Sunday, August 10, 2014

मोडी लिपीचा क्लास संपून जवळजवळ दीड महिना झाला. मी नेटाने हा ३ महिन्यांचा कोर्स पूर्ण केला त्याचं मलाच शेवटी आश्चर्य वाटत होतं. पण ही लिपी शिकायची माझी कधीपासूनची इच्छा होती. फार कमी लोकांना ही लिपी वाचता येते असं मी ऐकलं होतं तेव्हापासून. आमच्या क्लासच्या पहिल्या दिवशी आधीच्या बेचचा एक विद्यार्थी त्याची द्यायची राहिलेली परिक्षा देत होता ते पाहून आपल्याला लिहायचं तर सोडाच पण लिपी वाचायला तरी जमते की नाही असंच वाटत होतं. पहिल्या दिवशी अ ते ऐ पर्यंत (मोडी मध्ये अं आणि अ: नसतात) एव्हढी अक्षरं झाली. म्हटलं ठीक आहे, एव्हढा अभ्यास एक आठवड्यात जमेल. पुढल्या वेळी 'क ते घ' किंवा फार तर 'च ते झ' पर्यंत असं करत करत मुळाक्षरं शिकवतील. पण कसलं काय? पुढल्या क्लासला 'क' ते 'ज्ञ' एव्हढं सगळं शिकवल्यावर हे सगळं कसं जमायचं हा यक्षप्रश्न उभा राहिला. अक्षरश: ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर सगळं सकाळी सकाळीच एकदम खाल्यासारखं झालं. मग त्यापुढे जोडाक्षरे, कालगणना, रेघी पध्दत हिशेब, पत्रातले मायने असं काय काय शिकायला मिळालं. आणि मग सगळं अंगवळणी पडत गेलं.

मग आलं कागदपत्र वाचन. मोडीतला पहिला कागद पाहिला तेव्हा 'अरे बापरे! काय लिहिलंय हे?' असं झालं. 'वालू वानर' वगैरे उतारे वाचताना आपण पहिलीच्या वर्गात बसलोय की काय असं वाटायला लागलं. तरी अक्षराला अक्षर लावून का होईना पण आपल्याला वाचता येतंय ह्याचंच अप्रूप होतं. मग सुवाच्य लिहिलेल्या पत्राकडून 'रनिंग' म्हणजे एका अक्षराच्या पायात दुसऱ्या अक्षराचा पाय अडकलेला असली पत्र आली. डोळ्यांच्या खाचा झाल्या आणि तोंडाला फेस आला :-) आमच्या बेचच्या नम्रताने तर बेचचं नाव ठेवायची वेळ आली तेव्हा चक्क 'थ्री डी' हे सुचवलं आणि ते सगळ्यांना पटलं. म्हणजे मोडीची अक्षरं अशी असतात की एका कोनातून बघितली तर एक अक्षर, पण दुसऱ्या कोनातून बघितलं तर काही वेगळंच दिसतं. :-) तरी हळूहळू आत्मविश्वास वाढायला लागला.

हे सगळं सुरु असताना रोज एक तरी उतारा, मग ती पेपरातली दोन ओळींची बातमी का असेना, मोडीत लिहा अशी सूचना सरांनी केली. आणि आत्मविश्वासाला सुरुंग लागला. 'य' च्या ऐवजी 'स', 'मु', 'लु' मधला गोंधळ, 'क' च्या ऐवजी 'ला', 'द', 'ह', 'ब' मधले घोळ अशी गंमत सुरु झाली. अक्षरश: एकेक ओळ लिहिताना जीव मेटाकुटीला यायला लागला. आणि पानंच्या पानं मोडी लिपी लिहिणाऱ्या जुन्या काळच्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटायला लागला. त्यातून परीक्षेत निबंध लिहायला लागणार आहे हे कळताच पाचावर धारण बसली. शेवटचा निबंध एमबीए च्या वेळी लिहिला होता. आयुष्यात पुन्हा कधी लिहावा लागेल असं तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं. "भगवान मालिक है" हे असंख्य टेक्सी-रिक्षांच्या मागचं वाक्य नजरेसमोर तरळून गेलं. मी 'ससुराल सिमरका' मधल्या भारद्वाज परिवारातली असते तर म्हणाले असते 'हे मातारानी, मेरी रक्षा करना' :-)

होता होता परिक्षेचा दिवस उजाडला. सरांनी माझ्यासाठी मुद्दाम कठिण पेपर घातल्याचं शुभ वर्तमान सांगितलं आणि सीतेच्या पायाखाली सरकली नसेल अशी जमीन माझ्या पायांखाली सरकली. वर्गात जास्त बोलल्याचा परिणाम! ३ तास बसून मान मोडून पेपर लिहिला. आणि मग सगळं देवावर सोडून दिलं.

रिझल्ट घ्यायला जायला मला जमलं नाही. पण वर्गातल्या मैत्रिणींनी सांगितलं की १०० त ९४ गुण मिळवून अस्मादिक १० जणांच्या वर्गात पहिले आलेत. सरांना माझ्याकडून आधीच्या बेचचा ९८ चा विक्रम मोडण्याची अपेक्षा होती. ती मला पूर्ण करता आली नाही ह्याचं दू:ख आहे पण तरी कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्याचं समाधान आहे. :-)

आता आजपासून स्पेनिश शिकण्याचा क्लास सुरु झालाय - पाच महिन्यांचा. हीसुध्दा अनेक वर्षांपासूनची इच्छा. 'फॉरेन लेन्ग्वेज शिकून काय होणार? त्याची practice नसेल तर विसरायला होणार' वगैरे सल्ले अनेक मिळाले. पण मी दुर्लक्ष केलं. विसरायला आधी शिकू तर दया. पुढचं पुढे बघू. थोडक्यात काय तर सध्या परत विद्यार्थीदशा चालू झालेय - लिव्हिंग ल विडा लोका :-)

No comments: