Saturday, January 7, 2012

प्रेमा तुझा रंग कसा

वाऱ्यावरची वरात पाहिलं तेव्हा मला वाटलं होतं की माझा २०११ चा नाटकांचा कोटा संपला. पण 'प्रेमा तुझा रंग कसा' ची जाहिरात पाहिली आणि ठरवलं की कसंही करून पहायचंच. विषय तसा साधाच पण अनेक प्रश्न उभे करणारा - स्वत: प्रेमविवाह केलेले आईवडील मुलं प्रेमविवाह करताहेत म्हटल्यावर विरोधात उभे का ठाकतात? लग्नाआधी एकमेकावर जीव टाकणारं प्रेमी जोडपं लग्न झाल्यावर आणि भांडण झाल्यावर 'माझा चोइस चुकला' असं का म्हणतं? 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असं न म्हणताही प्रेम करता येतं? प्रेमाचा अर्थ काय?

नाटकाची गोष्ट इथे सांगायच्या फंदात पडत नाही. अशोक सराफांना रंगमंचावर पाहायची माझी पहिलीच खेप. त्यांचा प्रोफेसर बल्लाळ खूप आवडला. जयंत सावरकरांचे कोळसेवाले गोरेसुध्दा. चारुशीला साबळेंची प्रियंवदा कुठल्याही मध्यमवर्गीय गृहिणीसारखी, थोडक्यात खूप ओळखीची, वाटली. बच्चू आणि सुशील तुळजापूरकर ह्या भूमिका करणारया कलाकारांनीही धमाल केली. बब्बड आणि तिचा नवरा ह्यांच्या भूमिका करणारया कलाकारांनीही जीव ओतून काम केल्याचं जाणवत होतं - विशेषत: बब्बडच्या नवरयाचं मधेच छाती फुगवून आवेशात बोलण आणि माहेरी पाठवण्यात आल्यामुळे बब्बडचा होणारा त्रागा. दिवाणखान्याचा सेट सुरेख लावला होता. फक्त एमएचे क्लासेस घेणार्या प्रोफेसरांच्या पुस्तकाच्या शेल्फवर व्हिज्युअल बेसिकचं पुस्तक का होतं ते कळलं नाही. :-)

माझ्यापुरतं विचाराल तर उत्तरं मिळायच्या अपेक्षेने मी गेलेच नव्हते. प्रश्न पडायच्या अपेक्षेने गेले होते असं म्हटलंत तरी चालेल. कारण जगण्याच्या धबडग्यात हे असे प्रश्न पडतच नाहीत तर उत्तरं शोधणार कशी आणि शोधणार कोण? ही अपेक्षा मात्र नाटकाने पुरेपूर पुरी केली. जन्मभर लक्षात राहील तो बल्लाळ आणि प्रियंवदा ह्यांच्यातला शेवटचा लोणावळ्याच्या ट्रीपबद्दलचा संवाद. माझी खात्री आहे की तोच संवाद आणि बरेचसे प्रश्न मनात घेऊन प्रेक्षक घरी गेले असतील. आता उत्तरं मिळतात की नाही हे ज्याचं त्याला ठाऊक. शेवटी काय? "प्रेमा तुझा रंग कसा" हा असा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर प्रत्येकाने स्वत:चं शोधायचं आणि ते प्रत्येकाचं वेगळंच येणार :-)

No comments: