Sunday, July 28, 2013

Garlic Butter Idli



झी मराठी वरच्या 'आम्ही सारे खवय्ये' चे हल्लीचे एपिसोड्स काही खास नसतात असं वीकेंडच्या रिपीट टेलिकास्टवरून दिसतंय. अपवाद फक्त शुक्रवारच्या एपिसोड्सचा. शेफ जातेगावकर थोड्या हटके रेसिपीज सांगतात. अर्थात हे एपिसोड्स कधीतरीच पहायला मिळतात. जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र मी त्या रेसिपीज लिहून ठेवते. त्या करून पाहायची संधी क्वचितच मिळते ते सोडून द्या. आज त्यांची अशीच एक रेसिपी करून पाहिली.

खवय्येचे एपिसोड्स गिटसने sponsor केलेत. त्यामुळे ह्या रेसिपी मध्ये त्यांचं प्रोडक्ट वापरलं होतं ह्यात आश्चर्य ते काय? असो. तर ही एक इडलीची रेसिपी आहे.

अमूल बटर वितळवून घ्यायचं, त्यात लसूणपेस्ट आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं.

गिटसचं इडली मिक्स, पाणी (पाकिटावर दिलेल्या सुचनेनुसार ३२० ml) आणि १ चमचा तेल मिक्स करून घ्यायचं.  मी थोडं वेगळं म्हणून त्यात किसलेलं गाजर आणि बारीक चिरून कांदा घातला. मग ह्या मिश्रणाच्या इडल्या वाफवून घ्यायच्या.

इडलीवर गार्लिक बटर लावायचं. मग त्यावर ऑलीव्हचे तुकडे (माझ्याकडे ऑलीव्ह नव्हते म्हणून Jalapeno वापरलं) आणि टोमेटोच्या चकत्या पसरायच्या. वरून किसलेले चीज पसरून मायक्रोवेव्हमध्ये बेक करून घ्यायचं. किसलेलं चीज जास्त होईल म्हणून मी स्लाईस चीजचा थोडासा भाग प्रत्येक इडलीवर घातला आणि त्या तव्यावर गरम करून घेतल्या. जास्त टोमेटो आवडत नाही म्हणून चकत्यांऐवजी बारीक चिरून घातला. थोडा तिखटपणा हवा म्हणून चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो वरून घातली.

एकुणात काहीतरी वेगळा पदार्थ झाला आणि सगळ्यांना आवडला. फक्त एव्हढं लसूण खाल्ल्यामुळे निदान आजची रात्र तरी एकही vampire ची आमच्याकडे वाकडा डोळा करून पहायची हिम्मत होणार नाही हे नक्की :-)

No comments: