Friday, November 17, 2017

३. सामना (दिवाळी अंक २०१७)

खरं तर बाकीचे अंक विकत घेतले तेव्हाही मी सामनाचा अंक पाहिला होता. पण मजकुराची खात्री नसल्याने विकत घेतला नाही. नंतर लोकसत्तातलं परीक्षण वाचलं तेव्हा एकदा वाचून बघावा म्हणून घेऊन आले.

पहिला लेख अपर्णा पुरोहित यांचा. ह्या मालेगाव स्फोटाप्रकरणात अटक झालेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पत्नी. ह्या सगळ्या प्रकरणात कर्नल पुरोहित ह्यांना कसं हेतुपुरस्सर अडकवलं गेलं ह्याबद्दल त्यांनी ह्या लेखात लिहिलं आहे. खरं तर आजकाल अशी परिस्थिती आहे की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे समजणं निदान सामान्य माणसाच्या तरी आवाक्याबाहेरचं आहे. त्यामुळे फक्त नाण्याची दुसरी बाजू म्हणून मी ह्या लेखाकडे पाहिलं. 'असंही घडलेलं असू शकेल आणि ते घडलं असेल तर खूप दुर्दैवी आहे' अशीच प्रतिक्रिया झाली.

ट्रोल' म्हणजे मराठीत सांगायचं तर 'जल्पक' हा विषय आजकाल बराच गाजतोय. ह्या विषयावर चक्क तीन लेख अंकात आहेत पण त्यातून हाती फारसं काही लागलं नाही. नाही म्हणायला मा
ननीय पंतप्रधान आक्षेपार्ह पोस्ट्स टाकणाऱ्या लोकांना ट्विटरवर फॉलो करताहेत हे कळलं. अर्थात त्याचं फार काही आश्चर्य वाटलं नाही म्हणा. बेताल वक्तव्यं करत सुटलेल्या आपल्या भक्तगणांना अगदी अंगाशी येईपर्यंत न आवरण्याची त्यांची वागणूक पाहून एकुणात सगळं प्रकरण ध्यानी येतंच.

भविष्यातलं आयुष्य, मुक्या लोकांचे जग, इथे अवयव बनवून मिळतील, वस्तू पॉपअप करतील हे लेख खास वाटले नाहीत. इंटरनेटवरून माहिती गोळा करून लिहिल्यासारखे वाटले. त्यामानाने मराठीची महानदी, आपलं सोशो-मोबाईल आयुष्य आणि उत्सव आभासी होताहेत हे लेख आवडले. शिरीष कणेकर ह्यांचा मधुबालावरचा लेख छान वाटला.

कथा विभागात बाप्पा पावला ही एकच कथा आवडली. ‘गणवेश' ची सुरुवात चांगली झाली होती पण शेवट ढेपाळल्यासारखा वाटला. ‘तो आणि ती' चा शेवट अपेक्षित तरी कथा छोटीशीच असल्यामुळे बरी वाटली. डॉ. सलील कुलकर्णी ह्यांचा 'अनोळखींशी बोलू काही' मात्र खूप आवडला. स्पृहा जोशीच्या लेखाचा विषय चांगला होता तरी लेखन खुपच विस्कळीत वाटलं. कवितांचं आणि माझं फारसं जमत नसल्याने 'कविकटटा' नुसतं चाळलं.

सत्तेत राहून भाजपावर टीका करायचं सेनेचं धोरण मला कधीच पटलं नाही. त्यामुळे उध्दव ठाकरेंच्या ‘संपादकीय’मधल्या सापराज, ‘चोपडी' पूजक, नागोबा, छप्पन इंचाची छाती वगैरे शब्दाना माझ्या लेखी फारसं महत्त्व नाही. बाकी 'राजकारण चुलीत घालून फक्त जनहिताचा विचार करणारे आज कुणीच उरले नाहीत' हे त्यांचं म्हणणं मात्र १००% खरं आहे. पण त्या 'कुणीच' मध्ये आपणही येतो ह्याची जाणीव त्यांना आहे का हा खरा प्रश्न आहे.

पुढल्या वर्षी हा अंक आणायच्या भानगडीत पडणार नाही हे नक्की. ह्या वर्षीचे १०० रुपये अक्कलखाती जमा केले आहेत.

No comments: