Sunday, December 3, 2023

१. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२३) (किंमत २०० रुपये)

 ह्या वेळेला दर वर्षीचे ठरलेले अंक आधी आणायचे आणि मग उरलेले कुठले आणायचे ते लोकसत्तामधले परीक्षण वाचून ठरवायचं असं मनाशी योजलं होतं. त्याप्रमाणे लोकसत्ता, लोकमत, किल्ला, दुर्गांच्या देशातून आणि भवताल मॅजेस्टिकमधून घेऊन आले. दिवाळी संपायच्या आधी काही कुठला अंक वाचायची सवड झाली नाही. ती झाली तेव्हा हात आपसुक लोकसत्ताकडेच गेला.

पहिला लेख जेजुरीवरचा - भूषण कोरगांवकर ह्यांचा. लोकसत्ताच्याच एका स्तंभात त्यांनी केलेल्या लिखाणावरून त्यांचा परिचय झाला होता.  अनेक वर्षांपूर्वी अष्टविनायक केले तेव्हा शेवटी जेजुरीला गेलं असल्याचं अंधुक आठवतं. ह्या लेखातून जेजुरी, खंडोबा, त्याच्या पत्नी, तिथल्या मातीत जन्मलेले कलाकार अशी बरीच माहिती मिळते. तशी मी फारशी धार्मिक नव्हे. एकदा जाऊन यायला हवं असं मनात येऊन गेलंच. देवाच्या मनात असेल तरच दर्शन होतं म्हणतात. बघू कधी योग येतो. 

लहानपणापासून घरात लोकसत्ता येतो. कोणा एका पक्षाची तळी न उचलता जे बरोबर त्याचं कौतुक करणं आणि जिथे चुकतं तिथे कसलाही मुलाहिजा ना बाळगता खडे बोल सुनावण हे माध्यमाचं काम. ते लोकसत्ता चोख पार पाडतो. लोकसत्ताचा अग्रलेख तर माझा खास आवडीचा विषय. गिरीश कुबेर ह्यांचं लिखाण सहसा आपल्या वाचनात न येणाऱ्या अनेक गोष्टींची ओळख करून देतं. त्यातून राजकारण - मग ते देशी असो वा आंतरराष्ट्रीय - आजकाल फारच इंटरेस्टिंग विषय झाला आहे. त्यामुळे चीनच्या अध्यक्ष्यांवर लिहिलेला कुबेर ह्यांचा लेख खूपच आवडला. चीन ह्याच विषयावरचा सुधींद्र कुलकर्णी ह्यांचा लेखसुद्धा वाचनीय. ह्या विषयावर कितीतरी वाचण्यासारखं आहे. ६० नंतर नक्की करायचं असं परत एकदा मनाला बजावलं.

धर्म ह्या विषयावर काही लिहू नये आणि सांगू नये अशीच आजकाल परिस्थिती असताना वरूण सुखराज मात्र 'सर, मै सेख इद्रिस' ह्या आपल्या लेखातून शहाणपणाचे बोल सहजगत्या सांगून जातात. अर्थात ज्यांना हे समजून घ्यायचंच नाही किंवा समजूनही न समजल्याचा आव आणायचा आहे त्यांच्या पालथ्या घड्यावर पाणीच असणार आहे. असो. 

दर वर्षी 'किल्ला' किंवा 'दुर्गांच्या देशातून' चे दिवाळी अंक वाचताना आपल्या किल्ल्यांचा परवडीबद्दल वाचून खंत वाटते. आपण ह्यात बदल घडवून आणायला काय करू शकतो हे समजत नसल्याने अधिकच अपराधी वाटतं. 'किल्ल्यांच्या प्रश्नांना कुलूप' हा लोकेश शेवडे ह्यांचा लेख वाचून पुन्हा एकदा ज्यांनी हे करणं आवश्यक आहे ते कुठल्या चर्चेत गुंतले आहेत ते आठवून विषण्णता आली. :-(

'पुरोगामी? परंपराभिमानी? कर्कशतेला कंटाळलेल्या अभ्यासकाची टिपणे' हा लांबलचक शीर्षकाचा हेमंत राजोपाध्ये ह्यांचा लेख ते शीर्षक वाचून उत्सुकतेने वाचायला घेतला खरा. पण सुरुवातीचा काही भाग सोडला तर तो भरकटत गेल्यासारखा वाटला. लेखकाला नक्की काय सांगायचं आहे ते निदान मला तरी कळलं नाही. 

'सिनेमा' आणि 'नाटक' हे माझे आणखी दोन आवडीचे विषय. बाबुराव पटेल हे नाव मी आधी कधी ऐकल्याचं स्मरणात नाही. पण विजय पाडळकर ह्यांचा त्यांच्याविषयीचा लेख वाचून 'फिल्म इंडिया' चे अंक कुठे मिळतात का ते पाहण्याची आणि सादत हसन मंटो ह्यांनी लिहिलेलं 'Stars From Another Sky' हे पुस्तक वाचायची इच्छा मात्र बळावली आहे. तीच गोष्ट 'पांगळ्या श्रद्धेचं  युग' ह्या आसाराम लोमटे ह्यांच्या लेखाची. शाळेत सातवीपर्यंत असलेलं हिंदी आठवीला पूर्ण संस्कृत घेतल्यावर सुटलं. नंतर पुढे फक्त हिंदी चित्रपट आणि बंबैय्या हिंदी. अभ्यासात असलेल्या मुन्शी प्रेमचंद ह्यांच्या काही कथा सोडल्या तर हिंदी साहित्याचा परिचय व्हायची संधीच आली नाही. ६० नंतर करायची आणखी एक गोष्ट ह्या सदरात सध्या हा एक पॉईंट बनून आहे. त्यात हा लेख वाचून हरिशंकर परसाई हे एक नाव समाविष्ट झालं. 

'भारत @ २०४७' ह्या विभागातले २ लेख मला तरी फारसे आवडले नाहीत किंवा झेपले नाहीत म्हणा हवं तर. 

सतराव्या शतकातलय भारताची ओळख करून देणारया 'विश्वगुणादर्शचंपू' ह्या दाक्षिणात्य ग्रंथाविषयीचा निखिल बेल्लारीकर ह्यांचा लेख आणि दक्षिणेचा दिग्विजय ह्या विभागातले ३ लेख माहितीपूर्ण वाटले. रघुनंदन गोखले ह्यांचा लोकसत्तातला बुद्धिबळाविषयीचा लेख दर आठवड्याला (त्यातलं बरंचसं कळत  नसूनही!) वाचते त्यामुळे त्यांच्या 'भारतीय बुद्धिबळ तरुण झाले' ह्या लेखात उल्लेख केलेले बरेचजण वाचून परिचयाचे आहेत. बाकी त्यापलीकडे ह्या खेळाचा आणि अस्मादिकांचा संबंध ह्या जन्मी येईल असं वाटत नाही :-)

चॅटजीपीटी ह्या विषयावर इतकं बोललं आणि लिहिलं जातंय की आता खरोखर अजीर्ण व्हायची वेळ आली आहे. तरी ह्या नव्या टेक्नोलॉजीने लिहिलेल्या कथा आहेत  तरी कश्या म्हणून 'कथाकार चॅटजीपीटी' भागातल्या एकाच कल्पनेभोवती गुंफलेल्या ५ विविध genre मधल्या कथा वाचल्या. मला तरी बर्याच बाळबोध आणि काहींश्या असंबध्द्दच वाटल्या.

दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही कवितांचा विभाग चाळला. खरं तर आपल्याला कविता कळली की नाही ह्याबद्दल नेहमीच माझ्या मनात एक संदेह असतो. हे वर्ष अपवाद कसं असणार म्हणा. काही कविता कळल्या असं वाटलं. काही कळल्या नाहीत ह्याची खात्री आहे :-) 'सूर्यास्त एक पाहणे' ह्या विभागातली प्रशांत कुलकर्णी ह्यांनी काढलेली व्यंगचित्रं आवडली. 

No comments: