Thursday, December 22, 2011

आजकाल टीव्ही चेनेल्सवर ज्या मालिका दाखवतात त्या प्रेक्षकांना नक्की कुठल्या युगात घेऊन जायचा प्रयत्न करताहेत काही कळायला मार्ग नाही. झी मराठीवरच्या ७ ते ९ ह्या वेळात दाखवल्या जाणार्या मालिकांचे नुसते प्रोमोज जरी पाहिले ना तरी डोकं भणभणतं.

एक आहे ती कुंकू - त्यात त्या आत्याबाईला अल्झायमर झालाय तर तिच्यावर इलाज करायचं सोडून घरातली बाकीची माणसं वेड्यासारखी वागताहेत. विवाहित व्यक्तीने दुसरं लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे तरी पण मालिकेतल्या नरसिंहांचं पुन्हा लग्न लावायचा घाट घरातल्या शिकल्या-सवरलेल्या बायका घालताहेत.

'सासूच्या नानाची टांग' अशी जाहिरात करून सुरु झालेल्या 'दिल्या घरी तू सुखी रहा' ह्या 'बाबा आदम' पेक्षाही प्राचीन (आणि संतापजनक) शीर्षकाच्या मालिकेत आतीशा नाईक 'मला खाष्ट सासूची भूमिका करायची आहे' एव्हढं एकच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करतेय. 'सून म्हणजे पैश्याची खाण' असा पवित्र संदेश देणार्या ह्या मालिकेशी संबंधित कोणाही व्यक्तीला अविवाहित बहिण किंवा मुलगी नसावी कारण तशी असती तर आपण जे दाखवतो आहोत त्याचा समाजावर आणि पर्यायाने लग्न झाल्यावर आपल्या बहिणीवर किंवा मुलीवर काय परिणाम होऊन शकतो ह्याचा त्यांनी विचार केला असता.

'अरुंधती' मध्ये सासू विरुध्द सून असा सनातन धर्मापेक्षाही अधिक सनातन संघर्ष असल्यामुळे कटकारस्थानाना उत् आला आहे. अरुंधतीच्या आंधळ्या नवर्याला तोंडी लावण्यापुरतंही महत्त्व नाही. 'एकाच ह्या जन्मी जणू' मध्ये अंजली नवरयाचं वेड बरं करायला त्याच्या पहिल्या बायकोसारखी वागतेय. इथेही एक Overacting करणारी सासू आहे. 'आभास हा' मध्ये 'मुलं जन्माला घालणं' हेच प्रत्येक विवाहित स्त्रीचं आद्य कर्तव्य असल्याप्रमाणे मालिकेतल्या सगळ्या बायका वागत आहेत. कोणाला मूल होत नाहीये म्हणून प्रोब्लेम तर कोणाला होतंय म्हणून. ह्यातली एखादीही बाई नोकरी करून संसाराला हातभार लावताना का दिसत नाही?

झी मराठीची ही गत तर झी हिंदीवरची वाईट डोक्यात जाणारी मालिका म्हणजे - पवित्र रिश्ता. कथानक वीसेक वर्षांनी पुढे गेलं तरी अर्चना, तिची आई आणि तिची मुलगी सगळ्याचे केस सारखेच काळेभोर. मानव आईवडील, मुलंबाळं आणि घरी काम करणारी बाई ह्या सगळ्यांना कुठल्या व्हिसावर Canada ला घेऊन गेला? तिथे तो उदरनिर्वाहासाठी काय करतो? हे असे प्रश्न ह्या लोकांना पडतच नाहीत का? मला एक आश्चर्य वाटतं - एव्हढा आरडाओरडा करून ह्या लोकांचं ब्लडप्रेशर कसं काय वाढत नाही?

कलर्सवर दाखवल्या जाणार्या मालिकांबद्दल तर न लिहीलेलचं बरं. बालिका बधू, बाबा ऐसो वर धुंडो, उतरण ह्यांचे प्रोमोज पाहून मती कुंठीत होते. ह्या मालिका censor करा म्हणून कोणीतरी उपोषण करा रे!

No comments: