Saturday, March 2, 2013

'असा बालगंधर्व' - अभिराम भडकमकर

माझं आणि संगीत नाटकाचं कधी जमेल असं वाटत नाही. मी म्हणजे 'ते ऊ, आ वगैरे आपल्याला काही कळत नाही' असं म्हणणाऱ्यापैकी. पण कुठेतरी 'बालगंधर्व, बालगंधर्व' म्हणतात ते कसे होते ह्याबद्दल एक अमाप कुतूहल होतं. त्यांनी स्त्रीवेश धारण करून संगीत नाटकांतून कामं केली, गाणी म्हटली आणि ते तुफान लोकप्रिय होते एव्हढी जुजबी माहिती होती. एकाच प्याला, सौभद्र वगैरे काही नाटकांची नावं ठाऊक होती. 'दादा ते आले ना' ह्या संवादाविषयी कुठेकुठे वाचलं होतं. तरीही 'एक पुरुष बाईच्या वेशात काम करायचा' ही गोष्ट माझ्या पचनी पडलेली नव्हती. कदाचित हिंदी आणि मराठी सिनेमांतून बाईच्या वेशात पुरुष कलाकारांनी केलेला आचरटपणा पाहिल्यामुळे असेल.  त्यामुळे एकुणात तेव्हाच्या काळात लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं म्हणजे त्यांची सहनशक्ती अमर्याद असली पाहिजे असंच माझं गंधर्वयुगाबद्दल मत होतं. तरीही आपल्या संस्कृतीचा वारसा असलेल्या ह्या काळाबद्दल माहिती मिळावी म्हणून मी अभिराम भडकमकरांनी लिहिलेलं वाचायला आणलं.

चरित्र म्हटलं की त्यात रुक्ष अशी तारखांची किंवा प्रसंगांची वर्णनं असणार हा माझा समज पुस्तकाने खोटा ठरवला. बालगंधर्व म्हणजेच नारायणराव राजहंस ह्यांचं बालपण, रंगभूमीवरचा त्यांचा प्रवेश, बहरलेली कारकीर्द खूप छान पद्धतीने मांडलंय. त्यानुषंगाने तेव्हाच्या काळातल्या बाकीच्या नाट्यसंस्था, केशवराव भोसल्यांसारखे नट, शाहूमहाराजांसारखे राज्यकर्ते ह्यांचीही एक झलक मिळते. नरुभाऊ, दिनू ही पात्रं काल्पनिक आहेत असं लेखकाने प्रस्तावनेत सांगूनसुध्दा आपण ते विसरून जावं एव्हढी ती खरी उतरली आहेत. सौभद्र, मानापमान वगैरेंच्या नाट्यप्रयोगांचं इतकं सुरेख वर्णन लेखकाने केलंय की पडदा उघडण्याआधी उद् फिरवला जाताना ठेवणीतले कपडे घालून नटूनसजून आलेल्या मराठी मंडळीमध्ये आपणही जाऊन बसावं, पडदा उघडायची वाट पहावी आणि 'दादा ते आले ना' म्हणट गंधर्वांनी प्रवेश केला की कडकडून टाळी द्यावी असं मलाही वाटू लागलं. खरंच Time Travel करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना.

खरं सांगू का? पुस्तक वाचताना गंधर्वांच्या अव्यवहारीपणाचा खूप राग येत होता. ज्याच्या जीवावर कंपनी चालते आणि ज्याच्यामागे संसाराचा गाडा आहे अश्या माणसाने अव्यवहारी असणं हा अक्षम्य अपराध आहे. 'कलाकाराने कला जपावी. व्यवहारी असू नये' असं म्हणणं म्हणजे त्या कलाकाराच्या आयुष्याची परवड करणंच. हे असंच वाटत होतं मला. पण मग वाटलं की दुसरं टोक गाठून फार व्यवहारी होऊन कलेचा बाजार मांडणंही वाईट. सुवर्णमध्य हवा. तो कोणाला साधता आला आहे आयुष्यात? मग बिचारे गंधर्व तरी अपवाद का असावेत?

तरीही गोहरपायी लग्नाची बायको दुरावली, जवळची माणसं तुटत गेली तरी ते शांत राहिले ह्याचं मला आश्चर्यही वाटलं, वाईटही वाटलं आणि रागसुध्दा आला. त्यांची परवड सुरु झाली तेव्हा 'चांगली शिक्षा झाली, बायकोची परवड केलीत काय' असा विचार आला मनात. माझी सहानुभूती लक्ष्मीवहिनीनाच. पण पुढे पुढे सगळं वाचणं असह्य झालं. त्यांची चूक होती हे मान्य न करायला मी गंधर्वभक्त नाही. पण ती मान्य करूनही पोटात कुठेतरी तुटत राहिलं. त्याच्यावर श्रध्दा, भक्ती असलेली एव्हढी माणसं होती पण एकालाही त्यांची परवड थांबवता येऊ नये? हे कसं शक्य आहे? एखाद्याला बरबाद व्हायचंच असेल तर इलाज नाही हेच खरं कां? काहीही म्हणा, "हे चरित्र आहे आत्मचरित्र नाही" हे माहीत असूनही गोहरचं गंधर्वांवर प्रेम होतं हे मान्य करायला निदान मी तरी तयार नाही. नुस्तंच आकर्षण होतं ते. ते त्यांना कळलं नाही ही त्यांची शोकांतिका. ते तिचं म्हणणं का ऐकत राहिले हे कोडं विचार करकरूनही मला अद्याप सुटलं नाहीये. पण एक थिअरी आहे. त्यांचा स्वत:चा स्वभाव मृदु होता. लक्ष्मीवहिनी संपन्नतेच्या काळात नवऱ्याचा शब्द खाली पडू न देणार्या आणि नंतर संसारातल्या कटकटीनी गांजलेल्या. भोवताली सगळे भक्त. माणसांच्या ह्या पसाऱ्यात एखादा भक्कम आधार मिळावा असं गंधर्वांना कदाचित वाटलं असेल. तो त्यांना गोहरच्या रुपाने मिळाला. आणि पुढे त्याची सवय झाली. मग पुढे कधीतरी आपण आपल्या माणसांवर केलेल्या अन्यायाची बोच, त्यातून आलेलं अपराधीपण आणि स्वत:ला शिक्षा झाली पाहिजे असं काहीतरी तर्कट असाव.  'टाळी एका हाताने वाजत नाही' हे मान्य करूनसुद्धा गोहर गेली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. उलट 'पृथ्वीतलावरची घाण गेली' असंच वाटलं. ती गेल्यावर गंधर्वांची जबाबदारी घ्यायला कोणी कां पुढे आलं नाही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मग गोहर म्हणत होती तेच खरं होतं का? लोकाना नुसतं त्यांचं देवत्व हवं होतं पण त्यांच्यातला माणूस कोणाला नको होता.

गंधर्वांनी व्ही शांतारामांच्या संत एकनाथांवरच्या बोलपटात काम केलं होतं ही माहिती मला नवीन होती. आता कुठे पहायला मिळेल कां हा चित्रपट?

पुस्तकं वाचून संपलंय. आपण ते वाचून बरं केलं कां उगाचच वाचलं हे मला अजूनही ठरवता आलेलं नाहीये. एक महाराष्ट्रीयन म्हणून त्या काळाशी माझं अदृश्य नातं आहे. त्याची माहिती मला असायला हवी ह्याबद्दल दुमत नाही. ह्या पुस्तकाने त्याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. हेही नसे थोडके.

पण मला हेही माहीत आहे की त्यातली काही पानं वाचल्यावर मला ते मिटून ठेवायला लागणार आहे. काही पानं पुन्हा न वाचलेलीच बरी.

No comments: