Wednesday, February 1, 2012

घाशीराम कोतवाल

'घाशीराम कोतवाल' बघायचं की नाही हे मला बरेच दिवस ठरवताच येत नव्हतं. कारण हे नाटक जेव्हा प्रथम रंगभूमीवर आलं तेव्हा बरंच वादग्रस्त ठरलं होतं हे मला वाचून माहीत होतं आणि असं नाटक आपल्याला झेपेल की नाही ह्याबद्दल मला जरा शंका होती कारण ह्याबाबतीत मी नाही म्हटलं तरी थोडी, थोडी काय बरीच, conservative आहे. पण मायबोलीवर ह्यावरचा एक लेख वाचला. (सुदैवाने त्यावरची उलटसुलट चर्चा व्हायच्या आत माझं नाटक बघून झालं होतं.) तेव्हा ठरवलं की जाऊन पहायचंच.

नाटक सुरु झालं आणि एकच वेश केलेले १०-१२ ब्राह्मण प्रेक्षकांतून चालत रंगमंचावर पोचले तेव्हा हे नाटक थोडं वेगळं आहे असं जाणवलं. तरीही सुरुवातीचा पद्य भाग पाहून (आणि ऐकून!) हा संगीतनाटकाचा प्रकार तर नव्हे ना अशीही शंका आली. ते मात्र खात्रीने मला झेपलं नसतं :-) पण घाशिरामाची कथा सुरु झाली आणि मी नाटकात गुंतत गेले. घाशीराम सावलादास हा उत्तरेतून पुण्यात नशिब काढायला आलेला एक ब्राह्मण. पुण्यात सगळीकडे अनाचार माजलेला. रात्र झाली की राव काय आणि रंक काय सगळ्यांची पावलं बावनखणीकडे वळणारी. ह्याला अगदी शहरातील ब्रह्मवृंदही अपवाद नाही. बावनखणीतल्या एका खणात गुलाबी नावाच्या तमासगीर बाईकडे घाशीराम नोकरीला लागतो. तिथे आलेल्या नाना फडणवीसांकडून त्याला एक किंमती हार बक्षीस म्हणून मिळतो पण गुलाबी आपल्या नोकरांकरवी तो काढून घेते. आणि मारहाण करून घाशिरामाला हाकलून देते. तश्यात रमण्यातून दक्षिणा घेऊन परतणाऱ्या एका ब्राह्मणाची दक्षिणा चोरल्याचा आळ त्याच्यावर येतो आणि त्याला मारमारून गावाबाहेर काढलं जातं. पुण्यावर आणि त्यातल्या ब्राम्हणावर सूड उगवायचा तो निश्चय करतो. आपली तरुण सुंदर मुलगी ललितागौरी नाना फडणवीसांच्या नजरेस पडेल अशी तो तजवीज करवतो आणि तिचं आयुष्य पणाला लावून आपण पुण्याचा कोतवाल बनतो. मग सुरु होते त्याची राजवट आणि पुण्यातल्या लोकांना सळो की पळो होऊन जातं. पुढे काय होतं ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी हे नाटक पहावं लागेल :-)

नाटकाची कथा किती खोटी, किती खरी, घाशीराम कोतवाल खरा होता का ते काल्पनिक पात्र आहे, नाना फडणवीस नाटकात दाखवलेत तसे प्रत्यक्षात होते का नव्हते, हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे का नाही ह्या सगळ्या वादात मला पडायचं नाही. पण पुण्याच्या कलाकारांनी ते अत्यंत सुरेख पध्दतीने सादर केलं ह्यात शंकाच नाही. मला गाण्यातलं फारसं कळत नाही. त्यामुळे नाटकातली गाणी कशी होती ह्याबद्दल मला काही लिहिता येणार नाही. पण नाना फडणवीसांचं काम करणारया कलाकाराने अगदी जिवंत अभिनय केला. ललितागौरीकडे त्याचं लंपटपणे पहाणं एक प्रेक्षक म्हणूनच नव्हे तर एक स्त्री म्हणूनसुध्दा असह्य वाटलं. घाशिरामाची भूमिका करणारया नटाने त्याची कोतवाल असतानाची गुर्मी आणि नंतरची अगतिकता अश्या पद्धतीने दाखवली की त्याने स्वत:च्याच मुलीच्या आयुष्याची जी राखरांगोळी केली ती क्षम्य नाही हे माहीत असूनही क्षणभर त्याची द्या आली. हं, आता नाना आणि घाशिरामाच्या तोंडचे काही संवाद 'Bold' वाटले. पण हा कदाचित माझ्या conservative दृष्टीकोनाचा भाग असावा.

एकंदरीत काय तर कुठल्याही वादात न पडता एक नाटक म्हणून एकदा पहावाच असा हा घाशीराम कोतवाल आहे.

No comments: