Tuesday, December 6, 2016

१०० डेज अर्थात झी मराठीवरचा पोरखेळ #२

'रात्रीस खेळ चाले' घाईघाईत गुंडाळली गेली (ह्यावर तर बरंच लिहायचं आहे!) तेव्हा महेश कोठारेनी आपल्या नव्या सिरियलचं घोडं पुढे दामटायला हे करवून आणलंय की काय अशी शंका आली होती. ह्या '१०० डेज' चे प्रोमोज 'कैच्या कै' सदरात मोडतील असे. एक तर आदिनाथ कोठारे तेजस्विनी पंडितच्या मानाने खुपच तरुण दिसतो. वर चेहेऱ्यावर कसल्याही भावांचा अभाव हे त्याच्या अभिनयाचं(!) वैशिष्ट्य. आम्हा प्रेक्षकांना दुधाने तोंड पोळलं होतं तरी ताक फुंकून प्यायची सवय नाही. त्यामुळे 'पाहू तरी काय आहे कथानक' म्हणून सिरियल पहायला सुरुवात केली आणि चिडचिड व्हायला लागली.

चुकांचे पाढे वाचायला कुठून सुरुवात करू? संवादलेखन घेऊ. 'रात्रीस खेळ चाले' चाच पटकथालेखक म्हणा, संवादलेखक म्हणा, ह्या सिरियलचं लिखाण करतोय हे ऐकलं होतं. तिथे 'घरात काय चाललाहा ते दिसता ना' सारखे दर एपिसोडला रिपीट होणारे संवाद होते तर इथे 'अजय ठाकूर च्या डेस्कवर एकही केस पेंडिंग रहात नाही' हे पहिल्या काही एपिसोडमध्ये डझनभर वेळा ऐकवून झालं. मग राणी, मीरा आणि नेहा तिघीनी एकाच एपिसोडमध्ये अजय ठाकूरला 'सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतेय' असं म्हटलं. वर तो किती हुशार आहे, किती कार्यक्षम आहे ह्याचं सारखं गुणगान. प्रत्यक्षात कृती शून्य दिसत होती.

आता हेच बघा ना.....

१. ह्या माणसाला पोलीस खात्याचा जावई असल्यासारखी एकच केस दिली आहे. पोलीस स्टेशनमधले बाकीचे लोक त्यालाच रिपोर्ट करताना दाखवलेत. मग बाकीच्या केसेस कोण बघतंय राव? का बाकी सगळं आलबेल आहे?

२. एखादी व्यक्ती गायब झाली की काही विशिष्ट कालावधी (२४ का ४८ तास ते मला आठवत नाहीये) उलटून गेल्याशिवाय पोलीस तक्रार नोंदवून घेत नाहीत. इथे मात्र मिसेस सरदेसाई ठाण्यावर हजर झाल्यावर ठाकुरांना निरोप गेला. बरं, तक्रार नोंदवून घेतली तर मग सगळ्या बाजूने तपास करायला नको? पण ठाकुरसाहेब मीराबरोबर धनंजयच्या पहिल्या बायकोला पाहून म्हणतात की आपली ओळख नाही. अरे, तिने काय स्वत: पोलीस ठाण्यात येऊन सांगायचं की मी धनंजयची पहिली बायको म्हणून?

३. धनंजयशी संबंधित कुठल्याही व्यक्तीची कसून चौकशी होताना दाखवली गेलेली नाही. जी झाली (उदा. ट्रक ड्रायव्हर) ती इतकी हास्यास्पद होती की त्याबद्दल न लिहिलेलंच बरं.

४. ठाकूर सरदेसाईंच्या बंगल्यावर जातात, राणी आत बोलावेपर्यंत सेक्युरिटीवाल्याकडे असलेलं रजिस्टर नुसतं चाळतात, 'मागच्या काही दिवसात इथे कोण आलं होतं' असं तोंडदेखलं विचारतात आणि राणीने बोलावल्यावर सेक्युरिटीवाल्याच्या उत्तराची वाट न बघता आत निघून जातात. ते रजिस्टर एव्हिडन्स म्हणून ताब्यात घ्यायला नको? सेक्युरिटीची चौकशी करायला नको?

५. राणीला धनंजयचं विल मिळालं आणि त्यात सगळी संपत्ती तिच्या नावावर आहे म्हटल्यावर तिचा धनंजय बेपत्ता होण्याशी काही संबंध नसेल हा निष्कर्ष काढून पोलीस मोकळे झाले. विलबद्दल तिला माहीत नसलं तर ती पैश्यासाठी नवर्याचा खून करू शकते किंवा माहीत असलं तर तिला खून करायचा मोटिव्ह अधिक आहे ह्या दोन्ही शक्यता आपल्याला सुचतात. पोलीस क्लीन चिट देऊन मोकळे.

६. धनंजयची बॉडी सापडायच्या आधी आणखी एक बॉडी सापडली होती तेव्हा ठाकुरांनी फक्त राणीला कळवलं. मीराला कळवून तिच्या डी.एन.ए.शी तपासणी करून पहायचं त्यांना सुचलं नाही? धनंजयची बॉडी सापडल्यावर तर तो ह्यांच्या टीममध्ये नुकताच जॉईन झालेला ठाकुरांचा शेजारी बॉसलाच विचारतो की आपला पुढला प्लान काय असेल. अरे बाबा, तू आधी पोलिसातच होतास ना?

७. धनंजयच्या बॉडीचा चेहेरा ओळखता येत नाही म्हटल्यावर अजय ठाकूर मोठा शोध लावल्याच्या थाटात म्हणतात 'बॉडीची अवस्था पाहता हा अपघात नसावा'. देवा रे!

ही असली पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या महाभागाला खुर्चीला बांधून इंग्लिश चेनेलवरच्या क्राईम ह्या विषयावरच्या सिरियल्स पहायला लावल्या पाहिजेत. पूर्वीच्या काळी एव्हढी ढिगाने चेनेल्स नव्हती. बापड्या प्रेक्षकाला काहीही दाखवलं तरी खपून जायचं. पण आजकाल तसं नाही. बाकीच्या शोजमधून पोलीस तपासांची खूप माहिती मिळते. वर्तमानपत्रात पोलिसांनी केसेस कश्या सोल्व्ह केल्या ते वाचून बऱ्याच वेळा त्यांच्या मेहनतीला आणि हुशारीला दाद द्यावीशी वाटते. असं असताना असला बाळबोध तपास दाखवून पोलिसांच्या हुशारीला ठेंगा दाखवल्यासारखं तर वाटतंच. पण कसलाही अभ्यास न करता पाट्या टाकायची वृत्ती आणि प्रेक्षकांना काय कळतंय, आम्ही दाखवू ते बघतील अशी गुर्मी ह्या असल्या सिरियल्समधून दिसते.

सध्या तरी मी उरलेल्या 'डेज' मधला एकही 'डे' न बघायची शपथ घेतली आहे.

No comments: