया ह्या सात देशांतला हा प्रवास. भारतीय पासपोर्टवर व्हिसा मिळवताना आलेल्या कटकटीचं विस्तृत वर्णन आहे. अजून ह्या कटकटी राहिल्या नसाव्यात अशी आशा आहे कारण हे पुस्तक वाचून ह्यातल्या किमान काही देशांना भेट द्यावीशी वाटत आहे. अर्थात आम्ही देशाटनाला निघणार म्हणजे केसरी टूर्स किंवा वीणा वर्ल्ड जिंदाबाद. काय ती माथाफोडी तेच करू देत. पण व्हिसा मिळवताना आलेल्या अडचणी काहीच नाहीत असे अनुभव एक सोडून दोन वेळा लेखिकेला इमिग्रेशनच्या ठिकाणी आले. एव्हढी अडचण सोसून हा प्रवास जिद्दीने पुरा केल्याबद्दल माझा त्यांना साष्टांग नमस्कार आहे बाबा.

लेखिका त्यांच्या नेहमीच्या शैलीत ह्या देशांबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल, त्यांचा इतिहास, भूगोल, राजकीय परिस्थितीबद्दल भरभरून लिहितात. त्यामुळे हे कोरडं प्रवासवर्णन होत नाही. जिथे जातील तिथे भेटणारे स्थानिक हा त्यांच्या खास जिव्हाळ्याचा विषय - मग तो चिलेतला आपल्या देशाची आठवण म्हणून छोटी पिन काढून देणारा गरीब गार्ड असो, पेरूच्या बसमधली 'ओम नमो नार्रायणा' म्हणून चकित करणारी म्हातारी असो की लीमात एक हॉटेल चालवणाऱ्या केथालिक नन्स असोत. ह्या हॉटेलवरून आठवलं. लेखिकेने ह्या हॉटेलात फार लोक येत नाहीत त्यामुळे ते कितपत चालेल असं लिहिलं होतं म्हणून उत्सुकतेने नेटवर सर्च करून पाहिलं. निदान २०१६ पर्यंत तरी ते सुरु होतं हे वाचून बरं वाटलं. गालापागोसवरच्या Lonesome George ह्या त्याच्या जातीतल्या शेवटल्या कासवाबद्दल वाचून तोही तपास केला. दुर्देवाने त्याचं २०१२ मध्ये निधन झाल्याचं आणि त्याच्या मृत्यूआधी त्याचा उपयोग करून त्याच्या प्रजातीतली आणखी कासवं जन्माला घालण्याच्या प्रयत्नांना यश न आल्याचं कळलं. असो. ह्या पुस्तकात कधी नव्हे तो स्थानिक जेवणाबद्दलचा, थोडासाच का होईना, उल्लेख आलेला आहे.

मला ह्या पुस्तकातला सर्वात आवडलेला भाग म्हणजे अर्थात माचू-पिचू, गालापागोस आणि एमझोन नदीबद्दलचा. वाचून अगदी आत्ताच प्रवासाला निघावंसं वाटलं - तेही लेखिकेइतकी गैरसोयी सोसायची अजिबात ताकद नसताना. हेच पुस्तकाचं आणि लेखिकेचं यश नाही का?

No comments: