Tuesday, September 27, 2011

हा खेळ सावल्यांचा

दोन दिवसांपूर्वीच झी टॊकीजवर ’हा खेळ सावल्यांचा’ ची जाहिरात पाहून मोबाईलमध्ये रिमायन्डर लावून ठेवलं होतं. बयाच वर्षांपासून हा सिनेमा पहायची माझी इच्छा होती. काल रात्री मोठ्या उत्सुकतेने चॆनेल लावलं. सुरुवात झाली तीच मुळी ’आला आला वारा’ ह्या श्रवणीय गाण्याने. आशा काळेला मी आजपर्यंत फ़क्त रडूबाई भूमिकेत पाहिलंय. तरूण नायिकेच्या रोलमध्ये तिला पाहायची ही पहिलीच वेळ. पिक्चर बराच जुना असल्याने ती ह्यात बयापैकी बारीक आहे. जमिनदाराच्या मुलीचा, इंदुमतीचा, रोल तिने छान केलाच आहे पण मला तिने केलेला कुळवाड्याच्या मुलीचा, गोमूचा, अभिनय आणि बोलणं फ़ार आवडलं. आशा काळे हा अभिनय करतेय ह्यावर विश्वास ठेवणं कठिण होत होतं.

पिक्चरची गोष्ट तशी साधीच. इंदुमती म्हणजे आशा काळे गावच्या दिवंगत जमिनदाराची एकुलती एक मुलगी, शिकली-सवरलेली. पण तरी शेतात जाऊन गडीमाणसांसोबत काम करायची तिला हौस असते. अशीच एके दिवशी ती शेतात असताना बंद पडलेल्या गाडीला धक्का मारायच्या निमित्ताने तिची ओळख डॊक्टर शेखरशी (काशिनाथ घाणेकर) होते. दोघे प्रेमात पडतात. योगायोगाने जे स्थळ सांगून येतं ते शेखरचंच असतं. इंदूची सावत्र आई (लालन सारंग) ती सद्न्यान झाल्याने आपला हक्क गेला म्हणून नाराज असते. त्यात नवयाने मृत्य़ूपत्रात तिच्यासाठी फ़ार काही ठेवलेलं नसतं. दिवाणजी (धुमाळ) आगीत तेल ओतायचं काम यथास्थित करत असतात. त्यात इंदूचा सावत्र मामा (राजा गोसावी) नाटक कंपनी बंद पडल्याने त्यांच्याच घरी येतो.

सगळं काही सुरळीत होणार असं वाटत असताना एकदम नरसूचं भूत इंदूच्या मानगुटीवर बसतं. हा तिच्या बालपणातला एक काळा प्रसंग असतो. दिवसेदिवस इंदूची स्थिती खराब होऊ लागते. शेखरची आई (सुमती गुप्ते) ठरलेलं लग्न मोडते. दिवाणजी मांत्रिक आणतात, इंदूचा मामा तिला बरं वाटावं म्हणून गुरुचरित्राचं पारायण करू लागतो पण नरसूचं भूत इंदूला भेडसावायचं थांबवत नाही. शेखर आपल्या परीने सर्व प्रयत्न करून पाहतो. त्याला यश मिळतं का नाही ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा पिक्चर पहावा लागेल. :-)

आधी म्हटल्याप्रमाणे आशा काळेचा अभिनय छान झालाय. सावत्र आईच्या भूमिकेत लालन सारंग आणि मामाच्या भूमिकेत राजा गोसावी फ़िट्ट. धुमाळ नेहमीच्या विनोदी भूमिकेपेक्षा वेगळ्या व्यक्तिरेखेत आहेत. अशोककुमार (शेखरचे वडिल) आणि देवेन वर्मा (मांत्रिक) पाहुण्या भूमिकेत धमाल करतात. दोघे मराठीही छान बोललेत. फ़क्त हिरो म्हणून काशिनाथ घाणेकर अजिबात पटत नाहीत. आणि हो, आताच्या काळात दिसेल त्या चॆनेलवर डिटेक्टिव्ह आणि क्राईम मालिका असतात त्यामुळे शेवटचा रहस्यभेद फ़ारसा धक्का देत नाही.

पण जुन्या काळचा एक रहस्यमय मराठी चित्रपट म्हणून पहायला वेगळीच मजा येते एव्हढं मात्र खरं.

No comments: