Sunday, July 20, 2014

देवासाठी फुलं आणायला नेहमीच्या फुलवालीकडे गेले खरी पण तिच्या टोपलीत काही खास फुलं दिसली नाहीत. तिचं लक्ष जायच्या आधीच तिथून काढता पाय घेतला कारण तिने एकदा पाहिलं की 'दीदी, दीदी' करून मागे लागते. मग तिचं मन मोडवत नाही. तिथून थोड्या अंतरावर एक दुसरी फुलवाली बसते तिच्याकडे गेले. जास्वंद, झेंडू, दुर्वा, बेल, तुळस असं सगळं तिच्याकडे एकत्र मिळतं. आज तिच्याकडे फुलं सुध्दा छान दिसत होती. म्हणून २० रुपयेची दे म्हणून सांगितलं. वर 'दुर्वा, बेल, तुळस' सगळं घाल म्हणून आवर्जून सांगितलं. तशी ती हसली आणि म्हणाली 'हो हो, सगळं घालते. देव रागवायला नको'. मीही हसले आणि म्हणाले 'देव अश्या कारणासाठी रागवत नाही हो'.

पण तिथून निघताना मात्र मनात विचार आलाच. तिने गंमतीत म्हटलं होतं पण ही आपल्या समाजातली वस्तुस्थिती आहे. दर मंगळवारी गणपतीच्या देवळापुढे लागलेली रांग पाहिली की हाच विचार माझ्या मनात येतो - किती लोक भक्तीने येतात, किती काही मागायला आणि किती देवाच्या धाकाने? बरं, देवाला घाबरणारे त्याच्या कोपाच्या भीतीने कर्मकांड करतील पण आपल्या नेहमीच्या आचरणात बदल करणार नाहीत. हे सगळं बदलेल का कधी?

No comments: