Thursday, December 22, 2011

वाऱ्यावरची वरात

नाही नाही म्हणता ह्या वर्षी बरीच नाटकं पाहून झाली - सूर्याची पिल्लं, हमीदाबाईची कोठी, सारे प्रवासी घडीचे, झोपी गेलेला जागा झाला. अजून काही नाटकं पहायची बाकी आहेत - आलटून पालटून, सुखांशी भांडतो आम्ही, मी रेवती देशपांडे, लव्हबर्डस वगैरे. हे वर्ष संपायला जेमतेम काही दिवस राहिलेत. त्यामुळे बहुतेक उरलेली नाटकं पुढल्या वर्षीच पाहून होणार असं वाटत होतं. पण अचानक काही दिवसांपूर्वी पुलंचं 'वाऱ्यावरची वरात' बघायचा योग आला. तसं काही वर्षांपूर्वी ह्याचं नाटकाचा एक प्रयोग पाहिला होता. पण आपले पुलं म्हणजे एव्हरग्रीन. त्यांची नाटकंही तशीच. कितीही वेळा पाहिली तरी समाधान होतच नाही. :-)

तर शिवाजी मंदिरला ठरल्या वेळी पोचले आणि मोठ्या उत्सुकतेने पडदा वर जायची वाट पहात बसले. पडदा उघडताच पुलंच्या वेशात आनंद इंगळे आले आणि सगळ्यांची दाद घेऊन गेले. गावातल्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून जायचा प्रसंग छान रंगला. "दिल देके देखो' प्रवेशातल्या शिरपाचं काम करणारा नट तर अफलातून. आतिशा नाईक कडवेकर मामी म्हटल्यावर माझ्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. कारण झी मराठीवरच्या 'दिल्या घरी तू सुखी रहा' ह्या अत्यंत टुकार मालिकेच्या (तश्या झीवरच्या सगळ्याच मालिका टुकार असतात म्हणा!) प्रोमोजमध्ये ती अतिशय डोक्यात जाते. पण कडवेकर मामीच्या भूमिकेत भाव खाऊन गेली. मामी ओरडल्यावर कडवेकर मामांचा अभिनय एकदम खास.

मात्र 'दारू म्हणजे काय रे भाऊ?' चा नाटकात समावेश नव्हता :-( काही ठिकाणी पार्श्वसंगीत फार जोरात लावल्याने गाण्यांचे बोल ऐकू येत नव्हते आणि १-२ वेळा नट बोलत असतानाच पाठीमागे नेपथ्य बदलले जात होते ते खटकलं. एव्हढा देखणा प्रयोग सादर केल्याबद्दलं सगळ्या कलाकारांचं आणि नाटकाशी सम्बंधित व्यक्तींचं कौतुक आणि मनापासून धन्यवाद!

No comments: