Friday, December 11, 2020

१. दुर्गांच्या देशातून (दिवाळी अंक २०२०)

ह्या वर्षी दिवाळी अंक प्रकाशित होतील की नाही ही शंका होती. प्रकाशित झाले तर आपल्या हातात पडतील की नाही ही दुसरी शंका. पण मॅजेस्टी़कमध्ये फोन केला तेव्हा 'अंक आलेत' अशी सुवार्ता मिळाली आणि आनंद पोटात मावेनासा झाला अगदी. वेळ मिळताच धावले आणि चांगले ४-५ अंक घेऊन आले. पेपरवाल्याने ३ आणून दिले आणि उपनिषदांवरचा एक अंक पोस्टाने मागवला. तेव्हा आता चांगले ८-९ अंक झालेत. वाचायला वेळ मिळेल तेव्हा मिळेल असा विचार केला. पण 'दुर्गांच्या देशातून' खुणावायला लागला तेव्हा पॉडकास्टस ऐकायचा मोह बाजूला सारून कपाटातून बाहेर काढला. 

पहिलाच लेख रविन्द्र अभ्यंकर ह्यांचा - शिवराज्याभिषेक आणि शिवपुण्यतिथीदिनांच्या त्रिशताब्दी सोहळ्याबद्दलचा. जून १९७४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३०० वर्ष पूर्ण झाली आणि एप्रिल १९८० मध्ये शिवपुण्यतिथीला. त्यानिमित्त रायगडावर झालेल्या कार्यक्रमांची इत्यंभूत हकिकत ह्यात आहे. हे सोहळे व्हावेत म्हणून गोनिदांनी किती अपार मेहनत घेतली ते वाचून थक्क व्हायला होतं. अर्थात अनेक अनाम लोकांचेही हात ह्या कार्याला लागलेत हे वेगळं सांगायला नको. ह्या सोहळ्याचं चित्रीकरण झालं असतं तर ते पहायला मिळालं असतं अशी चूटपूट हा लेख लावून गेला.

ह्यानंतरचे आवडलेले लेख म्हणजे ब्रिटीशांना भावलेला पन्हाळा (सचिन पाटील), शोध शिवछत्रपतींच्या हस्ताक्षराचा (प्रशांत परदेशी), २७ वर्षांपूर्वीची सह्यद्रीची पहिली एकल दीर्घयात्रा (श्रीपाद हिर्लेकर), दुर्गजागर जन्मदिनांच्या आठवणींचा (अरुण बोर्हाडे) आणि 'ऐशीच्या दशकातली अविस्मरणीय भटकंती (बळवंत सांगळे). पैकी हिर्लेकरांचा लेख वाचून त्यांचं 'साठ दिवस सह्याद्रीचे' हे पुस्तक वाचायची उत्सुकता लागली आहे. जमतील तितके वाढदिवस गड-किल्ल्यांवर साजरे करणार्या अरुण बोर्हाडेचं कौतुक वाटलं. इथे आम्ही गड बघायला सुरुवात करायला मुहूर्त लागायचाय. असो. कुंडलीचे योग असतात.

संदीप परांजपेंचा दुर्गसाहित्यावरचा लेख वाचून हे एव्हढं सगळं आपण कधी वाचणार असा नवा घोर लागलाय :-)  'माणदेशातील दुर्गपंचायतन' मध्ये सुजय खलाटेंनी तिथल्या संतोषगड, वारुगड, महिमानगड, वर्धनगड आणि भूषणगड अश्या कधी न ऐकलेल्या गडांविषयी लिहिलंय. तर 'मराठवाडी बेलाग दुर्ग' मध्ये जयराज खोचरेंनी परांडा, नळदुर्ग आणि औसाच्या किल्ल्यांची ओळख करुन दिलीय. 'अपरिचित दुर्गांची सफर' मध्ये संदीप तापकीर ह्यांच्या 'रत्नागिरी जिल्ह्यातले किल्ले' ह्या पुस्तकाबद्दल वाचायला मिळतं.

विस्मरणात गेलेल्या किल्ल्यांबद्दलचा डॉ. नि. रा. पाटील ह्यांचा लेख माहितीपूर्ण आहे पण वाचकांना जास्तीत जास्त माहिती देण्याच्या नादात तो थोडा रटाळ झालाय. त्यामानाने रायगड जिल्ह्यातल्या किल्ल्यांबद्दलचा सुखद राणे ह्यांचा आणि सांगलीच्या किल्ल्यांबद्दलचा सदानंद कदम ह्यांचा लेख थोडक्यात पण आवश्यक माहितीने युक्त आहे. 

सदाशिव टेटविलकर ह्यांचा ठाण्यातल्या किल्ल्यांबद्दलचा लेख वाचेतो 'ठाण्यात किल्ले आहेत' हेही माझ्या गावी नव्हतं. 'कथा एका दुर्लक्षित अष्टकोनी दुर्गाची' मध्ये निखिल बेल्लारीकर ह्यांनी मांजराबादच्या टिपू सुलतानने बांधलेल्या अष्टकोनी किल्ल्याची सविस्तर माहिती दिलेली आहे ती वाचण्याजोगी आहे. सनावळ्या शिकवण्याऐवजी ह्या सगळ्या गडांबद्दल का नाही शिकवलं शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात? मराठा इतिहासात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या खर्ड्याच्या लढाईबद्दल प्रा. डॉ. जी. बी. शहांनी सुरेख विवेचन केलं आहे - लिखाण कुठेही अजिबात रटाळ होऊ न देता. एव्हरेस्ट सर करणार्‍या प्रियांका मोहितेबद्दल कैलास बागलांनी लिहिलेला लेख वाचून एक स्त्री म्हणून खूप तिचा खूप अभिमान तर वाटलाच पण तिच्या आईवडिलांचं कौतुक वाटलं.

दरवर्षी 'किल्ला' चा अंक मी आवर्जून जपून ठेवते. ह्या वर्षी 'दुर्गांच्या देशातून' चाही हा अंक ठेवणार आहे. कधीतरी हे सगळे किल्ले बघू अशी एक आशा अजून मनात आहे. म्हणतात ना उम्मीदपे दुनिया कायम है. 

बाकी आमची गत म्हणजे 'हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिशपे दम निकले' :-)

2 comments:

Unknown said...

I recently trekked to one of the forts u mentioned. Can we get English Translation of your articles / these magazines u mentioned?

Swapnagandha said...

Thanks for your comment. I can translate my own post for you in English but I cannot translate the articles from these magazines.