Monday, March 21, 2022

१०. अक्षरधारा (दिवाळी अंक २०२१) (किंमत २५० रुपये)

 २०२१ मध्ये विकत घेतलेल्या दिवाळी अंकांमधला हा शेवटचा अंक. मार्चमध्ये वाचून पुरा झाला हेच आश्चर्य. मला तर वाटलं होतं की २०२१ चे अंक वाचून होईहोईतो २०२२ ची दिवाळी उजाडेल की काय. असो. 

अंकातली पहिलीच कथा 'मशीनगन्स आणि मतपेट्या' - विश्वास पाटील ह्यांची - ही कथा आहे हे माहीत असूनही अस्वस्थ करून गेली. ती वाचताना देशातल्या नक्षलग्रस्त भागात अश्या गोष्टी वास्तवात घडत असतीलही ही बोचरी जाणीव सतत सोबत राहिली. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं उलटून गेल्यावरही ह्या देशात काय काय आणि किती ठीक करायचं राहून गेलंय ते पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. ते ठीक करायचं सोडून सध्या आपण भलत्याच मार्गाला लागलोय. जाऊ देत. प्रणव सुखदेव ह्यांची 'एमटीबी' ही कथा लहान मुलं कधीकधी किती क्रूरपणे वागू शकतात ते दाखवून देते. त्या मानाने गणेश मतकरींची 'हद्द', 'देव करो...' (किरण येले), 'पिचरप्लान्ट' (विश्वदेव मुखोपाध्याय) आणि 'पिवळ्या फुलांचा दिवस' ही शर्मिला फडके ह्यांची ह्या कथा फारश्या आवडल्या नाहीत. 'कोळंबी' ह्या शिल्पा कांबळे ह्यांच्या कथेतून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे ते निदान मला तरी कळलं नाही.  

आंतरराष्ट्रीय राजकारणात विशेष रस असल्यामुळे मिलिंद बोकील ह्यांचा अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवर विवेचन करणारा लेख आवडला. कवी अशोक नायगावकरांचं लिखाण अनेक वर्षांपूर्वी लोकसत्तात वाचल्याचं स्मरतंय. त्यामुळे त्यांच्यावर डॉ. महेश केळुसकरांनी लिहिलेला लेख उत्सुकतेने वाचला. 'लैंगिक शिक्षण' हे दोन शब्द उच्चारले तरी आजकाल कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गल्लोगल्ली उगवलेले संस्कृतीरक्षक फेफरं येऊन आडवे होतील. पण त्यावरचा मंगला गोडबोलेंचा 'राघुमैनेच्या गोष्टी' हा लेख हा ह्या विषयाचं महत्त्व जाणून असलेल्या सर्वांनीच आवर्जून वाचावा असा आहे. 

'कैफ लाईफलाईनचा' हा प्रदीप चंपानेरकर ह्यांचा मुंबईवरचा आणि मल्हार अरणकल्ले ह्यांचा त्यांच्या विद्यार्थी वसतीगृहावरचा हे दोन्ही लेख आवडले. वेगळ्या काळातल्या मुंबईबद्दल आणि एका वेगळ्या जागेबद्दल वाचायला मिळालं. गौरी देशपांडेबद्दल खूप वाचलं असलं तरी त्यांचं लिखाण मात्र मी वाचलेले नाही. डॉ. आशुतोष जावडेकर ह्यांचा 'पुरुष: गौरीला कळलेला...न कळलेला...' हा लेख वाचून त्यांची पुस्तकं वाचावी का असं वाटू लागलं आहे. 'उत्क्रांती: एक वैज्ञानिक अंधश्रद्धा' ह्या पुस्तकावर लिहिलेला डॉ. अरुण गद्रे ह्यांचा लेख, 'निळे फुलपाखरू' (कौशल इनामदार), 'जगण्याची लय सापडताना' (उमा दीक्षित), 'अजून माझी उत्सुक ओंजळ, अजून ताजी फुले' हा प्रा. मिलिंद जोशी ह्यांचा शांताबाई शेळके ह्यांच्यावरचा लेख, मुकुंद वझे ह्यांचा धनगोपाल मुकर्जी ह्यांची ओळख करून देणारा 'मेयो आणि मुकर्जी', दिलीप माजगावकर ह्यांची प्रशांत दीक्षित ह्यांनी घेतलेली मुलाखत, अरुण खोरेंचा डॉ. शरणकुमार लिंबाळे ह्यांच्यावरचा लेख सर्व वाचनीय. 'मी तर जाते जत्रेला' हा नीती मेहेंदळे ह्यांचा महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध जत्रांवरचा लेख वाचून आपण अश्या एकाही जत्रेला गेलो नाही हे जाणवून अपार खिन्नता आली. :-) 'संगीत देवबाभळी' पाहिलेलं असल्याने त्यावरचा प्राजक्त देशमुख ह्यांचा लेखही आवडला. 

उपासतापासाचं वावडं असल्याने 'सावित्री'ची कथा मला कधीच फारशी भावली नव्हती. एक तर पु. लं. म्हणतात तसं 'पांगळी श्रीमंती आणि धट्टीकट्टी गरिबी' वगैरे प्रकार रुचण्यातला नव्हता. एक नवरा सात जन्म म्हणजे जरा जास्तच कमिटमेंट आहे ही ठाम समजूत. आणि यमाच्या मागे जाऊन नवऱ्याचे प्राण परत आणले वगैरे तर 'कैच्या कै' आहे वगैरे वाटत आलेलं. पण डॉ. अरुणा ढेरे ह्यांचा लेख ह्या कथेतले वेगळे पैलू उलगडून दाखवतो. 'अरेच्चा, आपण असा विचार केलाच नव्हता' असं जाणवून थोडी लाजही वाटली. तीच गोष्ट डॉ. नीलिमा गुंडी ह्यांच्या 'द्रौपदी वस्त्रहरण प्रतिमेचे अर्थांतरण' ह्या लेखाची. 

मेनकाबाई शिरोडकर ह्यांचं मी नावही कधी ऐकलं नव्हतं. प्रसिद्ध गायिका शोभा गुर्टू ह्यांच्या त्या आई हे वाचून तर मी अवाकच झाले. तेव्हाच्या काळात कलाकारांच्यात असलेला अव्यवहारीपणा आणि त्यापायी सोसावे लागणारे हाल ह्यातून त्यांचीही सुटका नव्हती हे वाचून वाईट वाटलं. शेवटी भारती मंगेशकर ह्यांनी त्यांची काळजी घेतली पण शोभाजीनी आपल्या आईला वाऱ्यावर कसं सोडलं ह्याचा उलगडा मात्र लेखातून झाला नाही. 

अंकाच्या शेवटच्या लेखात व्यक्तींबद्दलच्या आठवणी आहेत उदा. साप्ताहिक सकाळच्या दिवंगत संपादकांबद्दल लिहिलेला भानू काळे ह्यांचा लेख. तसंच 'लेखक-प्रकाशक मैत्र' ह्या सदरात काही प्रकाशकांनी लेखकांबद्दल लिहिलंय - रामदास भटकळ (विजय तेंडुलकर), अरुण जाखडे (रा. चिं. ढेरे), अनिल मेहता (रणजित देसाई), आप्पा परचुरे (प्रा. वसंत कानेटकर) आणि रविप्रकाश कुलकर्णी (पां. ना. कुमठा). हे सर्व लेख माहितीपूर्ण आहेत.

चला, मागच्या वर्षीचे अंक तर वाचून झाले. आता ह्या वर्षी कुठले अंक वाचायला मिळतात ह्याची प्रतीक्षा करायची :-)

No comments: