Monday, January 24, 2022

५. किल्ला (दिवाळी अंक २०२१) (किंमत ४०० रुपये)

ह्या वर्षी मॅजेस्टीकमध्ये अंक घ्यायला गेले तेव्हा किल्ला अजून आला नव्हता. परत जायला जमेल ह्याची खात्री नसल्याने घरी रोजचा पेपर टाकणाऱ्याला आणून द्यायला सांगितलं. हा शहाणपणाचा निर्णय ठरला कारण पुन्हा मॅजेस्टीकमध्ये गेले तेव्हा किल्लाचे सगळे अंक संपले होते. हा अंक घ्यायला लागल्यापासून दार वर्षीचा अंक जपून ठेवलाय कारण कधी काळी हे सगळे किल्ले बघता येतील अशी आशा अजून आहे. बाकी आमच्या इच्छा म्हणजे 'हजारो ख्वाहिशें ऐसी'. असो.

अंकाची सुरूवात अभिजित बेल्हेकर ह्यांच्या बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यावरच्या सुरेख लेखाने झालेली आहे. अर्थात हा लेख लिहिला तेव्हा पुरंदरे हयात होते. पण त्यांच्या जाण्याने आपण काय गमावलं आहे ह्याची हा लेख वाचून पुन्हा एकदा जाणीव झाली. भक्तीभावाने देवळात जायचे दिवस माझ्यापुरते संपलेत तरी मंदिरात जायला, तिथल्या मूर्ती, कलाकुसर पाहायला मात्र आवडतं त्यामुळे खजुराहोच्या मार्कंडेश्वर मंदिरावरचा डॉ. गो. बं. देगलूरकरांचा लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला आणि आवडलाही. लेखासोबत मंदिरातलया काही मूर्तींची सुरेख चित्रंही आहेत. 

वेगवेगळ्या किल्ल्यांबद्दल वाचायला मी नेहमीच उत्सुक असते. त्यामुळे अकोल्याजवळच्या बाळापूरच्या किल्ल्यावर लिहिलेला डॉ. जयंत वडतकर ह्यांचा, सेंट जॉर्ज फोर्टवरचा आनंद गुप्ते ह्यांचा आणि डन्सटाईन केसल वरचा अमित सामंत ह्यांचा हे सगळेच लेख आवडले. 

किल्ल्यांवर वाढत असलेली पर्यटकांची वर्दळ आणि त्यामुळे त्यांचं होणारं नुकसान हा विषय आजकाल सातत्याने चर्चेत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत हा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येतो. अंकाचा पुढला भाग ह्यावर विवेचन करतो.  ह्या भागात एकूण ५ लेख आहेत. माझ्या मते दोन्ही बाजू मांडायला २ ते ३ लेख पुरेसे होते. त्यापेक्षा जास्त लेख झाल्याने तेच तेच मुद्दे पुन्हापुन्हा सगळ्या लेखात येतात. तसंच ह्याविषयी कोणतेही ठोस उपाय कुठल्याच लेखात मांडलेले किंवा सुचवलेले नाहीत.

युनेस्कोकडे महाराष्ट्रातलया महत्त्वाच्या १४ किल्ल्यांसाठीचे नामांकन पात्र सुपूर्द केलं गेलंय हे मला माहीत नव्हतं. हे किल्ले जागतिक वारसास्थळांत समाविष्ट होण्याबाबत बरेच वाद सुरु आहेत हेही मला 'जागतिक वारसास्थळे समज गैरसमज' ह्या राजेंद्र शेंडे-आनंद खर्डे ह्यांच्या लेखातून समजलं. ह्यातले बरेचसे गैरसमज दूर करायचं काम हा लेख करतो. हा लेख खरं तर प्रमुख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध व्हायला हवा. म्हणजे ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोचेल आणि गैरसमजातून होणारा तसेच आजकाल महाराष्ट्रात कॉमन झालेला 'विरोधासाठी विरोध' हा फालतू असे दोन्ही प्रकार थांबतील. 

व्हिएन्नाच्या प्रसिद्ध दफनभूमीबद्दल लिहिलेला राजीव खांडेकर ह्यांचा लेख वाचून मलाही ही दफनभूमी पाहावीशी वाटतेय :-) हंपी तर अनेक वर्ष माझ्या पाहायच्या ठिकाणांच्या यादीत आहे. त्यामुळे त्यावरचा एड. सीमंतिनी नूलकर ह्यांचा लेख आवडला. काही वर्षांपूर्वी मी व्हॉटसएप वर एका इतिहासावरच्या ग्रुपचा भाग होते तेव्हा सतीचा हात, वीरगळ ह्याबद्दल वाचलं होतं तसंच गधेगाळीबद्दलही वाचलं होतं. ह्या काहीश्या विचित्र शिलालेखांबद्दलचे अनेक पैलू डॉ. मुकुंद कुळे ह्यांनी 'गधेगाळ - एक सामाजिक सांस्कृतिक मागोवा' ह्या लेखात उलगडून दाखवले आहेत. 

लेखाच्या शेवटी असलेले 'मुक्कामी ट्रेक - एक अनुभूती' (संजय अमृतकर), कातळ खोदचित्र (सुधीर रिसबूड) आणि शिवराई (छत्रपती शाहू महाराज) (पुरुषोत्तम भार्गवे) हे लेखही माहितीपूर्ण आहेत. 

No comments: