Sunday, January 1, 2017

अमर फोटो स्टुडीओ

२०१६ मधलं पाहिलेलं हे शेवटचं नाटक. म्हणजे तशी वर्षाची अखेर चांगलीच झाली म्हणायची.

'गरज असते तेव्हाच दिसतो' ही ह्या स्टुडीओची ओळख. अपूर्व आणि त्याची गर्लफ्रेंड तनू ह्या दोघांना त्याची गरज भासायचं काय कारण? अपूर्व उर्फ अपू ह्याची कहाणी थोडी अजब आहे. त्याच्या घराण्यात २७वं वर्षं लागलं की पुरुष गायब होतात. त्याचे खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील सगळ्यांची तीच गत. आणि अपू २७ वर्षांचा झालाय. त्यामुळे आता आपणही असेच गायब होणार हा विचार त्याला छळतोय. तनूची वेगळीच गोष्ट. तिच्या लहानपणी लव्ह मेरेज केलेल्या आईवडिलांचा डिव्होर्स होऊन वडील घर सोडून निघून गेल्यापासून तिचा प्रेमावरचा विश्वास उडालाय. त्यात अपू पीएचडीसाठी अमेरिकेला जाणार तेव्हा Long Distance Relationship ला काही भविष्य नाही हेही तिला ठाऊक आहे. त्यातून ह्या दोघांचे खटके उडताहेत. व्हिसासाठी फोटो काढायला ती अपुला बळेबळेच घराबाहेर काढते आणि एका रस्त्यावर त्यांना दिसतो अमर फोटो स्टुडीओ. तिथला विक्षिप्त वागणारा फोटोग्राफर-कम-मालक त्यांचे फोटो काढतो आणि हे दोघे भूतकाळात जाऊन पोचतात. अपु पोचतो १९४२ मध्ये आणि तनू १९७६ मध्ये. का पोचवतो त्यांना स्टुडिओ नेमक्या त्याच काळात? त्यांचं असं काय काम तिथे असतं की जे पूर्ण झाल्याखेरीज त्यांना तिथून वर्तमानकाळात येता येणार नसतं? त्यांच्या नात्यातला तिढा सोडवतो का हा अमर फोटो स्टुडीओ?

ह्या नाटकातली आवर्जून लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे ह्यात काम केलेल्या तरुण कलाकारांचा अतिशय सुरेख अभिनय आणि त्यांच्यातली प्रचंड उर्जा. नवंकोरं नाटक असल्याने संवादसुध्दा आजच्या काळाला अनुरूप आणि आजच्या काळातले रेफरन्सेस असलेले. त्यामुळे हे नाटक पाहताना वेगळीच मजा येते. ह्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी आपल्याला पटतात. उदा. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे relative असतात. म्हणजे १९४२ सालच्या एखाद्या माणसासाठी देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हा भविष्यकाळ आहे तर २०१६ मध्ये असलेल्या आपल्यासाठी तो भूतकाळ. तसंच केवळ एखादा काळ जुना आहे म्हणून त्यातलं सगळंच सेपिया टेन्टेड, छान, सुरेख असं असू नाही शकत. आणि आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे एखाद्या अंधाऱ्या खोलीत चाचपडतोय असं वाटून चिडचिड होते कधीकधी. पण तरीही भूतकाळात गेलो म्हणून पुढे काय घडणार आहे हे माहीत असलं तरी त्याही जगण्यात मजा नाही. फक्त एकच आहे - पूर्ण नाटक पाहूनही अपुच्या घरातल्या पुरुषांच्या २७ व्या वर्षी गायब होण्यामागे हा अमर फोटो स्टुडीओच होता की नाही हे स्पष्ट झालं नाही. :-)

मग कधी जाताय स्टुडीओत फोटो काढायला?

No comments: