Sunday, July 29, 2012

एका लग्नाची दुसरी गोष्ट

मग? तुमचं काय मत? राधाने घनाच्या मागे आपला वेळ वाया घालवावा? कां अबीर तिला जास्त योग्य होता? तुम्हाला जर 'कोण हे राधा आणि घना' असा प्रश्न पडला असेल तर पूढे काही वाचू नका. कारण तुम्ही नक्कीच झी मराठी वरची 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' बघत नाही.  खरं तर मीही पहात नाहीच नेहेमी. काळ्यांच्या घरातली घनाची आई, त्याची आजी, दोन काका आणि काकू, तो माउली, कुहू आणि मराठी बोलता बोलता मध्येच हिंदीवर घसरणारी राधाची आत्या ही पात्रं (!) माझ्या प्रचंड डोक्यात जातात. पण सुरुवातीला राधा आणि घनाच्या व्यक्तिरेखा चांगल्या वाटल्या होत्या. आणि 'तू तिथे मी', 'दिल्या घरी तू सुखी रहा' वगैरे इतर पकाऊ मालिकांच्या मानाने ही मालिका बरीच सुसह्य आहे.

आता मात्र कथानक अगम्य वाटू लागलंय. अमेरिकेला जायच्या घनाच्या हट्टामागचं कारण न पटण्यासारखे आहे. त्याहूनही अधिक त्याचा स्वार्थीपणा चीड आणणारा आहे. त्याला स्वत:ला राधासोबत आयुष्य काढायचं नाहीये पण अबीरचं तिच्या आयुष्यात असणं त्याला खटकतय. 'तुला मला डिव्होर्स द्यायची घाई झाली आहे' असं म्हणण्याइतकी त्याची मजल जातेय आणि तरीही माईआजी, घनाची आत्या आणि तिचे बाबा ह्या त्रिकूटाचं 'घना आणि राधाचं एकमेकांवर प्रेम आहे' हे पालुपद चालूच. घनाच्या नोकरीबद्दल, नुकत्याच कंपनीत आलेल्या employee चा डबा खाणाऱ्या बॉसबद्दल न बोललेलंच बरं. राधा तर 'काय होतीस तू, काय झालीस तू' असं म्हणावं इतपत शेळपट झाली आहे. कसलीही लायकी नसलेल्या आणि तरीही प्रचंड माज करणाऱ्या घनाच्या मागे लागून तिने आपल्या आयुष्याची कां फरपट चालवली आहे तेच कळत नाही.

तो अबीर जाताना माईआजीला सुनावून गेला ते मला फार आवडलं. ज्यां वयात देव, देव करायचं त्या वयात उगाच लोकांच्या अत्यंत खाजगी बाबीत ढवळाढवळ करणारी आणि वर 'माझं आता वय झालं, मला रिटायर्ड व्हायचंय' असं म्हणणारी ही माईआजी अतिशय नाटकी वाटते. राधाने 'लवकर डिव्होर्स दे' म्हणून घनाच्या मागे धोशा लावलाय खरा पण त्यात काही दम दिसत नाही. अबिर पण जरा लवकरच निघून गेला.

अर्थात ह्या 'दुसर्या' गोष्टीचा शेवट काय होणार ते आपल्याला माहीतच आहे म्हणा. घना राधावरचं आपलं प्रेम व्यक्त करेल आणि मग 'नांदा सौख्यभरे'. पण मला आपलं वाटतं बरं कां की राधाने 'चल फुट' म्हणून मंगळसूत्र घनाच्या तोंडावर फेकून अबिरसोबत जावं, घनाला अमेरिकेला जायला मिळू नये आणि त्याचं तेल, तूप, इतकंच काय तर धुपाटणेही जावं. कारण असं म्हणतात की तुमचं ज्या व्यक्तीवरवर प्रेम आहे तिच्याशी लग्न करण्यापेक्षा ज्या व्यक्तिचं तुमच्यावर प्रेम आहे तिच्याशी लग्न करावं.

अर्थात, हे राजवाडेने ऐकलंय की नाही माहीत नाही.  म्हणून त्याला एक चकटफु सल्ला - पुढल्या वेळी एखादी रहस्यमय मालिका काढा. :-)

No comments: