Sunday, February 19, 2012

झी मराठीवरच्या सिरियल्सबद्दल काहीही बोलायची सोय राहिलेली नाही. एखादीही सिरियल पाच मिनिटं बघितली तरी मस्तकशूल, अर्धशिशी एकदम उठावे अशी दृश्यं असतात. 'दिल्या घरी तू सुखी रहा' ह्या संतापजनक शीर्षकाच्या सिरीयलमध्ये सासू मुलाचं लग्न नको असलेल्या मुलीशी ठरवते आणि मग ते होऊ नये म्हणून म्हणे खोटटखोटट बेशुद्ध पडून हॉस्पिटलात जाते. अर्थात तरी ते लग्न होतंच कारण तिच्या घरचे सगळे माठ असल्याने हे तिचं नाटक आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. आता ही सासू नाना युक्त्या-प्रयुत्क्या करून त्या सुनेला त्रास देतेय. ही सून, वृंदा, लग्न व्हायच्या आधी मारक्या म्हशीसारखी तिच्याशी भांडायची पण आता लग्न झाल्यावर तिची गरीब गोगलगाय झाली आहे. सासूने मुद्दाम गरम पातेलं उचलायला लावून आपल्याला परिक्षेला जाऊ दिलेलं नाही हे तिच्या गावीच नाही. बरं झालं, एक इंजिनीयरिंगची सीट वाचली. नाहीतरी ह्या रडूबाईने तिथे काय दिवे लावले असते ते दिसतंच आहे.

मग ७:३० वाजता अरुंधती येते. हिला तर स्थितप्रज्ञतेसाठी बक्षिस दिलं पाहिजे. मख्ख चेहेरा ठेवण्यात तिने मनमोहन सिंगानाही मात दिलेय. आनंद असो वा दु:ख, प्रेमाने बोलायचं असो वा रागाने, हिच्या चेहर्यावर काही भाव नाहीत. चांगदेवाच्या पाटीसारखा कोरा करकरीत चेहेरा. इथेही छळायला एक सासू आहे. अनेक सव्यापसव्य करून त्या नवर्याचं डोळयांच ऑपरेशन झालं तर आता अरुंधती म्हणून तिने आपल्या कोणा मैत्रिणीला त्याच्यासमोर उभं केलंय. ह्या मैत्रिणीला म्हणे कोणाचाही आवाज काढता येतो. कोणीतरी रामदास पाध्येना जाऊन सांगा रे. त्यांना तर मदत होईल हिची. वर त्या अरुंधतीला म्हणे ब्रेन ट्युमर झालाय. फक्त एकदाच बेशुध्द पडली म्हणून हे निदान? हा त्या सासूचा डाव आहे हे आपल्याला कळतं पण अरुंधतीला कळत नाही कारण जन्मजात माठ! ह्या असल्या भन्नाट आयडीया ज्या लेखक-लेखिकेला सुचतात त्यांना माझा साष्टांग दंडवत. एखाद्या चांगल्या डॉक्टरला डोकं दाखवून तपासून घ्या म्हणावं एकदा.

८ च्या सिरीयलमध्ये तो सायको नवरा कमी म्हणून अंजलीला आता तो दुसरा एक कोणीतरी माणूस गाठ पडलाय. त्याने मंगळसूत्र काढून आईला भेटायला म्हणून हिला सांगीतल्न आणि ही गेली. ती आई मागच्या जन्मी सायकोची आई असावी. परत त्या घरात एक खोली आहे जिथे कोणालातरी बंद करून ठेवलंय. किंवा त्या माणसाला तसा भास होतोय. त्या श्रीकांतचे बाबा गेले तेच बरं झालं, सुटले ह्या भयानक सिरीयलमधून. कशाचा कशाला पत्ता नाही.

'आभास हा' नावाची अजून एक भयानक सिरियल आहे. ज्यात सध्या विधवांना कसं कमी लेखावं ह्याचं शिक्षण देताहेत. चांगली शिकली-सवरलेली नायिका अपघातात गायब झालेला नवरा परत मिळावा म्हणून सोळा सोमवारचं व्रत करतेय. तर देवळात जमलेल्या बायका तिला विधवा असून व्रत करतेय म्हणून त्रास देताहेत. अरे, हे कुठलं युग चालू आहे? आपण काय दाखवतोय त्याचा समाजातल्या काही घटकांना त्रास होऊ शकतो हे भान ह्या लोकांना केव्हा येणार? आपल्या मुली-बहिणीवर असा प्रसंग आला तर कसं वाटेल ह्याचा विचार हे लोक करतच नाहीत का?

तुम्हाला रक्तदाब, ह्रदयविकार असले त्रास असतील (किंवा नसतील आणि होऊ नयेत असं वाटत असेल तर!) हिंदी झी वरची 'पवित्र रिश्ता' अजिबात पाहू नका. मानव आणि अर्चना ह्या दोन प्रमुख पात्रांनी (!) घटस्फोट घ्यावा की घेऊ नये ह्यावर तिथे काथ्याकूट चाललाय. अत्यंत अतार्किक आणी म्हणूनच हास्यास्पद प्रसंगाची रेलचेल असलेली ही सिरियल ज्यां दिवशी बंद होईल तेव्हा हत्तीवरून साखर वाटायला हवी. अत्यंत भिकार!

त्यातल्या त्यात सतीश राजवाडेची ८:३० सिरियल जरा बरी वाटतेय. पण त्यातही विनोदाचा अतिरेक होतोय. साधारण असंभव आणि अग्निहोत्रची कास्ट ह्या मालिकेत आहे. घनश्याम, राधा आणि राधाचे बाबा ही पात्रं सोडली तर बाकी सगळे जण 'नमुने' किंवा 'नग' ह्या प्रकारात मोडतील. घनश्यामची आई आणि आज्जी तर केवळ असह्य आहेत. घनश्यामची आई राधाच्या बाबांशी किती ते लाडेलाडे बोलते. "बाई ग, लग्न तुझं आहे का तुझ्या मुलाचं?" असं विचारावंसं वाटतं अगदी. राधाचे काही ड्रेसेस, तिचा मेकअप आणि घनश्यामच्या आत्याचा गेटअप अगदी बघवत नाहीत. "विनोदासाठी विनोद" करायचा अटटाहास टाळला तर ही 'एका लग्नाची गोष्ट' खरंच ऐकण्यासारखी आणि बघण्यासारखी होईल.

No comments: