Sunday, April 23, 2017

दुर्गभ्रमणगाथा - गो.नी. दांडेकर

आजकाल महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल वाचावंसं अचानक का वाटायला लागलंय काय माहीत. पण वाटतंय हे नक्की. त्यामुळे हे पुस्तक बघताच वाचायला घेऊन आले. गो.नी.दांनी रायगड, राजगड, सिंहगड, तोरणा, राजमाची, शिवनेरी, प्रतापगड, पुरंदर, लोहगड-विसापूर अश्या अनेक किल्ल्यांवर केलेल्या भटकंतीबद्दल, तिथे (तेव्हाच्या काळात) असलेल्या वास्तूंबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल भरभरून लिहिलंय. हे सगळं वाचल्यावर कायकाय वाटलं - किल्ल्यांवर तेव्हाच्या काळात कुठे एखादं नाणं, शिश्याच्या गोळ्या, फुटक्या खापराचे तुकडे असं सापडायचं ते वाचून ते ज्या कोणाला मिळालं असेल त्याला काय मस्त वाटलं असेल असं मनात येऊन गेलं. तिथल्या वास्तूंची, तटांची, बुरुजांची झालेली धूळधाण, त्याबद्दल असलेली सार्वत्रिक अनास्था ह्याबद्दल वाचून संताप तर झालाच पण खूप वाईटही वाटलं. ही वाट लावण्यात टोपीकरांचा हात केव्हढा होता हे वाचून तर अंगाचा तिळपापड झाला. किती आणि काय काय लुटून नेलं असेल मेल्यांनी. मुडदा बशिवला ह्या मेल्या इंग्रजांचा! राजमाचीवर गो.नी.दांना आलेल्या अमानवी अनुभवाबद्दल वाचून ह्यामागचं गूढ काय असेल अशी उत्सुकता लागली. राजमाचीवर (तेव्हा!) असलेल्या चित्रपाषाणांबद्दल वाचून तर आपणही तिथे एकदा जायला हवं असं प्रकर्षाने वाटून गेलं. पुढेमागे जाणं होईल तेव्हा उपयोगी पडेल म्हणून त्या जागांबद्दलच्या नोंदी असलेल्या पानांचे फोटोही काढून ठेवलेत.



अर्थात ह्यातल्या ज्या वस्तू दांडेकरांना सापडल्या त्या किंवा कुठल्या म्हाताऱ्या पुजाऱ्याकडून घेतलेल्या मूर्ती त्यांनी सरकारात जमा न करता स्वत:च्या घरी नेऊन ठेवल्या हे मला मुळीच पटलं नाही. असेलही सरकारात ह्याबद्दल अनास्था पण म्हणून तुम्ही वस्तू स्वत:च्या मालकीच्या असल्यासारख्या परस्पर लाटू शकत नाही. मग तुम्ही लेखक म्हणून किती मोठे असलात तरी. 'ह्या वस्तू माझ्या घरी सुरक्षित आहेत' ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने त्या वस्तू पुरातत्वखात्याला दिल्या की नाहीत काय माहीत. नाहीतर आनंदच आहे सगळा. :-( अशीच कुठल्याश्या गडावर मिळालेली खंडोबाची मूर्ती त्यांनी परस्पर सूर्यकांत मांढरेना दिली (त्यांचं कुलदैवत खंडोबा म्हणून!) ते वाचून तर मी हतबुध्दच झाले. असं आणखी किती लोकांनी केलंय काय माहीत.

असो. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल ज्यांना आस्था, उत्सुकता असेल त्यांनी नक्कीच वाचावं असंच हे पुस्तक आहे.

ता. क. "महाराष्ट्राची धारातीर्थे" हे पंडित महादेवशास्त्री जोशी ह्यांचं पुस्तक कुठूनतरी मिळवून वाचलं पाहिजे. 

No comments: